Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

...त्यांना क्रिकेटच कळले नाही- सचिन
दरबान, २९ एप्रिल/ पीटीआय

 

ट्वेंन्टी-२० क्रिकेट हे फक्त युवांसाठीच आहे असे म्हणणाऱ्यांना क्रिकेटच कळले नाही, असे प्रत्यूत्तर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने टीकाकारांना दिले आहे.
ट्वेंन्टी-२० क्रिकेट हे फक्त युवांसाठीच आहे असे कोणीतरी म्हटले होते, मी त्यांना ओळखत नाही. मला फक्त त्यांच्याबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते की त्यांना बहुधा क्रिकेट हा खेळ कळत नसावा. क्रिकेटसारख्या खेळामध्ये तुम्ही किती युवा आहात किंवा किती वयस्कर आहेत याला महत्व नसते. कारण इथे बोलत असते ती फक्त तुमची कामगिरी, असे सचिनने सांगितले.
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर हा आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात भन्नाट फॉर्मात असून त्याने आत्तापर्यंत ८० च्या सरासरीने १६३ धावा फटकाविल्या आहेत. कोलकाता नाइट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात सचिनने सलामीवीर सनथ जयसुर्याच्या साथीने झंझावाती शतकी भागीदारी करीत संघाच्या विजयाचा पाया रचला होता. त्याचबरोबर आत्तापर्यंत त्याने दोनदा सामनावीराचा पुरस्कारही पटकाविला आहे.
गेल्या वर्षांपासून मी सनथबरोबर खेळत असून त्याची फलंदाजी पाहणे ही एक मेजवानीच असते. त्याचे फटके गोलंदाजांची बोलती बंद करणारे असतात. फलंदाजी करताना त्याच्या डोळ्यांचा आणि हाताचा समन्वय फारच चांगला आणि वेगवान असतो. तो एक क्रिकेट जगतातील महान फलंदाज आहे, असे म्हणत सचिनने त्याच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षांव केला आहे.
ट्वेंन्टी-२० क्रिकेटमध्ये सचिनने अर्धशतक झळकाविले असले तरी त्याला एकही शतक करता आलेले नाही. पण शतक पूर्ण करण्यावर भर देण्यापेक्षा संघाचा विजय कसा होईल यावर सचिन जास्त विचार करताना दिसतो आहे.मी शतकासाठी खेळत नाही तर संघाच्या विजयात हातभार लावण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. शतक कसे करता येईल या प्रयत्नात मी नसतो, पण खेळता-खेळता ते झाले तर नक्कीच मला आवडेल. जर माझ्या खेळीने संघाचा विजय होत असेल तर सातत्यपूर्ण कामगिरी करणे ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन, असे सचिन यावेळी म्हणाला.