Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

रस्ता दुरुस्तीकडे पालिकेचे दुर्लक्ष
वार्ताहर / शहादा

गैरव्यवहारांमुळे गाजत असलेल्या शहादा नगरपालिकेस रस्त्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने वाहनचालकांना खड्डे टाळण्याची कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे खडय़ांमुळे अपघातही होत असल्याने त्यातून हाणामारीचे प्रकारही घडत आहेत. रस्त्यांची दुरूस्ती होत नसल्याने नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. दोंडाईचा रस्त्यावरील पेट्रोल पंपापासून तर शहादा नगरपालिका कार्यालयापर्यंत रस्त्यावर सर्वत्र खड्डे आहेत. तसेच स्वामी समर्थ मंदीर तर डोंगरगाव रस्त्याचीही तीच अवस्था. शहरातील जुन्या व नव्या वसाहतीतही रस्त्यावरून वाहन चालवणे अवघड झाले असतानाही पालिका रस्ते दुरूस्तीकडे कानाडोळा करीत आहे. गेल्या वर्षी नागरिकांच्या मागणीनुसार पावसाळा तोंडावर असताना २९ मे ते १० जून या काळात रस्ते दुरूस्ती करण्यात आली खरी, पण हे सारे रस्ते पहिल्याच पावसात धुतले जावून रस्त्यांची परिस्थिती जैसे थे झाली. आता पुन्हा पावसाळा तोंडावर आला आहे. तरीही नगरपालिका प्रशासन ढिम्म आहे. गतवर्षी पालिकेने रस्ते दुरूस्तीवर सुमारे १५ लाख रुपयाचा खर्च दाखविला, मात्र हा सारा खर्च पाण्यात गेला अशी संतप्त प्रतिक्रिया शहरवाशियांमध्ये व्यक्त होत आहे.

सोन आरोग्यकेंद्रात आठ कुपोषित बालके दाखल
वार्ताहर / शहादा

अतिदुर्गम नंदुरबार जिल्ह्य़ाच्या धडगाव तालुक्यातील सोन बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाल विकास कक्ष सुरू करण्यात आला असून या कक्षात श्रेणी तीनमधील आठ कुपोषित बालके दाखल झाली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राजमाता जिजाऊ माता आरोग्य मोहिमेंतर्गत धडगाव तालुक्यातील दुर्गम व अतीदुर्गम भागातील कुपोषित बालकांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी विविध उपक्रम आरोग्य खात्याने हाती घेतले आहेत, या उपक्रमाचाच एक भाग म्हणून बाल विकास कक्ष सुरू करून श्रेणी तीन व चारच्या बालकांना दाखल करून त्यांच्या श्रेणीत सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मालेगाव परिसरातही पाण्यासाठी भटकंती
मालेगाव / वार्ताहर

शहराला लागून असलेल्या भायगाव शिवारातील पुष्पाताई हिरे नगरात गेल्या महिन्याभरापासून पाणी टंचाईची भीषण समस्या उद्भवल्याने तेथील रहिवाश्यांवर पाण्यासाठी अक्षरश: भटकंतीची वेळ आली आहे. तथापि, प्रशासनाला त्याचे अजिबात सोयरसुतक नसल्याची तक्रार रिपाइंचे मालेगाव तालुका अध्यक्ष भारत म्हसदे यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.
पुष्पाताई हिरे नगर आणि त्याच्या आजुबाजूस निर्माण झालेल्या नववसाहतींमध्ये सुमारे आठ हजार लोकवस्ती असताना तेथे पिण्याच्या पाण्याची कायम स्वरुपी योजना नाही. या भागात असलेल्या पंधरा कूपनलिकांव्दारे रहिवाश्यांना पाण्याची सोय भागवावी लागते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यातील निम्या कूपनलिका नादुरूस्त झाल्या तर पाण्याची पातळी खोल गेल्याने इतक कूपनलिकांमधून हंडाभर पाण्यासाठी लोकांना मोठे कष्ट सोसावे लागतात. लोकवस्तीच्या मानाने तेथे पाण्याचे स्त्रोत अल्प असल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ लोकांवर आली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी म्हणून तेथील रहिवाश्यांनी नादुरूस्त कूपनिलका दुरूस्त करण्याची मागणी पंचायत समितीकडे केली असताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केल्याची तक्रार म्हसदे यांनी या निवेदनात केली आहे. या भागातील नादुरूस्त कूपनलिका त्वरित दुरूस्त करतानाच आणखी नव्याने कूपनिलका करण्यात याव्यात तसेच टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा अन्यथा आंदोलनात्मक मार्ग अवलंबण्याचा इशाराही म्हसदे यांनी दिला आहे.

