Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
विशेष

कल्पनाभास
‘‘त्या गडद झोपेतून जागा झालो. पडल्यापडल्याच उघडय़ा दारातून मी समोर बघितलं, तेव्हा दिवस पार मावळून गेला होता आणि रानातून परत येणाऱ्या मेंढरांचा गलगा ऐकू येत होता. मी फार वेळ झोपलो होतो. अद्यापही उठावेसे वाटत नव्हते. दोन्ही हात डोक्याखाली घेऊन तुळ्यांकडे बघत काही वेळ पडून राहिलो. बाहेर मेंढरांचा गलगा वाढत होता. मेंढक्यांनी घातलेल्या उंच आरोळ्या लांबून-जवळून ऐकू येत होत्या. कुत्री भुंकत होती. कोंबडे आरवत होते, माणसे बोलत होती आणि चिमण्या-कावळे गोंधळ करीत होती. खाली मान घालून जनावरं भराभरा चालत होती. त्यांच्या पायांचा दबका आवाज येत होता. धूळ उडत होती. धुळीवर शेकडो खूर उठत होते आणि धोतर खोचलेले, काळेभोर धनगर खांद्यावर आडवी काठी टाकून तोंडाने चमत्कारिक आवाज करीत त्यांच्यामागून येत होते. पश्चिमेकडे तांबडे भडक झाले होते.

धरावी विज्ञानाची कास..
‘विज्ञान हा जोपर्यंत आपल्या संस्कृतीचा भाग होत नाही तोपर्यंत आपण विज्ञान क्षेत्रात आघाडी घेऊ शकत नाही.’ या विधानाचा सध्या वारंवार उहापोह होत आहे. नाटक, सिनेमा, संगित या गोष्टी आपल्या रक्तात भिनल्या आहेत. त्याचा आपल्या आयुष्यावर इतका प्रभाव झाला आहे की, या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यातील घटक बनल्या आहेत. पण आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या विज्ञानाशी आपली इतकी जवळीक आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. आपण आज सर्व क्षेत्रात प्रगती करत आहोत. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही आपली चांगली प्रगती होत आहे. पण या सर्वामध्ये आपल्या देशाची स्वत:ची उत्पादने किती आणि कोणती? असा प्रश्न जर कोणाला विचारला तर याचे उत्तर बहुतेकांकडून माहीत नाही असेच येईल. सध्या आपला देश अनुकरण आणि तत्सम विकासाच्या संदर्भात मग्न आहे.

चक्रव्यूहात सोयाबीन उत्पादक
उडीद-मुगाच्या नगदी पिकाची जागा मराठवाडय़ामध्ये, विशेषत: लातूर आणि परिसरात, गेल्या काही वर्षांत सोयाबीनने घेतली. शेतकऱ्याला लाभही मिळाला. मात्र त्याच्यासमोरील संकटांची मालिका दूर करण्यासाठी कोणी पुढे येत नसल्यामुळे तो भेदरलेला आहे. पारंपरिक शेतीत बदल करून बियाणे, पेरणी, खत, काढणी, औषध फवारणी याचे ज्ञान आत्मसात करून त्याचे प्रयोग शेतकरी करतो आहे. पंचवीस वर्षांपूर्वी आशिया खंडात सूर्यफूल उत्पादनात पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या लातूर जिल्ह्य़ाने सूर्यफुलाला भाव कमी झाल्यानंतर नाकारले. याच जिल्ह्य़ाने १० वर्षांपूर्वी सोयाबीनचा स्वीकार केला. नंतर गेल्या १० वर्षांत ४५ टक्के खरिपाची पेरणी सोयाबीनने व्यापली आहे. कमी-अधिक प्रमाणात मराठवाडाभर हेच चित्र आहे. उडीद, मूग ही पिके आता प्रदर्शनात पाहण्याची वेळ आली आहे. नव्वद-पंचाण्णव दिवसांत येणारे सोयाबीन शेतीत नायट्रोजन देते, एकरी ७ ते १२ क्विंटल उत्पादन देते, असा सार्वत्रिक अनुभव असताना मागच्या वर्षांपासून मात्र लष्करी अळीच्या माऱ्यामुळे उत्पादकतेचे प्रमाण १ ते ५ क्विंटलइतके खाली आले.