Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

ओतूरजवळ ट्रक-जीपच्या धडकेत पाच महिला जागीच ठार; १८ गंभीर
बेल्हे, २९ एप्रिल/वार्ताहर

ट्रक-जीप टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच विवाहित महिला जागीच ठार झाल्या, तर अठरा जण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना मुंबई-विशाखापट्टनम् राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ या महामार्गावर ओतूर गावच्या पश्चिमेस अकरा किमी. अंतरावर वाठखळ (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात मृत पावलेल्या महिलांची सुनंदा अशोक भोर (वय-५०), मंदा पंढरीनाथ भोर, शांताबाई तुकाराम चासकर (वय-४०) (या सर्व राहणाऱ्या चासनारोडी ता. आंबेगाव), आशा शांताराम भुळूख (रा. गिरवली, ता. आंबेगाव) शारदा विलास आवटे (वय-५०, रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) अशी नावे आहेत.

शिक्षणाचे धिंडवडे
मुकुंद संगोराम

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुण्यात प्रथमच सर्वात कमी मतदान झाले. याचे जे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत, त्यात मतदार आता राजकारणाला कंटाळले आहेत, असाही अर्थ काढला जातो. जळी, स्थळी फक्त राजकारणच करायचे आणि उघडपणे भ्रष्टाचार करायचा, या लोकप्रतिनिधींच्या कर्तृत्वाला आता लोक खरेच कंटाळले आहेत. पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातील एकेक घटना जसजशा बाहेर येत आहेत, त्यावरून तेथे शिक्षण सोडून सर्व काही चालते, असाच समज होणे स्वाभाविक आहे.

पुण्यात वीजटंचाई राहणारच
‘टाटा पॉवर’चा करार ३१ मे रोजी संपणार

पावलस मुगुटमल, पुणे, २९एप्रिल/प्रतिनिधी

करारानुसार टाटा पॉवर कंपनीकडून अतिरिक्त वीज पुरविली जात नसतानाच ३१ मे रोजी हा करारही संपणार आहे. अशा परिस्थितीत पुढील काळात पुण्याला वीज मिळण्यासाठी सध्या कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. एकीकडे सत्ताधारी मंडळी निवडणुकीच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये व्यस्त आहेत, तर महावितरणकडूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्य वीज नियामक आयोगाकडूनही याबाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्याचे दिसते आहे.

आळेफाटय़ाजवळही ट्रक-जीपचा अपघात;चार जागीच ठार, तर सात जण जखमी
बेल्हे, २९ एप्रिल/वार्ताहर

पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटय़ानजीक आळेखिंडीत ट्रक व जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार, सातजण गंभीर जखमी झाले. ही घटना आज सायंकाळी आठच्या सुमारास घडली. या अपघातातील मृत व्यक्तींची तसेच जखमींची नावे समजू शकली नाहीत. मात्र जीपमधील मृत व जखमी व्यक्ती बोटा (ता. संगमनेर) परिसरातील असल्याचे सांगण्यात आले. बोटा येथील उत्तम पाटील शेळके यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पुणेकरांचा पैसा लुटणारे शिक्षण मंडळ बरखास्त करा’
पुणे, २९ एप्रिल/प्रतिनिधी

शिक्षण मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे पुणेकर जनतेचा अमाप पैसा अक्षरश: लुटला जात आहे. त्याला पायबंद घालायचा असेल, तर मंडळ बरखास्त करणे हाच एकमेव उपाय आहे. तसा प्रस्ताव आपण तातडीने राज्य शासनाकडे पाठवावा, असे पत्र शहरातील स्वयंसेवी संस्थांनी आज महापौरांना दिले. गणवेश खरेदीत गैरव्यवहार केलेल्या मंडळाचे काही गैरव्यवहार नव्याने बाहेर आले असून ऐन उन्हाळ्यात स्वेटर वाटपाचाही ‘विक्रम’ मंडळाच्या नावावर जमा झाला आहे. या संबंधी तीव्र नाराजी व्यक्त करणारे पत्र आज महापौर राजलक्ष्मी भोसले आणि स्थायी समितीचे अध्यक्ष नीलेश निकम यांना देण्यात आले.

