Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

विखे व थोरात समर्थकांकडून राष्ट्रवादीविरोधी प्रचार
गोविंदराव आदिक यांचा आरोप

नगर, २९ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार बाळासाहेब विखे यांच्या समर्थकांनी व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नातेवाईकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा थेट आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. बंडखोर उमेदवार राजीव राजळे यांच्यावरही काँग्रेसने कारवाई करणे जाणीवपूर्वक टाळले, असाही आरोप त्यांनी केला. श्रीरामपूरहून पुण्याला जाताना आदिक दुपारी काही वेळ नगरमध्ये थांबले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील आरोप केला.

विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला वन कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले
राहाता, २९ एप्रिल/वार्ताहर

भक्ष्य शोधत असताना दोन ते अडीच वर्षांंचा बिबटय़ा आश्वी बुद्रुक येथील एका विहिरीत पडला. १२ तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. या बिबटय़ाची रवानगी संगमनेर तालुक्यातील वन विभागाच्या निंभाळे रोपवाटिकेत करण्यात आली.आश्वी परिसरात बिबटय़ांचा मुक्तसंचार असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. बिबटय़ाला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी वारंवार शेतकऱ्यांकडून केली जात होती.

भेटी लागी जीवा..
एकूणच जीवनावर आणि त्या अनुषंगाने आपल्या जगण्यावरही मनापासून, झोकूनच म्हणेनात, प्रेम करणाऱ्यांची बातच काही और. तसं यांच्याही ललाटी असतं आलेलं आयुष्य सामान्यांचंच. एकीकडे ‘सुख थोडे, दुख फार’ असा बहुतांश जनांचा अनुभव नसतो यांनाही अनोळखी. आणि दुसरीकडे आपल्या पूर्वसंचिताच्या खेळाचे तसे उरफाटेच म्हणावेत असे फासे येतात यांच्याही प्रत्यंतराला. पण तरीही यांचा स्थायीभावागत असलेला सकारात्मक दृष्टिकोन यांना हा दोन घडीचा डाव दिलसे म्हणावा असा खेळण्यास नेहमीच प्रेरक ठरत असतो.

जकातीच्या फेरनिविदेचा मार्ग मोकळा
निवडणूक आचारसंहिता शिथील

नगर, २९ एप्रिल/प्रतिनिधी

मतदान झालेल्या भागातील निवडणूक आचारसंहितेचा प्रभाव शिथील करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने महापालिकेचा जकातीसाठी फेरनिविदा प्रसिद्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, ही फेरनिविदा १० टक्के वाढीव दराची असेल की, १० टक्के कमी केलेल्या दराची असेल, याविषयी संभ्रम आहे. जकातीची निविदा आचारसंहितेच्या फेऱ्यात अडकली होती.

जिल्ह्य़ातील ३२ उमेदवारांकडून प्रचारावर १ कोटी १० लाख खर्च
नगर, २९ एप्रिल/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील ३२ उमेदवारांनी निवडणूक प्रचारावर १ कोटी ९ लाख ९८ हजार १४५ रुपये खर्च केले. सर्वाधिक म्हणजे १७ लाख ७५ हजार ५१९ रुपयांचा खर्च नगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांचा असून, सर्वात कमी म्हणजे फक्त ६ हजार ७६३ रुपये खर्च शिर्डीतील अपक्ष उमेदवार अप्पासाहेब गायकवाड यांचा आहे. हा खर्च अर्थातच निवडणूक विभागाला सादर केलेल्या दैनंदिन हिशेबाच्या विवरण पत्राप्रमाणे आहे.

उन्हामुळे तेलाच्या बाटल्या पेटून ५० हजारांचे नुकसान
संगमनेर, २९ एप्रिल/वार्ताहर

उन्हाच्या तीव्रतेमुळे गोडेतेल भरण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या व डबे वितळून लागलेल्या आगीत येथील भंडारी ऑईल मिलचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. पुणे-नाशिक रस्त्यालगत असलेल्या मिलमध्ये दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. मिलमालक सम्राट भंडारी यांनी पोलिसांना याबाबत खबर दिली. उन्हात असलेल्या तेल भरण्याच्या बाटल्या व डबे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. अग्निशमन यंत्रणेने आग आटोक्यात आणली.