‘खरीपासाठी कृषी विभागाने नियोजन करण्याची गरज’
वार्ताहर / धुळे

खरीप हंगामात जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना बियाणे व खते वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने आतापासूनच योग्य नियोजन करावे, तसेच राशी टू बियाणाची विक्री निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने होणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामासाठी बियाणे खत पुरवठय़ाविषयी कृषी विभागातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश वाघमोडे, कृषी उपसंचालक एच. एन. सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी ए. यु. पटेल, कृषी विकास अधिकारी एस. डी. मालपुरे, पशुसंवर्धन उपआयुक्त तसेच कृषी उद्योगाचे व्ही. के. पालवे उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणारे बियाणे सातबारा दाखविल्याशिवाय मिळणार नाही. त्यामुळे बोगस खरेदीवर आळा बसेल तसेच शेतकऱ्यांच्या नावावर बियाणे खरेदी करून जास्त किंमतीत विक्री करणाऱ्यांवर यावर्षी मोठय़ा प्रमाणात लक्ष ठेवले जाईल.

अंधश्रद्धा निर्मूलन शिबिराच्या तारखात बदल
धुळे / वार्ताहर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धुळे शाखेतर्फे आयोजित ‘बुवाबाजी चमत्कार भांडाफोड प्रशिक्षण शिबीर’ आता रविवारी ३ मे ते बुधवार दि. ६ मे २००९ रोजी आयोजित केले जात आहे. शिबीराच्या तारखा बदलाची नोंद शिबीरार्थीनी घ्यावी व नवीन शिबीरार्थीनी नोंदणी करावी असे आवाहन समितीचे राज्य कार्यवाह अविनाश पाटील यांनी केले आहे. धुळे शहरातील १५ ते २५ वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी आयोजित बुवाबाजी चमत्कार भांडाफोड प्रशिक्षणात पूर्वनोंदणी करून सहभागी होणे अपेक्षित आहे. त्यासाठी २ मे पर्यंत महेंद्र शिरसाठ, जयहिंद कॉलेजरोड, देवपूर येथे नोंदणी करणे अपेक्षित आहे. संपर्कासाठी प्रा. दीपक बाविस्कर याच्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. बुवाबाजी चमत्कार भांडाफोड प्रशिक्षण शिबीरात दररोज सायंकाळी पाच ते आठ दरम्यान दि. ३ ते सहा मे दरम्यान एकत्रितपणे यावयाचे आहे. त्यात अंधश्रद्धा, बुवाबाजी, चमत्कार विषयांची चर्चा, प्रश्नोत्तरे यासह बुवा-बाबांच्या भांडाफोडीचे अनुभव कथन आणि आव्हान प्रिक्रिया, तसेच विविध प्रकारच्या चमत्कार सादरीकरणाबरोबरच भूताने झपाटणे, अंगात येणे, भानामती, करणी, मुठ मारणे यासारख्या प्रकारांचे शास्त्रीय विश्लेषण तज्ज्ञ अभ्यासकांकडून केले जाणार आहे. अंधश्रद्धा निर्मुलन व वैद्यकीय दृष्टीकोन समजावून एकविसाव्या शतकात आधुनिक माणूस म्हणून प्रगती करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी शिबीरात पूर्व नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन समितीने केले आहे.