Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
क्रीडा

किंग इज किंग
दरबान, २९ एप्रिल / वृत्तसंस्था

गतवर्षी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर युवराजसिंगचा पंजाब किंग्ज इलेव्हन आणि सचिन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्स यांच्यात इंडियन प्रीमियर लीगमधील रंगलेल्या सामन्याची पुनरावृत्ती येथील किंग्जमीड स्टेडियमवर झाली. तो रोमहर्षक सामना पंजाबने एका धावेने जिंकला होता. यावेळीही तोच रोमांच कायम राखत पंजाबने मुंबई इंडियन्सवर तीन धावांनी मात केली. कमी धावसंख्येच्या या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना केवळ ११९ धावा केल्या. तरीही मुंबई इंडियन्सला ही धावसंख्या भारी ठरली व २० षटकांत त्यांना ७ बाद ११६ धावसंख्येवरच समाधान मानावे लागले.

भारतीय क्रिकेट बोर्डाचे आयसीएलच्या खेळाडूंना अभय
३१ मेपर्यंत करार मोडीत काढण्याचे आदेश
मुंबई, २९ एप्रिल / क्री. प्र.
गेली दोन वर्षे भारतीय क्रिकेट बोर्डाशी पंगा घेतलेल्या इंडियन क्रिकेट लीगमधील खेळाडू व सपोर्ट स्टाफवरील बंदी भारतीय क्रिकेट बोर्डाने उठविण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र सुमारे वर्षभरानंतर आयसीएलमधील खेळाडूंना राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडतील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यासाठी आयसीएलमधील खेळाडूंना ३१पर्यंतची मुदत दिली असून या कालावधीत त्यांनी आयसीएलशी असलेला करार मोडावा, असेही भारतीय क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.

झिम्बाब्वेचा दौरा रद्द करून बोर्डाचा भारतीय संघाला दिलासा
मुंबई, २९ एप्रिल / क्री. प्र.

क्रिकेटच्या अतिरेकाने थकलेल्या भारतीय क्रिकेटपटूंना दिलासा देणारा निर्णय आज भारतीय क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी वेस्ट इंडिजमध्ये छोटीशी एकदिवसीय सामन्यांची मालिका व त्यापूर्वी झिम्बाब्वे दौरा असा भारतीय संघाचा पूर्वघोषित कार्यक्रम होता. मात्र आता भारतीय क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वेत तिरंगी मालिका खेळण्याचा बेत रद्द करून त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला दिलासाच दिला आहे.

युनियन बँक, स्टॅण्डर्ड चार्टर्ड विजेते
सर बेनेगल रामाराव क्रिकेट
मुंबई, २९ एप्रिल / क्री. प्र.
अक्षय जांभेकर (नाबाद ८८), राहुल लाड (५५) यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या १२५ धावांच्या भागीदारीमुळे युनियन बँकेने देना बँकेवर सहा विकेट्सनी विजय मिळवत रिझव्‍‌र्ह बँक स्पो. क्लब आयोजित ५३ व्या सर बेनेगल रामाराव आंतर बँक क्रिकेट स्पर्धेच्या सीनिअर गटाचे विजेतेपद पटकावले. अ‍ॅन्थनी डायसच्या (१०२) शतकी खेळीनंतर देना बँकेला ४५ षटकांत केवळ २०३ धावांच करता आल्या. ज्युनिअर गटात डावखुरा फिरकी गोलंदाज महेश शेळके याने २३ धावांत सहा बळी घेऊन स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

‘प्रबोधन ओझोन’ने दिला भावी जलतरणपटूंना आधार
मुंबई, २९ एप्रिल / क्री. प्र.

प्रबोधन गोरेगाव संस्थेने आपल्या ओझोन जलतरण तलावात भावी जलतरणपटू घडविण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. चार वर्षांपूर्वी अत्यंत दुरवस्थेत असलेला पालिकेच्या ताब्यातील हा तलाव प्रबोधनने ताब्यात घेऊन त्याचे पुनरुज्जीवन केले आणि या सुंदर जलतरण तलावामुळे पश्चिम उपनगरातील जलतरणपटूंना दिलासा दिला. यंदाही या तलावावर उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, जवळपास ८००-९०० मुला-मुलींनी या शिबिरासाठी नोंदणी केली आहे.

कोलकाता नाइट रायडर्स तळाला
दरबान, २९ एप्रिल / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्सची वाताहत सुरूच असून बंगलोर रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या लढतीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि गुणतक्त्यात हा संघ तळाला फेकला गेला. त्यांनी आतापर्यंत केवळ एकच सामना जिंकला असून त्यानंतर मात्र सातत्याने त्यांना पराभवाचाच सामना करावा लागत आहे. कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना केलेल्या १३९ धावांना प्रत्युत्तर देताना बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने एक चेंडू व पाच विकेट्स राखून विजय मिळविला.

...त्यांना क्रिकेटच कळले नाही- सचिन
दरबान, २९ एप्रिल/ पीटीआय

ट्वेंन्टी-२० क्रिकेट हे फक्त युवांसाठीच आहे असे म्हणणाऱ्यांना क्रिकेटच कळले नाही, असे प्रत्यूत्तर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने टीकाकारांना दिले आहे. ट्वेंन्टी-२० क्रिकेट हे फक्त युवांसाठीच आहे असे कोणीतरी म्हटले होते, मी त्यांना ओळखत नाही. मला फक्त त्यांच्याबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते की त्यांना बहुधा क्रिकेट हा खेळ कळत नसावा.