नायब तहसीलदारांना मारहाण; दोघांना अटक
श्रीगोंदे, २९ एप्रिल/वार्ताहर

भीमा नदीपात्रात वाळूतस्करांनी नायब तहसीलदार आर. एन. वेताळ यांना केलेल्या मारहाणप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी वाळूचोरी पकडण्यास गेलेल्या महसूलच्या पथकावर हल्ला करीत वेताळ यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रात्री उशिरा फिर्याद दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी रंगनाथ गिरमकर, साहेबराव लोखंडे, शंकर टकले व शिवाजी गिरमकर यांच्याविरुद्ध सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण, सरकारी कामात अडथळा, पर्यावरणाचा ऱ्हास करणे व वाळूचोरी अशा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. लोखंडे व टकले या दोघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, वेताळ यांना पोलीस बंदोबस्त का नेला नव्हता, असे विचारले असता किती वेळा पोलिसांना विनवणी करायची, ते ऐकत नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

नगरला आज उशिरा पाणी
नगर, २९ एप्रिल/प्रतिनिधी

मुळानगर व विळद येथील वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्या (गुरुवार) शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उशिरा व कमी दाबाने होईल. मनपाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे कामही काही ठिकाणी सुरू आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाण्याचा उपसा कमी झाल्याचे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले.

आर्थिक विवंचनेतून विष घेऊन वळणमध्ये दाम्पत्याची आत्महत्या
राहुरी, २९ एप्रिल/वार्ताहर

काही महिन्यांपूर्वी नोकरी गेली, शेतीतही काही उत्पन्न मिळाले नाही, अशा आर्थिक विवंचनेत असणाऱ्या वळण (तालुका राहुरी) येथील दाम्पत्याने विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपवली. सोमवारी रात्री ही घटना घडली. सुरेश भाऊपुरी गोसावी (वय २८) व उषा सुरेश गोसावी (वय २१) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. सोमवारी रात्री जेवणानंतर आपल्या ६ महिन्याच्या मुलीसमवेत झोपण्यासाठी गेलेल्या या दाम्पत्याने रात्री ११च्या सुमारास विषारी औषध घेतले. या दाम्पत्यास तातडीने लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सुरेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर उषाचा काल दुपारी मृत्यू झाला. या प्रकरणी लोणी पोलिसांनी प्रवरा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत सुरेश पुण्यात काही दिवस मॉलमध्ये नोकरीला होता. शिखर शिंगणापूर येथे ४ वर्षांपासून एका रुग्णालयात लेखनिक म्हणून कामाला होता. आर्थिक मंदीच्या कारणावरून नोकरीवरून काढल्यानंतर गत ६-७ महिन्यांपासून वळणमध्ये शेती व माधुकरीवर गुजराण करीत होता. त्याला तीन बहिणी, आई-वडील आहेत. दीड एकर गव्हातही त्याला काही उत्पन्न मिळाले नव्हते.

मागणीप्रमाणे काम सुरू करण्याचे आवाहन
कर्जत, २९ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यात शेतमजूर व मजुरांकडून ज्या गावात कामाची मागणी होईल, तेथे तातडीने महाराष्ट्र रोजगार ग्रामीण योजनेंतर्गत काम सुरू करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने यांनी केले. येथील पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील पाणीटंचाई, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना व संपूर्ण ग्रामीण स्वच्छता अभियानाची आढावा बैठक श्री. माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्या वेळी बोंद्रे, दरेवाडी, गटविकास अधिकारी सुनील पठारे, सर्व विस्तार अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते. या वेळी तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. यामध्ये तालुक्यात कोठेही टँकरच्या मागणीचा प्रस्ताव नसल्याने टँकर सुरू करण्यात आलेले नाहीत. मात्र, तरीही हातपंप दुरुस्ती व इतर उपाययोजना करण्याचे आवाहन श्री. माने यांनी केले. या वेळी संपूर्ण ग्रामीण स्वच्छता अभियानांतर्गत तालुक्यातील ३४ गावांचे प्रस्ताव निर्मलग्रामसाठी केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आले आहेत. त्या गावांतील पाहणीपूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे आवाहन करण्यात आले.

