Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

भारतीय क्रिकेट बोर्डाचे आयसीएलच्या खेळाडूंना अभय
३१ मेपर्यंत करार मोडीत काढण्याचे आदेश
मुंबई, २९ एप्रिल / क्री. प्र.

 

गेली दोन वर्षे भारतीय क्रिकेट बोर्डाशी पंगा घेतलेल्या इंडियन क्रिकेट लीगमधील खेळाडू व सपोर्ट स्टाफवरील बंदी भारतीय क्रिकेट बोर्डाने उठविण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र सुमारे वर्षभरानंतर आयसीएलमधील खेळाडूंना राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडतील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यासाठी आयसीएलमधील खेळाडूंना ३१पर्यंतची मुदत दिली असून या कालावधीत त्यांनी आयसीएलशी असलेला करार मोडावा, असेही भारतीय क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतीय क्रिकेट बोर्डाने इंडियन क्रिकेट लीगमधील सर्व खेळाडूंना अभय देण्याचे ठरविले आहे. मात्र त्यासाठी त्यांनी आयसीएलशी असलेला करार ३१ मेपर्यंत मोडीत काढावा. त्यानंतर हे खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळू शकतील, पण त्यांचा वर्षभर राष्ट्रीय संघासाठी विचार होणार नाही.
मनोहर यांनी हा निर्णय घेण्यामागचे कारण विषद करताना सांगितले की, आयसीएलमध्ये खेळत असलेले अनेक खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाकडे धाव घेतली व आपली चूक मान्य केली तसेच भारतीय क्रिकेट बोर्डाशी आपल्याला पुन्हा एकदा नाते जोडायचे असल्याची विनंती केली, त्यानंतर बोर्ड या निर्णयाप्रत आले.
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे दिनेश मोंगिया, अंबाती रायुडू, हेमांग बदानी, रोहन गावसकर, प्रशिक्षक संदीप पाटील, बलविंदरसिंग संधू, कपिल देव व किरण मोरे यांनाही मुख्य प्रवाहात सामील होता येणार आहे.
मनोहर म्हणाले की, या महिन्याच्या प्रारंभी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीएलला मान्यता देण्यास नकार दर्शविला होता. कदाचित यामुळेच आयसीएलमधील खेळाडू व सपोर्ट स्टाफला आपल्या भवितव्याबद्दल चिंता वाटू लागली असावी आणि त्यातूनच त्यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधण्याचे ठरविले असावे. त्यांनी आपली चूक कबूल केली असून आम्हीही त्यांना संधी देण्याचे ठरविले आहे. मनोहर यांनी असेही स्पष्ट केले की, जे माजी खेळाडू आयसीएलशी संबंधित होते त्यांना देण्यात येणाऱ्या मानसिक मानधनाची भरपाई बोर्ड करणार नाही. आयसीएलशी संबंधित असताना त्यांची ही रक्कम रोखून धरण्यात आली होती, ती त्यांना दिली जाणार नाही. या खेळाडूंना काहीप्रमाणात शिक्षा व्हायलाच हवी.
या खेळाडूंमध्ये माजी कर्णधार व आयसीएलचा कार्यकारी संचालक कपिल देवचा समावेश असून त्याला प्रतिमहिना ३५ हजार रुपये रक्कम देण्यात येणार होती.
२००७च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान एस्सेल ग्रुपचे प्रमुख सुभाषचंद्र यांनी आयसीएलची घोषणा केली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आयसीएलची पहिली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने इंडियन प्रीमियर लीगची घोषणा केली व आयसीएलला मान्यता देण्यास मनाई केली. एवढेच नव्हे तर आयसीएलमधील खेळाडूंवर बंदीही घालण्यात आली.
भारतीय क्रिकेट बोर्डाने इतर क्रिकेट बोर्डानाही अशीच कारवाई करण्याची सूचना केली. यंदा आयसीएलने सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही स्पर्धा आयोजित न करण्याचे ठरविले.