वैमानिकाच्या कौशल्यामुळे दुर्घटना टळली
पुणे, २९ एप्रिल/विशेष प्रतिनिधी

किंगफिशर कंपनीच्या पुणे-इंदूर विमानाने उड्डाण केल्यावर त्याची चाकेच आत न गेल्याने दहा मिनिटांमध्ये विमानाला पुन्हा विमानतळावर उतरविण्यात आले. त्या दहा मिनिटांमध्ये विमानाला हादरे बसत असल्याने विमानातून प्रवास करणाऱ्यांची भीतीने गाळण उडाली होती, तथापि वैमानिकाच्या कौशल्यामुळे दुर्घटना टळली. युवा जनता दलाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष बाबा जाधवराव हे या विमानातून इंदूरला निघाले होते. त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना आपला थरारक अनुभव सांगितला. ते म्हणाले, ‘‘सायंकाळी पावणेपाच वाजता किंगफिशर कंपनीचे विमान इंदूरला निघाले. विमानाने उड्डाण केले आणि दहा मिनिटांच्या अवधीत त्याने आपली उंची गाठली. दहा मिनिटांनंतर विमानाची चाके आत घेतली जातात. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ती आत गेलीच नाहीत. विमानाचा लँडिंग गिअर अडकल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे विमानाला हादरे बसू लागले. पंचाहत्तर जणांची क्षमता असलेल्या या विमानात सुमारे चाळीस जण होते. आम्हा सर्वाची भीतीने गाळण उडाली. अखेरीस थोडय़ा वेळाने विमान विमानतळावर सुरक्षित आणण्यात आले. त्यानंतर विमानाचे ते उड्डाणच रद्द करण्यात आले.’’

जकात चुकवलेली चांदी व हिरेमिश्रित दागिने पकडले
पुणे, २९ एप्रिल/प्रतिनिधी

जकात चुकवून आणलेले हिरेमिश्रित सोन्याचे दागिने व चांदी असा १५ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज महापालिकेच्या गस्ती पथकाने आज कस्तुरे चौकात पकडला. त्यावर जकात आणि दंड मिळून चार लाख १३ हजार रुपये वसूल करण्यात आले. चालू महिन्यात जकातचोरीचे ६६ लाखांचे दागदागिने पकडण्यात आले आहेत.

‘गरजूंपर्यंत रक्त पोहोविणे हीच खरी समाजसेवा’
हडपसर, २९ एप्रिल/वार्ताहर

रुग्णांना लागणाऱ्या रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिराच्या माध्यमातून संकलित केलेले रक्त गरजूंपर्यंत पोहचविणे हीच खरी समाजसेवा असून यातूनच खऱ्या अर्थाने मानव एकता प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळाचे केंद्रीय प्रचारक सूरजितसिंह यांनी केले. संत निरंकारी मंडळाच्या वतीने सिद्धी गार्डन येथील आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सूरजितसिंह बोलत होते. या वेळी विलायतराव लुल्ला, कॅप्टन रामकुमार, ताराचंद करमचंदानी आदींसह मोठय़ा संख्येने अनुयायी उपस्थित होते. निरंकारी मंडळाच्या माध्यमातून देशभर रक्तदान शिबिरे आयोजित केली जात असल्याचे सूरजितसिंह यांनी सांगितले.

