Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
राज्य

उष्णतेच्या लाटेत होरपळतोय उभा महाराष्ट्र!
नागपूर ४७.१, तर अकोला ४७ अंश
पुणे, २९ एप्रिल / खास प्रतिनिधी
उष्णतेच्या लाटेत उभा महाराष्ट्र होरपळला असून, कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वत्र तापमानातील वाढीमुळे अस्वस्थता वाढली आहे. विदर्भात नागपूर व अकोला येथे तर आज तापमानाने ४७ अंशांचा टप्पा ओलांडून कहर केला. नागपूर येथे आज सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यातही तापमानाने या हंगामातील उच्चांकी (४१.७ अंश) आकडा गाठला. हवेत पुरेशी आद्र्रता नसल्याने येत्या दोन दिवसांत तरी राज्याला पडलेला उकाडय़ाचा विळखा सुटण्याची शक्यता नसल्याचे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.

गैरव्यवहाराच्या संशयावरून ‘बीएचआर’च्या ठेवीदारांमध्ये संभ्रम
४० लाखांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल
जळगाव, २९ एप्रिल / वार्ताहर
नाशिक व जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील बोटावर मोजण्या इतक्याच नागरी सहकारी पतसंस्था सोडल्या तर जवळपास सर्वच नागरी सहकारी पतसंस्थांची अवस्था गंभीर असल्याने त्यातील ठेवीदार आपल्या श्रमाच्या पैशांसाठी मेटाकुटीस आलेले असतानाच जळगाव येथील मल्टी शेडय़ूल्ड दर्जा मिळविणाऱ्या बीएचआर पतसंस्थेत फसवणुकीचा प्रकार उघडकीस येऊन अध्यक्षास अटक झाल्याने ठेवीदार व सभासदांत घबराट पसरली आहे. ठिकठिकाणी असलेल्या या पतसंस्थेच्या सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

महेश मांजरेकर, अशोक नायगावकर वसंत व्याख्यानमालेचे आकर्षण
नाशिक, २९ एप्रिल / प्रतिनिधी

‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटाचे तुफान यश अनुभवणारे निर्माते, दिग्दर्शक तथा अभिनेते महेश मांजरेकर हे येथील वसंत व्याख्यानमालेच्या ८८ व्या ज्ञानसत्रात शुक्रवारी पहिले पुष्प गुंफणार आहेत. सायंकाळी सात वाजता गंगाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव पटांगणात महापालिका आयुक्त विलास ठाकूर यांच्या हस्ते ज्ञानसत्राचे उद्घाटन होणार आहे. ३१ मे पर्यंत सुरू राहणाऱ्या ज्ञानसत्राचे अध्यक्षस्थान उद्योगपती राधाकिसन चांडक भूषविणार आहेत.

पतीच्या आत्महत्येनंतर धक्क्याने पत्नीचाही मृत्यू
नाशिक, २९ एप्रिल / प्रतिनिधी

व्यसनाधीन पतीने गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर मानसिक धक्का बसलेल्या पत्नीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना हरसूल तालुक्यातील बुरूडपाडा येथे घडली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तुळशीराम नागू पानगे (५०) व सखुबाई अशी या पती-पत्नीची नावे आहेत. बुरुडपाडा शिवारात वास्तव्यास असणारे पानगे हे प्रकृती अस्वास्थामुळे त्रस्त होते, असे सांगितले जाते. त्यातच शेतीचे पुरेसे उत्पन्न येत नसल्याने आर्थिक गणित कोलमडून पडले होते. या घटनांमुळे व्यसनाधीन झालेल्या पानगे यांनी मंगळवारी मध्यरात्री घरालगतच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. सकाळी हा प्रकार पाहिल्यानंतर सखुबाईंना एकच धक्का बसला आणि त्या खाली कोसळल्या. या धक्क्यानेच त्यांचाही मृत्यू झाला.