Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

‘प्रबोधन ओझोन’ने दिला भावी जलतरणपटूंना आधार
मुंबई, २९ एप्रिल / क्री. प्र.

 

प्रबोधन गोरेगाव संस्थेने आपल्या ओझोन जलतरण तलावात भावी जलतरणपटू घडविण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. चार वर्षांपूर्वी अत्यंत दुरवस्थेत असलेला पालिकेच्या ताब्यातील हा तलाव प्रबोधनने ताब्यात घेऊन त्याचे पुनरुज्जीवन केले आणि या सुंदर जलतरण तलावामुळे पश्चिम उपनगरातील जलतरणपटूंना दिलासा दिला. यंदाही या तलावावर उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, जवळपास ८००-९०० मुला-मुलींनी या शिबिरासाठी नोंदणी केली आहे. प्रतिवर्षी या शिबिरांना मोठा प्रतिसाद लाभत असला तरी केवळ २५ ते ३० टक्के मुलेच सराव पुढे सुरू ठेवतात व स्पर्धात्मक दृष्टीने तयारी करतात असे या शिबिरांचे प्रमुख रमेश म्हात्रे यांनी सांगितले.
या शिबिरासाठी अगदी ३-४ वर्षांच्या मुलांनाही प्रवेश दिला जातो आणि बेबी पूलमध्ये त्यांच्या मनातील पाण्याची भीती घालविण्यावर भर दिला जातो. त्यापेक्षा थोडय़ा अधिक वयाच्या मुलांना फ्लोटर बांधून पाण्यात उतरविले जाते आणि पोहताना हात कशा प्रकारे मारायचे, सायकलिंग, पायाची मूव्हमेण्ट कशी करावी, असे प्राथमिक ज्ञान दिले जाते. छोटी मुले १०-१२ दिवसांतच स्वतंत्रपणे पोहायला तयार होतात. अशा वेळी फ्लोटर न लावता त्यांना पाण्यात सोडून प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आत्मविश्वास देण्यात येतो. त्यामुळे महिन्याभराच्या या शिबिरात ही मुले पोहू शकतात. यापुढे जाऊन या मुलांसाठी प्रगत प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात येते व त्यात स्पर्धात्मक जलतरणाचे विविध प्रकार, तंत्र-मंत्र शिकविली जातात. प्रबोधनच्या जलतरण तलावाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अन्य तलावांप्रमाणे येथे पाण्यात क्लोरिनचा वापर न करता ओझोन वायूचा वापर केल्याने डोळे चुरचुरणे, अंग काळे पडणे, खाज सुटणे, असे प्रकार घडत नाहीत. याचा फायदा असा झाला, की या तलावात आता मुलीदेखील बिनधास्त शिबिरात सामील होत आहेत. कारण त्वचा काळी पडण्याची भीती त्यांना वाटत नाही. ही शिबिरे पाहून भावी जलतरणपटू घडविण्यात प्रबोधन खारीचा वाटा उचलते आहे याची खात्री पटते.