Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

चार्जर्सचा विजय रथ डेअर डेव्हिल रोखणार काय ?
प्रेटोरिया, २९ एप्रिल / पीटीआय

 

इंडियन प्रिमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात सलग चार विजय मिळवणारा डेक्कन चार्जर्स आणि स्पर्धेत काल पराभवाची चव चाखणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यादरम्यान उद्या, गुरूवारी लढत होत आहे. उद्याच्या लढतीत चार्जर्सचा विजय रथ रोखण्याची दिल्ली डेअरडेव्हिल्सला आशा आहे. गेल्या स्पर्धेत विशेष चमक न दाखवता आलेल्या चार्जर्सने यावेळी मात्र सुरुवातीपासून कामगिरीत सातत्य राखण्यात यश मिळवले आहे. चार्जर्सने कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांना पराभूत करण्याची कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. कर्णधार अ‍ॅड्म गिलख्रिस्ट आणि दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्स सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या पाच फलंदाजांमध्ये गिलख्रिस्ट व गिब्स यांनी स्थान मिळवले आहे. रोहित शर्मा प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरला आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणचा अपवाद वगळता चार्जर्सच्या अन्य फलंदाजांची कामगिरी चमकदार झाली आहे. वेगवान गोलंदाज रुद्रप्रताप सिंग, फिरकीपटू प्रग्यान ओझा यांच्या समावेशमुळे चार्जर्सची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. ओझाने चार लढतीत आठ बळी मिळवत स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या तीन गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे.
दरम्यान, दिल्ली संघाला सलामीच्या जोडीकडून अद्याप अपेक्षित सुरुवात मिळालेली नाही. कर्णधार वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चार्जर्सचा विजय रथ रोखण्यासाठी दिल्लीला उद्याच्या लढतीत या ‘स्टार’ फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सला यापूर्वीच्या विजयात अब्राहम डिव्हिलियर्स आणि तिलकरत्ने दिलशान यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या लढतीत डिव्हिलियर्सने तडफदार शतक झळकावत दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या विजयात उल्लेखनीय योगदान दिले. त्या लढतीत दिलशाननेही अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या लढतीत दिलशानने ६७ धावांची खेळी करत डेअरडेव्हिल्सला सहज विजय मिळवून दिला. दिल्ली डेअरडेव्हिल्सला ग्लेन मॅक् ग्राची उणीव भासत आहे. ड्रिक नॅनेस, आशीष नेहरा आणि प्रदीप सांगवान यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. डॅनियल व्हेटोरी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कालच्या लढतीत अमित मिश्राने तीन बळी घेत उपयुक्तता सिद्ध केली आहे. उद्याच्या लढतीत डेअरडेव्हिल्सला या फिरकीपटूंकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे.