Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

यशवंत स्टेडियममधील ११ दुकानांना टाळे
नागपूर, २९ एप्रिल/ प्रतिनिधी

महापालिकेची कठोर कारवाई
अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले
यशवंत स्टेडियममधील गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण करणाऱ्या ११ दुकानांना महापालिकेने आज टाळे ठोकले. तसेच परवानगी न घेता सोयीनुसार बांधकाम करणाऱ्या गाळेधारकांना बांधकाम नियमित करण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. महापालिकेच्या मालकीचे यशवंत स्टेडियम सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. अनेक गाळेधारकांनी त्यांच्या सोयीनुसार अनधिकृत बांधकाम केले आहे.

उन्हामुळे पशुपक्षी सैरभैर
नागपूर, २९ एप्रिल / प्रतिनिधी

उन्हाचे चटके सहन करताना नागरिकांची पुरेवाट होत असताना पशुपक्षांवरही त्याचा परिणाम होतो आहे. विदर्भ कडक उन्हासाठी ओळखला जातो, त्याची प्रचितीही गेल्या १५ दिवसांपासून येत आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम जनजीवनावरही झाला आहे. रस्ते ओस पडू लागले आहेत. पाणी टंचाईमुळे जनता त्रस्त होत आहेत. या उन्हामुळे नागरिकच बेजार आहेत असे नाही, त्याचा फटका पशुपक्ष्यांनाही बसला आहे.

दोघा वैद्यक विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू
नागपूर, २९ एप्रिल / प्रतिनिधी

मोटारसायकल रस्ता दुभाजकावर आदळून लता मंगेशकर रुग्णालयात शिकत असलेल्या दोघा वैद्यक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. शास्त्रीनगरात मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. गोविंद दीपक मोरे व रूपेश नाना काळे (ह.मु. सुभाष नगर) ही मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत. गोविंद मूळचा अकोल्याचा तर रूपेश यवतमाळ जिल्ह्य़ातील वणीचा राहणारा आहे. दोघांच्या मृत्युमुळे या गावांवरही शोककळा पसरली आहे. गोविंद आणि रूपेश हे दोघे रात्री मित्रांकडे गेले होते.

‘नॅनो’ खरेदीसाठी ४० हजार नागपूरकर उत्सुक!
नागपूर, २९ एप्रिल/प्रतिनिधी

सर्वसामान्यांची कार म्हणून बाजारात सादर करण्यात आलेल्या टाटा कंपनीच्या ‘नॅनो’ कारला नागपूकरांनी पहिल्या टप्प्यात तरी प्रतिसाद दिला आहे. एप्रिल महिन्यात टाटा कंपनीचे वितरक, बँक आणि ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बुकिंगमधून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ४० ते ४५ हजार ग्राहकांनी नॅनोचे बुक केल्या आहेत. तसेच, कंपनीने सादर केलेल्या तीन मॉडेल्सपैकी महागडय़ा मॉडेलला नागरिकांनी अधिक पसंती दिली आहे. कंपनीने नॅनो कार सादर केल्यानंतर ९ ते २५ एप्रिलदरम्यान बुकिंग सुरू केले होते.

प्रसाद दासगुप्ता एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक
नागपूर, २९ एप्रिल / प्रतिनिधी

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नागपूर विभागाच्या वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक पदाचा कार्यभार प्रसाद दासगुप्ता यांनी बी.बी. गुजर यांच्याकडून स्वीकारला. गुजर यांची मुंबईला बदली झाली आहे. दासगुप्ता यांनी १९८४ मध्ये आयुर्विमा महामंडळाच्या सेवेत रुजू झाले. २५ वर्षांच्या कालावधीत त्यांनी शाखा आणि कॉर्पोरेट कार्यालयातील विविध पदांवर कार्य केले आहे. त्यांना प्रशासकीय आणि विपणन कार्याचा विशेष अनूभव आहे. त्यांनी महामंडळाच्या विविध विभागातील कार्यालयांमध्ये विपणन आणि विक्री व्यवस्थापक म्हणून विशेष कार्य केले आहे. तसेच त्यांनी पेन्शन आणि ग्रुप स्कीममध्ये पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले आहे.

काँग्रेस सेवादलाची फेरमतदानाची मागणी
नागपूर, २९ एप्रिल / प्रतिनिधी

नागपूर लोकसभा मतदारसंघात कमी मतदान आणि झालेल्या गोंधळास प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करून फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस सेवादल शहर प्रमुख रामगोविंद खोब्रागडे यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
मतदार यादीत नाव नसणे, छायाचित्र असलेले ओळखपत्र न मिळणे, ऐनवेळी मतदान केंद्रात करण्यात आलेला बदल, ओळखपत्राअभावी मतदान करू न देणे या सर्व गोंधळामुळे नागपुरातील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिले. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मतदारांना त्यांचा हक्क बजावता न आल्याने फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही खोब्रागडे यांनी केली आहे.

