Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सुपरकिंग्जपुढे रॉयल्सला रोखण्याचे आव्हान
सेन्चुरियन, २९ एप्रिल / पीटीआय

 

इंडियन प्रिमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या दुसऱ्या पर्वात गेल्या तीन लढतीत दोन पराभव स्वीकारणारा चेन्नई सुपरकिंग्जपुढे गतविजेत्या राजस्थान रॉयल्सला रोखण्याचे आव्हान आहे. उद्या, गुरूवारी उभय संघादरम्यान होणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. पाच पैकी केवळ एक लढत जिंकणारा चेन्नई सुपरकिंग्ज संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. गतविजेता राजस्थान रॉयल्सने काल दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध विजय मिळवत सूर गवसल्याचे संकेत दिले आहे. काल मिळवलेल्या विजयामुळे राजस्थान संघाला नवसंजीवनी मिळाली असून त्यांच्या विजेतेपद राखण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या राजस्थानला यापूर्वीच्या लढतीत फलंदाजी ढेपाळल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या विजयात युसूफ पठाण आणि ग्रॅमी स्मिथ यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. युसूफ पठाण व ग्रॅमी स्मिथ यांना सूर गवसल्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या तंबूत नवा उत्साह संचारला आहे. राजस्थानचे गोलंदाज प्रतिस्पध्र्याना रोखण्यात यशस्वी ठरले आहे पण, त्यांना आता फलंदाजांकडूनही अपेक्षित साथ मिळण्याची आशा आहे.
गेल्या वर्षी अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला यावेळी मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने उद्याच्या लढतीत संघात बदल करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहे. दुखापतीमुळे अष्टपैलू अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफने माघार घेतल्यामुळे चेन्नई संघाला धक्का बसला आहे. धोनीला अद्याप सूर गवसलेला नाही. . आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनच्या कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जला यापूर्वीच्या लढतीत आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश आले. चार लढतीत हेडनने ५०च्या सरासरीने सर्वाधिक २१५ धावा फटकावल्या असून त्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे पण, हेडनला संघातील अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही. विश्वविक्रमी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा अपवाद वगळता चेन्नईच्या अन्य गोलंदाजांना प्रभाव पाडता आला नाही. मनप्रित गोनी व लक्ष्मीपती बालाजी यांना अद्याप चमक दाखवता आलेली नाही.
दुसऱ्या बाजूचा विचार करता शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाला विजयी मार्ग गवसल्याचे संकेत मिळत आहे. नवोदित वेगवान गोलंदाज कमरान खान फॉर्मात असून कुठल्याही प्रतिस्पध्र्याविरुद्ध चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. उद्याच्या लढतीत राजस्थानला ग्रॅमी स्मिथकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. कामगिरीत सातत्य राखत विजेतेपद राखण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास कर्णधार वॉर्नने व्यक्त केला.