Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

पठाणच्या झंझावाताने हातातून सामना निसटला- सेहवाग
सेंच्युरीयन, २९ एप्रिल/ पीटीआय

 

वीरेंद्र सेहवागच्या दिल्ली संघासाठी काल ‘डेव्हिल’ ठरला तो राजस्थान रॉयल्सचा हुकमी एक्का युसूफ पठाण. त्याच्या झंझावातामुळेच राजस्थान रॉयल्सने पाच विकेट्स राखून सामना जिंकला आणि आमच्या हातातून सामना निसटला, असे मत सेहवागने सामना संपल्यानंतर व्यक्त केले आहे. सामन्याचा ११ व्या षटकानंतर दिल्ली डेअर डेव्हिल्स सामना जिंकेल असे भविष्य एका समालोचकाने व्यक्त केले होते. पण त्याला बहुतेक राजस्थानच्या संघात युसूफ पठाण नावाचा ‘हातोडा’ आहे हे माहित नसावे. नाहीतर त्याने असे तकलादू विधान केले नसते. त्याच्या त्या टिप्पणीनंतर युसूफ फलंदाजीला आला आणि त्याने ३२ चेंडूत ६० धावा करीत सामन्याचे चित्रच पालटवून टाकले. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानच्या संघाने दुसरा विजय संपादन केला असून दिल्लीच्या विजयी रथाला यामुळे ‘ब्रेक’ बसला आहे.
आयपीएलच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्याच पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार सेहवाग म्हणाला की, सामन्यादरम्यान आम्ही दोन झेल सोडले आणि त्याचाच फटका आम्हाला बसला. युसूफसारखा फलंदाज ऐन भरात आल्यावर काय करू शकतो याचा प्रत्यय आम्हाला काल आला. या पराभवासाठी मी कोणालाही दोष देत नाही. कारण पठाण फॉर्मात असला की, त्याच्यापुढे कोणाचे काहीही चालत नाही हे मला चांगलेच ठाऊक आहे, असे सेहवागने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, युसूफ फलंदाजीला आला आणि त्याने गोलंदाजांना पुरते निष्क्रीय करून टाकले. व्हेटोरी एक दर्जेदार गोलंदाज असून युसूफ त्याला फटके मारेल असे मला वाटले नव्हते. पण पठाणने त्याचाही खरपूस समाचार घेतला. तो येण्यापूर्वी सामना आमच्या बाजूने झुकलेला होता. सामन्यावर आमची मजबूत पकड होती. पण युसूफच्या फलंदाजीने ती पकड ढीली झाली. त्याचे फटके हे फ्लूक नव्हते तर ते थेट प्रेक्षकांमध्ये जात होते, त्यामुळे खेळाडूंना ते अडविण्याची कोणतीही संधी नव्हती.
दिल्लीच्या संघाची सेहवाग आणि गंभीर जोडी अजुनही फॉर्मात आलेली नाही आणि ही संघाच्या दृष्टीने काळजीची बाब असेल. संघाची सलामी ही चांगली होत नसून त्यावर आम्ही अधिकाधिक भर देऊ असे मत सेहवागने व्यक्त केले. प्रथम फलंदाजी करताना १६०-१७० धावांचे लक्ष्य आम्ही डोळयापुढे ठेवले होते. पण गंभीर आणि मला चांगली सलामी देता आली नाही आणि आम्हाला फक्त १४३ धावांवरच समाधान मानावे लागले, असे सेहवाग म्हणाला राजस्थानच्या विजयात युसूफचा मोलाचा वाटा होता असे मत कर्णधार शेन वॉर्नने सामन्यानंतर व्यक्त केले. पण यावेळी सलामीवीर गॅ्रमी स्मिथच्या खेळीचेही त्याने कौतुक केले आहे. पठाणच्या खेळीबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत. त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली ते पाहणे डोळ्याचे पारणे फेडणारी होती. पण यावेळी गॅ्रमी स्मिथ यानेही सुरुवातीपासून चांगली फलंदाजी केली. तो खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहिला आणि त्यामुळेच युसूफला फटके खेळणे कठिण गेले नाही. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये आमचे सलामीवीर फॉर्मात नव्हते आणि त्याचाच फटका आम्हाला बसत होता. या सामन्यात स्मिथने चांगली खेळी साकारली असून त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत, असे वॉर्न म्हणाला.