Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

धरणांतील पाणीसाठय़ांच्या बाष्पीभवनात कमालीची वाढ
पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन

प्रतिनिधी / नाशिक

रणरणत्या उन्हामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वच धरणांमधील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला असून त्यामुळे जवळपास प्रत्येक धरणातील पाण्याची पातळी दररोज सरासरी दोन ते पाच दशलक्ष घनफूट वेगाने कमी होत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. उष्णतेच्या लाटेत बाष्पीभवनाचा वेग असाच कायम राहिल्यास जेथे मुळातच पाणी साठा कमी आहे ती धरणे पूर्णत कोरडी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर, पाणी टंचाईचे संकट अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

करबुडव्या रिक्षाचालकांचे परवाने रद्द करण्याचा इशारा
प्रतिनिधी / नाशिक

शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांच्या अध्यायात वाहन कर चुकवेगिरीचा एक नवीन प्रकार जोडला गेला असून तब्बल सात हजार ७११ रिक्षा परवाना धारकांनी वारंवार सूचना देवूनही या कराची पूर्तता केली नसल्याची बाब उघड झाली आहे. या पाश्र्वभूमीवर, वाहन कराचा त्वरित भरणा न केल्यास संबंधितांना परवान्याची गरज नाही, असे गृहीत धरून वाहन जप्ती तसेच परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.

क्रीडा प्रशिक्षकावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा
प्रतिनिधी / नाशिक

‘मविप्र’ शिक्षण संस्थेच्या पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक व संस्थेच्या वसतीगृहाचे अधीक्षक प्रा. हेमंत पाटील यांच्यावर शहरात झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी मविप्र शिक्षण संस्था, जिल्हा क्रीडा शिक्षक संघटना व शेकडो विद्यार्थ्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.

निसर्गातील प्रकाशचित्रांचा उत्सव नाशिककरांसाठी खुला
प्रतिनिधी / नाशिक

शेती करता करता निसर्गाचे वेगवेगळे मूड आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचे वेड लागलेल्या सी. आर. शेलारे या युवा शेतकऱ्याने काढलेल्या एकापेक्षा एक सरस छायाचित्रांचे ‘रानरंग’ हे प्रदर्शन गुरूवारपासून नाशिककरांसाठी खुले होत आहे. गेल्या चोवीस वर्षांपासून गिर्यारोहण व गिरीभ्रमण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वैनतेय संस्थेतर्फे या निसर्ग छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अगत्यशील!
विडीसारख्या अतिसामान्य किंबहुना पांढरपेशांच्या दृष्टीने ‘बिलो स्टँडर्ड’ व्यवसायातून थेट उच्चभ्रूंना भुरळ पाडणाऱ्या स्टार कॅटेगरीतल्या हॉटेल व्यवसायात पदार्पण करीत तेथील यशस्वीतेवर लीलया आपले नांव कोरणाऱ्या राधाकिसन उपाख्य राधूशेठ चांडक यांचे व्यक्तिमत्व जगन्मित्र या व्याख्येत चपखल बसणारे. विडी उद्योग, शेती, कापड व्यवसाय, औषध व्यवसाय ते हॉटेल इंडस्ट्री असा प्रवास करणाऱ्या राधूशेठना या प्रत्येक क्षेत्राची अथपासून इतिपर्यंत जाण आहे.

माध्यमिक शिक्षकांचे पगार जिल्हा बँकेव्दारेच
नाशिक / प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील माध्यमिक शिक्षकांचा दोन महिन्याचा पगार लवकरच जिल्हा बँकेत जमा करण्यात येणार असल्याची माहिती वेतन पथक अधीक्षकांनी दिली. गेल्या महिन्यापासून महाराष्ट्र बँकेत खाते उघडण्यासंदर्भात दोन टक्के कमिशनवरून शिक्षणाधिकारी कार्यालय व बँक व्यवस्थापन यांच्यामध्ये घोळ सुरू होता. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून पगार मिळाला नसल्याने सर्व शिक्षकांची गैरसोय होत होती. याविषयावर शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षकांशी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रकाश सोनवणे व जिल्हाध्यक्ष साहेबराव कुटे यांनी चर्चा केली. त्याप्रसंगी दोन महिन्याचा पगार लवकरच जिल्हा बँकेत जमा करण्यात येणार असल्याचे वेतन पथक अधीक्षक घोलप यांनी सांगितले. या निर्णयाचे शिक्षकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धा
प्रतिनिधी / नाशिक

महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना व येथील वर्ल्ड ऑफ स्पोर्टस् शिक्षण सांस्कृतिक संस्था यांच्या सहकार्याने एक मे रोजी राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेसाठी राज्य संघटनेचे सचिव दयानंद कुमार, इंडियन ट्रायथलॉन फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते यांनी दिली.
पंचवटीतील महापालिकेच्या श्रीकांत ठाकरे जलतरण तलावात सकाळी साडेसहाला ही स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धेचे वैशिष्टय़े म्हणजे पोहणे, सायकलिंग व धावणे असे तीन क्रीडा प्रकर स्पर्धकाने लागोपाठ करावयाचे असतात. यासाठी स्पर्धेचे अ‍ॅक्वाथलॉन व ट्रायथलॉन असे दोन प्रकार करण्यात आले आहेत. अ‍ॅक्वाथलॉनमध्ये १०, १२ आणि १४ वर्षांआतील मुले व मुलींचे तीन गट ठेवण्यात आले आहेत. ट्रायथलॉन विभागात १२ व १४ वर्षांआतील तसेच १४ वर्षांवरील खुला गट, ४० वर्षांवरील पुरूषांसाठी ओपन रिले हे गट ठेवण्यात आले आहेत.३० एप्रिलपर्यंत स्पर्धेत सहभागी होण्याचे अर्ज स्विकारले जातील. स्पर्धा संपल्यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होईल. जास्तीतजास्त कामगारांनाही या स्पर्धेत सहभागी होता यावे, म्हणूनच एक मे रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, असे निंबाळते यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष उदय केदार, सचिव सुनील गायकवाड, अशोक तांबे, विपुल मेहता उपस्थित होते.

सोमेश्वरजवळ गोदाकिनारी दक्षता फलक उभारण्याची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

शहरापासून जवळच असलेल्या सोमेश्वर येथे गोदापात्रात बुडून दोन दिवसात दोन युवकांचा मृत्यू झाल्याने नदीकिनारी दक्षता बाळगण्याविषयी सूचना देणारा फलक उभारण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अक्षय्यतृतीयेनिमित्त देवळाली कॅम्प येथील संपतराव कासार यांचा १६ वर्षीय राहुल हा मुलगा सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी आला होता. दर्शनानंतर नदीकिनारी फिरत असताना पाय घसरून पडल्याने तो बुडाला. तसेच मुंबई येथील महंमद बशीर महंमद वझीर या १७ वर्षीय मुलाचाही बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न घेता धाडस करणाऱ्यांचे यापूर्वीही येथे बळी गेले असून या घटनांच्या पाश्र्वभूमीवर येथे नदीकिनारी दक्षतेविषयीच्या सूचना देणारा फलक उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

स्वरमिलापतर्फे आज ‘स्वरसंध्या’
नाशिक / प्रतिनिधी

येथील स्वरमिलाप संस्थेतर्फे गुरूवारी ‘स्वरसंध्या’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि ठाणे जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने शालिमार चौकातील आय.एम.ए. सभागृहात सायंकाळी साडेसहाला हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. या मैफलीत किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आरती ठाकूर यांचे गायन होईल. पुण्याच्या ठाकूर या किराणा घराण्याच्या नवीन पिढीतील कलाकार आहेत. वयाच्या नवव्या वर्षांपासून सांगितीक शिक्षणाचा श्रीगणेशा त्यांनी केला. लीलाताई घारपुरे, ज्येष्ठ संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते, डॉ. प्रभा अत्रे, डॉ. संजीव शेंडे यासारख्या ज्येष्ठ गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली ख्याल, ठुमरी, दादरा, गझल अशा विविध संगीत प्रकारात त्यांनी नैपुण्य मिळवले आहे. ठाकूर यांनी पुणे येथील एस.एन.डी.टी. विद्यापीठातून संगीतमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांच्या सांगितीक कारकिर्दीची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा ‘गान-हिरा’ पुरस्कार, सूरसिंगार संसद मुंबईतर्फे दिला जाणारा ‘सूर-मणी’ पुरस्कार असे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतावर आधारित अनेक कार्यक्रम झाले आहेत. ठाकूर यांच्या कलाविष्कारास पंडित भीमसेन जोशी, पंडित फिरोज दस्तूर या दिग्गजांनीही गौरविले आहे.