मधुमेही रुग्णांसाठी शुक्रवारी मोफत नेत्रतपासणी शिबिर
पुणे, २९ एप्रिल / प्रतिनिधी

मधुमेही रुग्णांसाठी शुक्रवारी (१मे) मोफत नेत्रतपासणी शिबिराचे झंवर आय फाऊंडेशनच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते बारा या वेळेत शिवाजी रस्त्यावरील स्वारगेट कॉर्नर येथील जय चेंबर्समध्ये हे शिबिर होणार आहे.
मधुमेहामुळे अंधत्व येण्याची दाट शक्यता असते. त्यावर वेळीच डोळ्यांची तपासणी करून पडद्यावरील रक्तस्त्राव लेसरने उपचार करून थांबविता येतो. यामुळेच झंवर आय फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या शिबिरात आर्थिकदृष्टय़ा दुर्बल रुग्णांसाठी सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार आहे. डोळ्यांच्या पडद्याचे (रेटीना) तज्ज्ञ डॉ. सचिन काबरा हे या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरासाठी ९८९०९६८७१३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन डॉ. मधुसूदन झंवर यांनी केले आहे.

शहर अभियंत्याने फसवणूक केली;
विरोधी पक्षनेत्याची तक्रार
पिंपरी, २९ एप्रिल / प्रतिनिधी

पिंपरीगाव ते काळेवाडी या रस्त्यावरील पुल एक महिन्यात वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन देणारे शहर अभियंता एकनाथ उगिले यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार विरोधी पक्षनेते मच्िछद्र तापकीर यांनी केली आहे. या पुलाचे बांधकाम होऊन आठ ते नऊ वर्षे झाली. मात्र, अद्याप तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. या पुलावरून तातडीने वाहतूक सुरु करावी, यासाठी तापकीर यांनी दीड महिन्यापूर्वी पालिकेसमोर धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनातील काँग्रेसच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी टाळ कुटून पालिका प्रशासनाचा निषेध केला होता. आयुक्त आशिष शर्मा बाहेरगावी असल्याने तेव्हा शहर अभियंता उगिले यांनी एक महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन तापकीर यांना दिले होते. मात्र, दोन महिने उलटले तरी यासंदर्भात कोणतीच हालचाल दिसत नसल्याने तापकीर यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. याबाबत, आयुक्तांनी भूमिका स्पष्ट न केल्यास पालिका भवनात जनआंदोलन करण्याचा इशारा तापकीर यांना दिला आहे.

गर्द पावडरची विक्री करणाऱ्या महिलेस अटक
पुणे, २९ एप्रिल /प्रतिनिधी

पिंपरी भागात गर्द पावडरचा विक्री व्यवसाय करणाऱ्या महिलेला अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली. भारतनगर झोपडपट्टीच्या जवळ काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.
रेणुका दत्ता पवार (वय २५, रा. भारतनगर झोपडपट्टी, पिंपरी) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला सराईत गुन्हेगार असून, तिच्याविरूद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पवार हिच्याकडून ५७० गर्द पावडरच्या पुडय़ा व त्यामध्ये ११५ ग्रॅम पावडर असा एकूण एक लाख ७२ हजार सहाशे तीस रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. एन. डी. पी. एस. कायद्याच्या ८ (क) २२ या कलमान्वये पिंपरी ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करण्यात आली आहे. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव पाटील याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

राज ठाकरे यांचे रविवारी निगडीत व्याख्यान
पिंपरी,२९ एप्रिल / वार्ताहर

व्याख्यानमालेचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या निगडी प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेत येत्या रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी ‘माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र’ या विषयावर ते बोलणार आहेत. व्याख्यानमालेचे प्रमुख संयोजक भास्कर रिकामे यांनी ही माहिती दिली.
शुक्रवारी ( एक मे) व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सावरकर विचार मंचचे संस्थापक डॉ. अभिराम दीक्षित यांच्या हस्ते गुंफले जाईल. ‘सावरकरांचे हिंदुत्व’ या विषयावर ते विचार मांडणार आहेत. सहा मे पर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेत डॉ. योगेश गुजर, अर्थतज्ञ डॉ. चंद्रशेखर टिळक, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, नामदेव तळपे आदींची व्याख्याने होणार आहेत.