Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

किंग इज किंग
दरबान, २९ एप्रिल / वृत्तसंस्था

 

गतवर्षी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर युवराजसिंगचा पंजाब किंग्ज इलेव्हन आणि सचिन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्स यांच्यात इंडियन प्रीमियर लीगमधील रंगलेल्या सामन्याची पुनरावृत्ती येथील किंग्जमीड स्टेडियमवर झाली. तो रोमहर्षक सामना पंजाबने एका धावेने जिंकला होता. यावेळीही तोच रोमांच कायम राखत पंजाबने मुंबई इंडियन्सवर तीन धावांनी मात केली. कमी धावसंख्येच्या या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना केवळ ११९ धावा केल्या. तरीही मुंबई इंडियन्सला ही धावसंख्या भारी ठरली व २० षटकांत त्यांना ७ बाद ११६ धावसंख्येवरच समाधान मानावे लागले. अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सला १२ धावांची गरज होती. हे षटक टाकणार होता, दक्षिण आफ्रिकेचा युसूफ अब्दुल्ला. पहिल्या चेंडूवर डय़ुमिनीने दोन धावा काढल्या. पण पुढील चेंडूवर डय़ुमिनी चकला व एकही धाव मिळाली नाही. आत्मविश्वास उंचावलेला असतानाही अब्दुल्लाने पुढील चेंडू वाईड टाकला आणि एक आयती धाव मुंबईच्या खात्यात जमा झाली. तिसऱ्या चेंडूवर डय़ुमिनीने पुन्हा दोन धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर मात्र डय़ुमिनी कमनशिबी ठरला. बदली खेळाडू तरुवर कोहलीने सीमारेषेजवळ झेल टिपला तेव्हा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. पाचव्या चेंडूवर सौरभ तिवारीने दोन धावा घेतल्या. अखेरच्या चेंडूवर मुंबईला हव्या होत्या पाच धावा. चौकार बसला असता तर सामना बरोबरीत सुटला असता. मात्र तिवारीने मारलेला जोरदार फटका कव्हर्समध्ये रमेश पोवारने मोठय़ा शिताफीने अडविला आणि केवळ एक धाव काढण्यावाचून मुंबईपुढे पर्यायच उरला नाही. पंजाबने जुन्या आठवणी ताज्या करीत रोमहर्षक विजयाची नोंद केली.
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पंजाबच्या कुमार संगकाराची निवड झाली. त्याने नाबाद ४५ धावांची खेळी केली. मुंबईच्या डय़ुमिनीच्या ५९धावा मात्र संघाला यश मिळवून देऊ शकल्या नाहीत.