गौतम बुद्ध जयंती व्यापक प्रमाणात साजरी करणार
नागपूर, २९ एप्रिल / प्रतिनिधी

भगवान गौतम बुद्ध जयंती मोठय़ा प्रमाणात साजरी करण्याच्या प्रस्तावावर विचार व चर्चा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व बौद्ध बांधवांची सभा सदानंद फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली २६ एप्रिलला दीक्षाभूमी येथे पार पडली. सभेत ९ ते १३ मे अशा पाच दिवसांच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. त्यात बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार आणि धम्माबाबत जनजागरण करणे, डॉ. बाबासाहेबांची धम्म प्रचारामागची संकल्पना, गत ५० वर्षांत आपण काय केले, कोणत्या उणिवा राहिल्यात आणि भविष्यात त्यांची पूर्तता कशी करणार आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यासाठी विचार प्रवर्तक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमदेखील आखण्यात आले. बौद्ध समाजातील कलाकारांना संधी देण्यासाठी एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून यात पेंटींग, फोटोग्राफी, शिल्पकला आदींना वाव देण्यात येईल. सभेला व्ही.टी. चिकाटे, तक्षशिला वागधरे, एकनाथ हावरे, इ.मो. नारनवरे, भन्ते प्रशिलरत्न, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. प्रदीप आगलावे, प्रा. सुधाकर चौधरी, डॉ. मिलिंद माने, डॉ. मिलिंद जीवने, एस. दारुंडे, दीक्षित आवळे, वनिता कुबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

निसर्गोपचार महाविद्यालयातर्फे योग शिबिराचे आयोजन
नागपूर, २९ एप्रिल/ प्रतिनिधी

हर्बल इंडिया डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे संचालित चक्रपाणी पंचकर्म योग व निसर्गोपचार महाविद्यालयातर्फे ३ मे पासून नि:शुल्क योग निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन ३ तारखेला सकाळी साडेदहा वाजता कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांच्या हस्ते होणार असून, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल करवंदे हे प्रमुख अतिथी असतील. हे शिबीर ३ ते १३ मे या कालावधीत २८, सेंट्रल रेल्वे कॉलनी, ओंकारनगर रोड येथे दररोज सकाळी ६ ते साडेदहा या वेळेत होईल. हे योगशिबीर नि:शुल्क असून पंचकर्म व निसर्गोपचार उपचारांसाठी रोज २० रुपये शुल्क आकारले जाईल. यात वातरोग, डोकेदुखी, अ‍ॅलर्जी, अस्थमा, मधुमेह, त्वचाविकार, उच्च रक्तदाब, मानसिक विकार, स्त्रीरोग इ. व्याधींवर तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करतील. अधिक माहितीसाठी इच्छुकांना २७४३९७२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

भागवत कथा ज्ञानयज्ञाचा समारोप
नागपूर, २९ एप्रिल/प्रतिनिधी

सुर्वे लेआऊटमधील श्रीकृष्ण मंदिरासमोरील अमरज्ञान कॉन्व्हेंटच्या प्रांगणात २२ एप्रिलपासून सुरू असलेल्या भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सवाचा समारोप २९ एप्रिलला करण्यात आला. महोत्सवात कथाकार श्रीरामपंत जोशी महाराज यांनी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या लीलेचे वर्णन करून भाविकांचे प्रबोधन केले. शोभायात्रेने भागवत कथेला सुरुवात झाली. अक्षय तृतीयेला श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह पार पडला. यावेळी श्रीकृष्णाची भूमिका सुशिल शिर्के व रुक्मिणीची भूमिका डॉ. वर्षां शिर्के यांनी पार पाडली. या विवाह समारंभात माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, स्वामी चिदानंद गिरी, रजनी जाधव, डॉ. दीपक शेंडेकर उपस्थित होते. समारोपाच्या दिवशी, २९ एप्रिलला सुप्रसिद्ध भागवत कथाकार श्रीरामपंत जोशी महाराज यांचे सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यंत गोपालकाल्याचे कीर्तन झाले. दुपारी १२ वाजेनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अरुण बादल, प्रकाश पुराम, दीपक माहुले, रवी गुडधे, हेमंत शिर्के, वृषभ बादल, शिल्पा जाधव, सीमा सवाई आदींनी सहकार्य केले.

