Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

झिम्बाब्वेचा दौरा रद्द करून बोर्डाचा भारतीय संघाला दिलासा
मुंबई, २९ एप्रिल / क्री. प्र.

 

क्रिकेटच्या अतिरेकाने थकलेल्या भारतीय क्रिकेटपटूंना दिलासा देणारा निर्णय आज भारतीय क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी वेस्ट इंडिजमध्ये छोटीशी एकदिवसीय सामन्यांची मालिका व त्यापूर्वी झिम्बाब्वे दौरा असा भारतीय संघाचा पूर्वघोषित कार्यक्रम होता. मात्र आता भारतीय क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वेत तिरंगी मालिका खेळण्याचा बेत रद्द करून त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला दिलासाच दिला आहे. मात्र झिम्बाब्वेला या निर्णयामुळे आता तिसरा संघ शोधावा लागेल, असे बोर्डाचे सचिव एन. श्रीनिवासन यांनी म्हटले आहे. श्रीनिवासन यांनी भारताऐवजी आता दक्षिण आफ्रिका संघ या स्पर्धेत खेळेल, असे म्हटले असले तरी त्यांनी मात्र आपला असा कोणताही विचार नाही, असे म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील आय. पी. एल. स्पर्धेनंतर भारतीय संघ ५ ते २१ जून या कालावधीत इंग्लंडमध्ये ट्वेण्टी-२० वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये चार-पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ते खेळतील व नंतर सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर भारतात ट्वेण्टी-२० चॅम्पियन्स लीग स्पर्धा होणार असून, त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱ्यात सात एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर श्रीलंकेचा संघ कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येईल व जानेवारीत भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करणार असल्याचे श्रीनिवासन यांनी म्हटले आहे.