पिण्याच्या पाण्यासाठी उपोषणाचा इशारा
राहाता, २९ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील कोऱ्हाळे येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, गावात तातडीने टँकर सुरू करावा, या मागणीसाठी उद्या (गुरुवार) उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य संजय हेकरे यांनी दिला. विहिरींची पाण्याची पातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याचा टँकर सुरू करावा, यासाठी प्रशासनाकडे मागणी करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे हेकरे यांनी सांगितले.

‘आयव्हीआरसीएल’ साई संस्थानला एक कोटीची देणगी देणार
राहाता, २९ एप्रिल/वार्ताहर

बांधकाम क्षेत्रातील आयव्हीआरसीएल ही अग्रगण्य कंपनी उद्या (गुरुवारी) साईबाबा संस्थानला १ कोटी रुपये देणगी देणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे यांनी दिली. श्रीसाई संस्थानच्या नवीन प्रसादालय इमारतीचे बांधकाम या कंपनीने केले आहे. यावर्षी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने या बांधकामास पुरस्कार देऊन गौरविले. कंपनीची ५ हजार कोटींची वार्षिक उलाढाल आहे. साईबाबांची प्रसादालय बांधकामाच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली हे आमच्या कंपनीचे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया आयव्हीआरसीएलचे मुख्य प्रबंधक विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.

जादा वाळू वाहतूक करणाऱ्या आठ वाहनांवर कारवाई
शेवगाव, २९ एप्रिल/वार्ताहर

क्षमतेपेक्षा जादा वाळू वाहतूक करणाऱ्या आठ वाहनधारकांविरुद्ध येथील तहसील कार्यालयातील भरारी पथकाने केलेल्या कारवाईत प्रत्येकी ११ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यातील तीन गाडय़ा तालुक्यातील आहेत. शेवगावचे तहसीलदार वाल्मिक कापडणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. सन २००८-०९ या महसुली वर्षांत तालुक्यात १ कोटी ५६ लाख रुपये गौण खनिज वसुली झाली. यातील जवळपास ९५ टक्के हिस्सा हा क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतुकीच्या दंडात्मक कारवाईचा आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीररित्या प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वाळूउपशाची कल्पना येते.

गोदावरीचे पात्र ओलांडून गोफण-धोंडय़ाची लढाई
कोपरगाव, २९ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील संवत्सर व कोकमठाणदरम्यान अक्षयतृतीयेपासून पाच दिवस चालणारी गोफण-धोंडय़ाची लढाई आज तिसऱ्या दिवशी नागपूर-मुंबई महामार्गावर गोदावरी नदीपात्र ओलांडून खेळण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूस तासभर वाहतूक खोळंबली होती. या खेळात १५ ते २०जण जखमी झाले. काहींना मुकामार लागला. कोकमठाणच्या योद्धय़ांची आक्रमक चढाई आजही कायम होती. त्यांच्या भिडूंनी संवत्सरचे ग्रामदैवत म्हसोबाचे दर्शन घेतले. त्यांच्या आक्रमणाने संवत्सरच्या भिडूंना महामार्ग पुलापलीकडे महानुभाव आश्रमाजवळ थोपवून धरले. काहींनी गोफणीतून, गलोरीतून तर काहींनी पुलावरून दगड फेकले. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. डफडे, हलकडी आदी वाद्यांमुळे योद्धय़ांना स्फुरण चढत होते. फटाकेही फोडले जात होते. दोन्ही बाजूंनी आपापल्या दैवतांचा जयजयकार होत होता. नागपूर-मुंबई महामार्गावर काही वाहनधारकांनी दूरवर वाहने उभी करून या लढाईचा आनंद लुटला. हे युद्ध आणखी दोन दिवस चालणार आहे.