सुपरकिंग्जपुढे रॉयल्सला रोखण्याचे आव्हान
सेन्चुरियन, २९ एप्रिल / पीटीआय

इंडियन प्रिमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या दुसऱ्या पर्वात गेल्या तीन लढतीत दोन पराभव स्वीकारणारा चेन्नई सुपरकिंग्जपुढे गतविजेत्या राजस्थान रॉयल्सला रोखण्याचे आव्हान आहे. उद्या, गुरूवारी उभय संघादरम्यान होणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. पाच पैकी केवळ एक लढत जिंकणारा चेन्नई सुपरकिंग्ज संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.

चार्जर्सचा विजय रथ डेअर डेव्हिल रोखणार काय ?
प्रेटोरिया, २९ एप्रिल / पीटीआय

इंडियन प्रिमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात सलग चार विजय मिळवणारा डेक्कन चार्जर्स आणि स्पर्धेत काल पराभवाची चव चाखणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यादरम्यान उद्या, गुरूवारी लढत होत आहे. उद्याच्या लढतीत चार्जर्सचा विजय रथ रोखण्याची दिल्ली डेअरडेव्हिल्सला आशा आहे. गेल्या स्पर्धेत विशेष चमक न दाखवता आलेल्या चार्जर्सने यावेळी मात्र सुरुवातीपासून कामगिरीत सातत्य राखण्यात यश मिळवले आहे.

पठाणच्या झंझावाताने हातातून सामना निसटला- सेहवाग
सेंच्युरीयन, २९ एप्रिल/ पीटीआय

वीरेंद्र सेहवागच्या दिल्ली संघासाठी काल ‘डेव्हिल’ ठरला तो राजस्थान रॉयल्सचा हुकमी एक्का युसूफ पठाण. त्याच्या झंझावातामुळेच राजस्थान रॉयल्सने पाच विकेट्स राखून सामना जिंकला आणि आमच्या हातातून सामना निसटला, असे मत सेहवागने सामना संपल्यानंतर व्यक्त केले आहे. सामन्याचा ११ व्या षटकानंतर दिल्ली डेअर डेव्हिल्स सामना जिंकेल असे भविष्य एका समालोचकाने व्यक्त केले होते. पण त्याला बहुतेक राजस्थानच्या संघात युसूफ पठाण नावाचा ‘हातोडा’ आहे हे माहित नसावे. नाहीतर त्याने असे तकलादू विधान केले नसते.

अर्जुन पुरस्कारांसाठी गंभीर आणि झुलनची शिफारस
मुंबई, २९ एप्रिल/ क्री. प्र.

खेळांमधील देदीप्यमान कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानाच्या अश्या अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघासाठी ‘रनमशिन’ ठरलेला सलामीवीर गौतम गंभीर आणि भारतीय महिला संघाची कर्णधार झुलन गोस्वामी या दोघांची शिफारस केली आहे. आज झालेल्या बीसीसीआयच्या कार्यकारीणी बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षांसाठी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वीच धोनी आणि हरभजन सिंग पद्मश्री पुरस्कार सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याने क्रिकेटपटूंना राष्ट्रीय पुरस्कार द्यावेत किंवा नाही याबद्दल वादंग निर्माण झाला होता. क्रिडा मंत्रालयानेही धोनी आणि हरभजन यांच्या कृतीवर ताशेरे ओढले होते. पण बीसीसीआये यासंदर्भात गप्प बसली होती.

कुमार राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अव्वल खेळाडूंचा सहभाग
पुणे, २९ एप्रिल/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) सुपर मालिका कुमार राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशातील १२ व १४ वर्षांखालील गटातील अव्वल खेळाडू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा ४ ते ९ मे या कालावधीत पुण्यातील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बालेवाडी येथील टेनिस कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे. स्पर्धेचे संचालक सुंदर अय्यर यांनी सांगितले, की प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांनी पाठिंबा दिला आहे.

कसोटी, एकदिवसीय क्रिकेटपेक्षा आयपीएल आव्हानात्मक - बुकॅनन
दरबान, २९ एप्रिल / पीटीआय

एकदिवसीय तसेच कसोटी क्रिकेटपेक्षा आयपीएल ट्वेन्टी- २० सामने जास्त आव्हानात्मक आहेत, असे मत कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक जॉन बुकॅनन यांनी व्यक्त केले आहे. या बरोबरच कोलकाता संघाचे प्रशिक्षक पद सांभाळणे हा कारकीर्दीतील सर्वात अवघड प्रसंग आहे, असेही ते म्हणाले. एकदिवसीय तसेच कसोटी सामन्यांची संख्या वर्षभरात तुलनेने कमी असते. आयपीएल स्पर्धेत सामन्यांची संख्या भरपूर असते. त्यामुळे आयपीएल स्पर्धा जास्त आव्हानात्मक वाटते ,असे बुकॅनन म्हणाले.