हलबा समाजाचा सामूहिक विवाह सोहोळा
नागपूर, २९ एप्रिल / प्रतिनिधी

आदिवासी हलबा विकास मंडळाच्यावतीने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चिटणीस पार्कमध्ये सामूहिक विवाह सोहोळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री डॉ. श्रावण पराते, माजी आमदार यशवंत बाजीराव, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर आणि सेवानिवृत्त आयकर आयुक्त धनंजय धार्मिक प्रमुख पाहुणे होते. मंडळाचे अध्यक्ष रामदास सोनकुसरे यांनी प्रास्ताविकात सामूहिक विवाहाचा उद्देश सांगितला. यावेळी सर्व नववधूंना शिवणयंत्र भेट देण्यात आले. सोहोळ्यास हरीष पारशिवनीकर, हुकुमत भनारकर, वसंत कुंभारे, अशोक धापोडकर, पुरुषोत्तम कांद्रिकर, हेमंत बरडे, नरेंद्र बोकडे, शंकर बाजीराव, अरुण सदावर्ती, पुरुषोत्तम सेलुकर, राजेश बहारघरे, हिरामण मौंदेकर, भास्कर पराते, मनोहर घोराडकर, राजू झुनके, संजय धापोडकर, प्रकाश खोत, राधा पाठराबे, संगीता धापोडकर, छाया खापेकर, सिंधु देहलीकर, पुष्पा पौनीकर, लता धापोडकर, जीजा धकाते, वासुदेव चांदेकर, राजेंद्र धकाते आदींचे सहकार्य लाभले. संचालन विठ्ठल गुमगांवकर यांनी केले. आभार लक्ष्मण मोहाडीकर यांनी मानले.

स्वामी रामदेव खरे देशभक्त -योगतज्ज्ञ जिभकाटे
नागपूर, २९ एप्रिल / प्रतिनिधी

रामदेव महाराजांनी साऱ्या जगात योग क्रांती घडवून आणली आहे. पोथ्या आणि देवघरात बंदिस्त असलेल्या योगाला त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले. ते खरे देशभक्त असून जनतेची नि:स्वार्थ सेवा करत आहेत, असे प्रतिपादन गेल्या ५० वषार्ंपासून योग विद्येच्या प्रचार आणि प्रसारासाठी झटणारे डॉ. विठ्ठलराव जिभकाटे यांनी केले. पतंजली योग समिती आणि भारत स्वाभिमानच्यावतीने ८१ व्या वाढदिवसानिमित्त डॉ. जिभकाटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. संत ज्ञानेश्वर उद्यानात आयोजित समारंभात समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नामदेवराव फटिंग यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. समितीचे महासचिव शशीकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. मंत्री छाजूराम शर्मा संचालन केले. आयुर्वेद प्रभारी डॉ. जिवेश पंचभाई यांनी आभार मानले. याप्रसंगी मुख्य समन्वयक प्रदीप काटेकर, मंडळ प्रभारी हंसराज मिश्रा, प्रबंधक अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर, गुलाबराव उमाठे, प्रभाकर सावळकर, डॉ. योगेंद्र हांडे, घनश्याम कातोरे, संजय वंगलकर, हेमंत मोहोड, राजू महाकुलकर, रमेश बांते, मनोज खंडाळ प्रामुख्याने उपस्थित होते.

विजया लक्ष्मी ऑईल मिलला आग
नागपूर, २९ एप्रिल / प्रतिनिधी

गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या वर्धमाननगरातील विजया लक्ष्मी ऑईल मिलला आज दुपारी पावनेतीनच्या सुमारास आग लागली असून त्यात दहा ते पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. वर्धमाननगरातील विजया लक्ष्मी आईल मिल पुरुषोत्तम नेमानी यांनी बंटी शाहू यांना विकली होती. त्यानंतर अनेक महिन्यांपासून ती बंद होती. मिलमध्ये केवळ चार मशीन व चार-पाच पोते शिल्लक होते.
गेल्या पाच सहा दिवसांपासून मिलमधील मशीन बाहेर काढण्याचे काम सुरू होते. आज दुपारी पावनेतीनच्या सुमारास मिलमध्ये वेल्डिंचे काम सुरू असताना अचानक तेथील पोत्यांना आग लागली. मिल दीड वर्षांपासून बंद असली तरी, आतमध्ये तेलाचा थर असल्यामुळे आगीने लवकरच रौद्र रुप धारण केले. अग्नीशामक विभागाला व लकडगंज पोलिसांना त्याबाबत सूचना देण्यात आल्यानंतर अग्नीशामक विभागाच्या सात गाडय़ा घटनास्थळी आल्या. प्रमुख अग्नीशमन अधिकारी चंद्रशेखर जाधव यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. मिल अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे या आगीत केवळ दहा ते पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचे अग्नीशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.