राहुरीत पाऱ्याची पातळी ४२ अंशांवर कायम
राहुरी, २९ एप्रिल/वार्ताहर

वैशाख वणव्याची तलखी कायम असून, आजही पारा ४२ अंशावर होता. दैनंदिन जनजीवनावर याचा चांगलाच परिणाम होत आहे. बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रात कमाल ४२.१, तर किमान २५.९ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठात ४१.५ अंश नोंद झाल्याची माहिती कृषी हवामान सल्ला योजनेतून देण्यात आली. विभागाच्या अंदाजानुसार पुढील २-३ दिवस तपमान वाढतच राहील. रात्रीच्या तपमानातही वाढ अपेक्षित आहे. दुपारी काहीशा ढगाळ हवामानामुळे वातावरणातील दमटपणाही वाढला. हवेतील आद्र्रता ७५ टक्के होती. वाढत्या उष्म्याने सर्वानाच घामाघूम केले आहे.

नगरसेवकाचे ठिय्या आंदोलन सुरूच
संगमनेर, २९ एप्रिल/वार्ताहर

शहरातील पाणी व इतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर नगरसेवकाने सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज दुसऱ्या दिवशी चालूच राहिले. आंदोलनकर्ते नगरसेवक अविनाश थोरात आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने कोणताही तोडगा निघू शकला नाही. शहरातील, विशेषत थोरात यांच्या प्रभागातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. इतरही विविध समस्या असून वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ थोरात यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर कालपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी आज यातून मार्ग काढण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला. जेसीबी यंत्राच्या मदतीने त्या प्रभागातील जलवाहिन्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले. मात्र, हा केवळ दिखावा असून, प्रत्यक्ष प्रभागातील नागरिक जोपर्यंत प्रश्न सुटल्याचे आपल्याला सांगत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार थोरात यांनी केला. दरम्यान, या प्रकारामुळे पालिका प्रशासन अडचणीत सापडले आहे.

तडिपार आरोपीस राहात्यात अटक
राहाता, २९ एप्रिल/वार्ताहर

शहरातील गुन्हेगार पाच जिल्ह्य़ांतून तडिपार असताना मंगळवारी सायंकाळी शहरात एकजण आढळून आल्याने पोलिसांनी त्यास तत्काळ ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध तडिपारीच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला. रफिक कालूभाई शेख (वय २०) याच्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. श्रीरामपूरचे उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी त्यास नगर, नाशिक, औंरगाबाद, पुणे, ठाणे या पाच जिल्ह्य़ांतून तडिपार करण्यात आले होते. गुन्हेगार शेख हा शहरात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक भालेराव यांना मिळताच त्यांनी सहायक फौजदार व्ही. एल. राऊत, डी. डी. शिंदे, शेंडगे यांच्या मदतीने सदाफळ मार्केटमध्ये त्यास ताब्यात घेतले. शेख याच्याविरुद्ध तडिपारी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल करून त्यास अटक केली.

दांगटवस्तीतील ऊसाच्या शेतातून गांजाची दहा झाडे हस्तगत
श्रीगोंदे, २९ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील काष्टीतील दांगटवस्ती येथील उसाच्या शेतातून पोलिसांनी गांजाची १० झाडे हस्तगत केली. या प्रकरणी शेतमालक बाळासाहेब राजाराम दांगट यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप जाधव यांनी ही कारवाई केली. मिळालेल्या खबरीवरून श्री. जाधव यांनी संभाजी शिर्के, गणेश चव्हाण, सचिन जाधव या कर्मचाऱ्यांसह दांगट यांच्या उसाच्या शेतातून ही झाडे हस्तगत केली. या झाडांतून ६ किलो ५०० ग्रॅम गांजा मिळाला असून, त्याची आज बाजारातील किंमत सव्वातीन हजार रुपये आहे. या प्रकरणी दांगट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान, याच प्रकरणी या उसाची देखभाल करणाऱ्या मजुराचीही चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली. रात्री उशिरापर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.

