Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

तहानलेल्या हत्तीच्या पाठीवरून मोबाइल कंपनीच्या जाहिरातीची वरात!
प्रतिनिधी

काळ कितीही बदलला तरी काही माणसे आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी प्राणिमात्रांना वेठीस धरताना दिसतात. ठाण्यात त्यादिवशी नेमके हेच घडले. शनिवारच्या भर दुपारी गोखले रोडवर एका हत्तीवरून मोबाईल कंपनीची जाहिरातबाजी सुरू होती. त्या तळपत्या उन्हात तहानेने कासावीस झालेला तो हत्ती चित्कारीत होता. मात्र त्यावर स्वार झालेल्या माहुताला त्याची तमा नव्हती. तो आपल्याच नादात हत्तीला पुढे दामटीत होता. त्या हत्तीच्या पाठीवरून दोन्ही बाजूला सोडलेली भरजरी झूल त्या मोबाईल कंपनीची जाहिरात करीत होती. शेवटी गोखले रोडवर असलेल्या उषा किरण हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याची दया आली. त्यांनी माहुताला अडवून हत्तीला पाणी पाजले. तेव्हा तो हत्ती शांत झाला. तहानलेल्या हत्तीच्या पाठीवरून मोबाईल कंपनीच्या जाहिरातीची वरात काढणाऱ्या त्या माहुताला उपस्थित नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले.

चला, मतदान करूया!
अतुल कुलकर्णी

आमच्या ‘लोकसत्ता कॅम्पेन’ची आज एका अर्थाने अखेर होत आहे. ‘लोकसत्ता’ने एखादी गोष्ट मनावर घेतली की, ते ती लावून धरतात. त्याचा पाठपुरावा करीत राहतात. ते जाणतात की ‘प्रबोधन’ हे व्यायाम किंवा आसनांसारखे असते. कितीही रिपिटेटिव्ह वाटला तरी तोच तो व्यायाम सतत करत राहावा लागतो. तरच परिणाम दिसतो!!
आज आपण मुंबई आणि ठाण्यात मतदान करीत आहोत. संपूर्ण महाराष्ट्राच्या २१ टक्के मतदार केवळ आपल्या या दोन जिल्ह्यांत आहेत. चला, मतदान करूया.

जिलेबी-गाठिया, वडापाव-कांदापोहे खा; पण मतदानाला या!
प्रतिनिधी

उन्हाच्या कडाक्यामुळे महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यांच्या मतदानात अत्यंत कमी मतदान झाल्याने, उमेदवारांनी त्याचा धसका घेतला आहे. त्यामुळे उद्या उन्हाचा कडाका वाढण्याआधी मतदानासाठी लोकांना घराबाहेर काढण्यासाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून निरनिराळ्या क्लृप्त्या लढविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही उमेदवारांनी मतदारांना बाहेर काढण्यासाठी सकाळच्या वेळी मोफत ब्रेकफास्टची योजना आखली आहे.

मेकिंग ऑफ राजा हरिश्चंद्र
सुनील डिंगणकर

जवळपास प्रत्येक चित्रपटाचे ‘मेकिंग’ चित्रीत करण्यात येते. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्याचा वापर करण्यात येतो. दिग्दर्शक परेश मोकाशींनी मात्र चित्रपटाच्या ‘मेकिंग’वरच चित्रपट तयार केला आहे. तब्बल ९८ वर्षांपूर्वी धुंडीराज फाळके अर्थात दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट तयार करून भारतीय चित्रपटउद्योगाची पायाभरणी केली. या चित्रपटाचे ‘मेकिंग’ कसे झाले असेल, ही गोष्ट परेश मोकाशी यांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटात सांगितली आहे.

जगप्रवास..
केंब्रिजहून परतल्यावर डार्विन पाद्री म्हणून एक शांत आयुष्य जगू शकला असता.. पण चार्लस्च्या मनात अनेक वर्षे दडून राहिलेली सुप्त इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.. चार्लस्ने पर्जन्यवनांच्या साहसी सफरीची योजना आखली.. ‘वंडर्स ऑफ द वर्ल्ड’ तसेच जर्मन निसर्गशास्त्रज्ञ अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्टच्या सात खंडातील पुस्तकांनी चार्लस्ला झपाटून टाकले.. या पुस्तकांनी चार्लस्च्या मनात निसर्गनिरीक्षणाची आवड चेतविली.. अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्टच्या सात खंडातील पुस्तकांनी तर चार्ल स्वर गारुडच केलं होते.

अनिश्चितेच्या लाटांवर..
मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर वांद्रे-वरळीदरम्यान उभारण्यात येत असलेल्या पहिल्या सागरी सेतूच्या दोन्ही बाजू मंगळवारी जोडण्यात आल्या. अखेर सुमारे दशकापूर्वी हाती घेतलेल्या या सागरी सेतूचे काम अनेक अडथळ्यांवर मात करून पूर्णत्वाला गेले. टोल नाके, डांबरीकरण, विद्युत रोषणाईची सोय किंवा वाहतुकीची चिन्हे लावण्यासारखी छोटी-मोठी कामे अद्याप बाकी आहेत. तीसुद्धा येत्या महिन्याभरात पूर्ण होतील. परिणामी पुढील महिन्याच्या सुरुवातीस हा सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सत्प्रवृत्त व्यक्तींच्या इच्छेपुढे अडचणी निष्प्रभ - केतकर
जयंत धुळप

आजच्या बाजारपेठीय विचारसरणीत माणसे माणसापासून दूर जात आहेत. मात्र सत्प्रवृत्तींच्या व्यक्तींनी निष्ठेचा विचार पसरवित निष्ठेने कामास प्रारंभ केला तर त्यांच्या इच्छापूर्तीआड कोणतीही समस्या येऊ शकत नाही, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’ चे संपादक कुमार केतकर यांनी रविवारी वडघर-मुद्रे येथे केले. माणगाव तालुक्यातील वडघर-मुद्रे या दुर्गम गावात छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या शिक्षण सस्थेच्या सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मतदानाविषयी माहिती मिळवा दूरध्वनीवरून
प्रतिनिधी

मतदार यादीत आपले नाव कोणत्या क्रमांकावर आहे, आपले मतदान केंद्र कोणते आहे, मतदान करण्यासाठी कोणत्या पुराव्यांची गरज आहे, असे प्रश्न मतदारांना सतावत असतात. परंतु, एमटीएनएलने आता मतदारांसाठी मदतीचा हात पुढे केला असून १२९० या क्रमांकावर संपर्क साधल्यास आपणास ही माहिती घरबसल्या मिळू शकेल. मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघांची माहिती फोनद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र मुंबई उपनगरातील माहिती उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे ‘एमटीएनएल’ने पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यानुसार दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर या मतदारसंघातील माहिती दूरध्वनीद्वारे मिळू शकेल.

अत्रे कट्टय़ावर रंगली वसंत व्याख्यानमाला
प्रतिनिधी

मालाड येथील अत्रे कट्टय़ाच्या वतीने १४ ते १८ एप्रिल या कालावधीत विविध विषयांतील तज्ज्ञांच्या सहभागाने आलेल्या वसंत व्याख्यानमाला रंगली. या व्याख्यानमालेचे उद्घाटन नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने यांच्या हस्ते झाले. त्याचदिवशी संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या ‘नेत्रचिकित्सा शिबिरा’चा मालाडकरांनी लाभ घेतला. दुसऱ्या दिवशी वीणा गवाणकर यांनी त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी माहिती दिली. तिसऱ्या दिवशी नाटय़दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘आजचे मराठी नाटक’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. चौथ्या दिवशी अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी ‘जागतिक मंदी आणि आपण’ या विषयावर प्रकाश टाकला. शेवटच्या दिवशी वरिष्ठ पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांच्या ‘दहशतवाद आणि अध्यात्म’ या विषयावरील व्याख्यानाने वसंत व्याख्यानमालेचा समारोप झाला. या व्याख्यानमालेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे समाधान व्याख्यानमालेचे संयोजक भास्कर पंडित, शशिकांत देशमुख, दत्तात्रय मसुरकर आणि विवेक दिवेकर यांनी व्यक्त केले.

संत गाडगे महाराज स्वच्छता पुरस्काराचे वितरण
प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आयोजित केलेल्या संत गाडगे महाराज स्वच्छता पुरस्कार-२००८चे महापालिका आयुक्त डॉ. ज. मो. फाटक यांच्या हस्ते नायर रूग्णालय येथे नुकतेच वितरण करण्यात आले. यावेळी ‘चकाचक मुंबई’ या चित्रपटाचे निर्माते अरूण नंदा, अतिरिक्त आयुक्त आर. ए. राजीव, आयकर आयुक्त रूबी श्रीवास्तव, उपायुक्त डी. एस. भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रभाग क्रमांक १४९चे प्रतिनिधीत्व करीत असलेले नगरसेवक राजीव चौगुले यांच्या प्रभागास ‘स्वच्छ नगरसेवक विभाग’ म्हणून दहा लाखांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. स्वच्छता महापालिका विभाग प्रवर्गामध्ये एम/पश्चिम विभागास ‘स्वच्छ महापालिका विभाग’ म्हणून एक लाख रूपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले, तर स्वच्छ प्रशासकीय परिमंडळ म्हणून उपायुक्त (परिमंडळ २) या परिमंडळास पारितोषिक प्रदान करण्यात आले. डी विभागातील वॉर्ड क्रमांक १०१मधील चौकीस ‘स्वच्छ हजेरी चौकी’ म्हणून पारितोषिक देण्यात आले. यावेळी एकूण ६२ जणांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन
प्रतिनिधी

कॉस्मोपॉलिटन्स एज्युकेशन सोसायटीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या सेठ डी. पी. बर्फिवाला सभागृहाचे उद्घाटन सिने अभिनेता अमिताभ बच्चन याच्या हस्ते अलीकडेच करण्यात आला. यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या काव्यसंग्रहातील कवितांच्या ओळी त्यांनी रसिकांना ऐकविल्या. संस्थेचे अध्यक्ष हर्षद वालिया यांनी यावेळी अमिताभ बच्चन यांचे स्वागत केले. गेली ४८ वर्षे डी. एन. नगर, अंधेरी येथे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कॉस्मोपॉलिटन्स या संस्थेच्या कार्याचा आढावा वालिया यांनी आपल्या भाषणात घेतला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून एसएससी अभ्यासक्रमाबरोबरच या शाळेत सीबीएससी आणि आयजीसीएसई यासारखे अभ्यासक्रम व त्यांचबरोबर महाविद्यालयातून अनेक व्यावसायिक मार्गदर्शक प्रशिक्षण सुरू करण्याचा विचारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. संस्थेचे उपाध्यक्ष आर. एस. गायतोंडे आािण विश्वस्त अजित बालन या वेळी उपस्थित होते. पॅन्टलून मिस इंडिया आणि मिस वर्ल्डमध्ये दुसरे स्थान पटकावणाऱ्या संस्थेची माजी विद्यार्थिनी पार्वती ओमनीकुट्टन हिचा यावेळी सत्कार करण्यात आला.

सहकारी बँकांना मंदीची झळ नाही- विलास देसाई
प्रतिनिधी

आर्थिक मंदीसदृश्य वातावरणाचा परिणाम हा जागतिक स्तरावर आणि खासगी क्षेत्रात जाणवत असला, तरी त्याची तितकीशी झळ ही नागरी सहकारी बँकांना लागणार नाही, असे मत अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलास देसाई यांनी उद्घाटनप्रसंगी काढले. अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँकेचे नवरेनगर शाखेचे देसाई बोलत होते. अंबरनाथ तालुका सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक राजेश लव्हेकर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रत्येक भारतीयाची बचतीची मानसिकता आणि त्याची इथल्या संस्कृतीशी जुळलेली नाळ याचे प्रत्यंतरच सहकारी संस्थांच्या प्रगतीतून आणि कार्यातून प्रतिबिंबित होत आहे, म्हणूनच सहकारी बँका संस्था या आपल्या शाखांद्वारे आपले जाळे विस्तारीत करीत असतानाच सामाजिक बांधिलकी आणि जागतिकीकरणातील व्यावसायिक दृष्टिकोन अंमलात आणतात, असे देसाई यांनी व्यक्त केले. बँकेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत ३१ मार्च रोजी ११६ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडला असून, ६१ कोटींचे कर्जवितरण केले आहे. एकूण ३.१८ कोटींचा ढोबळ नफा मिळविला आहे. ३१ मार्चपासून केंद्रीय प्रशासकीय कार्यालय येथे फ्रॅकिंग सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे परिसरातील नागरिकांना, बँकेच्या ग्राहकांना एक उत्तम सुविधा प्राप्त झाली आहे.