भिंगार अर्बन बँकेला १ कोटी ११ लाख नफा
नगर, २९ एप्रिल/प्रतिनिधी

मागील आर्थिक वर्षांत भिंगार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला १ कोटी ११ लाखांचा नफा झाला असून, बँकेचे एनपीए शून्य टक्के आहे. पाईपलाईन रस्ता व झोपडी कँटिन शाखा लवकरच स्वतच्या अद्ययावत सोयी-सुविधांसह भव्य वास्तूत कार्यान्वित होतील, अशी माहिती अध्यक्ष गोपाळराव झोडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. झोडगे म्हणाले की, १००व्या वर्षांत बँकेने यशस्वी पदार्पण केले आहे. वित्तीय वर्षांत बँकेची उलाढाल ६८८ कोटी ४६ लाख इतकी झाली. लेखा परिक्षणात बँकेला ‘अ’ वर्ग मिळाला. शतकी वर्षांत बँकेने कर्मचाऱ्यांसाठी वसाहत योजनेसह इतर अनेक उपक्रम राबविले. श्यामराव विठ्ठल सहकारी बँकेच्या अद्ययावत सॉफ्टवेअरसह बँकेच्या सर्व ३ शाखा एकमेकांशी संलग्न करण्यात येणार आहेत. बँकेने गव्हर्नमेंट सिक्युरिटीत ७ कोटींची गुंतवणूक केली आहे, असे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष नाथा राऊत, संचालक मांगीलाल भंडारी, नामदेव लंगोटे, तिलोत्तमा करांडे, व्यवस्थापक अजित लोंढे आदी या वेळी उपस्थित होते.

आढळगावचे केंद्र जिल्ह्य़ात दुसरे
श्रीगोंदे, २९ एप्रिल/वार्ताहर

जिल्हा पातळीवरील आरोग्य कामकाजात सर्व विभागांत येथील आरोग्य विभाग सन २००८-०९ या वर्षांत प्रथम आला. आढळगाव प्राथमिक केंद्र जिल्ह्य़ातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत दुसरे आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील पोटे यांनी ही माहिती दिली. तालुक्यातील इतर तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे पहिल्या १०मध्ये आहेत. वरील मानांकन करताना कुटुंब कल्याण कार्यक्रम, माताबाल संगोपन, तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या आरोग्य कार्यक्रमातील कामकाजाचा विचार करण्यात येतो. या यशाबद्दल डॉ. पोटे व कर्मचाऱ्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी, वनमंत्री बबनराव पाचपुते, जि. प. अर्थ बांधकाम समिती सभापती बाळासाहेब गिरमकर, सभापती अनिता शिंदे, उपसभापती गणपतराव काकडे आदींनी अभिनंदन केले.

विनापरवाना नळजोड घेणाऱ्या सावेडीतील पाचजणांवर कारवाई
नगर, २९ एप्रिल/प्रतिनिधी

मुख्य जलवाहिनीवरून विनापरवाना नळजोड घेऊन सुमारे १ लाख रुपयांहून जास्त किमतीचे पाणी चोरल्याबद्दल महापालिकेने सावेडी भागातील ५ नागरिकांवर कारवाई केली. यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले. विनोद दामोधर चोपडे, विश्वनाथ अय्यर, राजू जग्गी व मुन्ना जग्गी (सर्व रा. झोपडी कँटीनमागे) यांनी सुमारे ८९ हजार ४०० रुपये किमतीचे व लक्ष्मण राजू शिरसाठ (रा. शिरसाठ मळा, निर्मलनगर) यांनी ११ हजार ५०० रुपये किमतीचे पाणी चोरून घेतल्याची तक्रार आहे. मनपाचे प्रभाग अधिकारी नागनाथ पवळे यांनी आज पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली.