Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

आता सारे मतदारांच्या हाती..
ठाणे/प्रतिनिधी -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांमुळे ठाणे, कल्याण, भिवंडी आणि बहुजन विकास आघाडीमुळे पालघरमधील निवडणूक ही राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. जिल्ह्यातील चार जागांसाठी ७४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून उद्या होणाऱ्या मतदानावर राष्ट्रवादीचे वसंत डावखरे, संजीव नाईक आणि आनंद परांजपे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर मतदारसंघातील ६३ लाख ७९ हजार ३३३ मतदार हे सात हजार २२२ मतदान केंद्रांमध्ये मतदानाचा हक्क बजावणार असून एवढय़ा मोठय़ा संख्येने मतदान केंद्रे असणारा ठाणे जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे.

एक दिवस लगीनघाईचा
ठाणे /प्रतिनिधी -
प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आणि प्रत्यक्ष मतदानाला अवघे काही तासच शिल्लक राहिल्यामुळे निवडणुकांचा केंद्रबिंदू असणाऱ्या पक्ष निवडणूक कार्यालयात आज दिवसभर लगीनघाईच होती. प्रत्येकजण ज्याला त्याला नेमून दिलेले काम मार्गी लावण्यात मग्न होते. शिवसेना-भाजपा युतीचे मुख्य निवडणूक कार्यालय असलेल्या ‘सूर्य’ आणि राष्ट्रवादी, काँग्रेसच्या चंदनवाडीतील कार्यालयात आज दिवसभर धावपळीचे वातावरण होते. सोमवारी सायंकाळी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि मतदानाच्या मोर्चेबांधणीच्या रणनीतीला सुरुवात झाली. युतीच्या ‘सूर्य’ कार्यालयात फेरफटका मारला असता रात्रभर मतदान वाढविण्याची रणनीती ठरवून आणि विभागनिहाय प्रमुख कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात होत्या.

डोंबिवलीत होतोय वसंतोत्सव !
डोंबिवली/प्रतिनिधी

हीरक महोत्सवी वर्षांनिमित्त टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सलग दहाव्या वर्षी टिळकनगर शाळेच्या पटांगणात १ ते ५ या कालावधीत ‘वसंतोत्सव २००९’चे आयोजन करण्यात आले आहे. हीरक महोत्सवी वर्षांनिमित्त मंडळाने वर्षभरात १२ सांस्कृतिक कार्यक्रमांचा संकल्प केला होता. त्यात डॉ. सलील कुलकर्णी यांचा ‘संधिप्रकाशात’, तसेच डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा सहा तासांचा ‘आयुष्यावर बोलू काही’, शरद पोंक्षे यांनी ‘नथुराम ते देवराम’, मुकुंदराज देव व सोनिया परचुरे यांचा ‘ड्रम्स अॅण्ड बेल्स’ हा तबला, घुंगरू व नृत्य यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम, तसेच रामदास कामत, प्रल्हाद आफडकर व नीलाक्षी पेंढारकर यांचा ‘नाटय़संगीत रजनी’, कौशल इनामदार यांचा ‘अमृताचा वसा’ अशा दर्जेदार कार्यक्रमांचा समावेश होता.

राष्ट्रवादीचीही शिवसेना स्टाइल संघटन बांधणी
मतदानाची टक्केवारी वाढवणार!

ठाणे/ प्रतिनिधी

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहण्यास त्यांची संघटनात्मक बांधणी हा मोठा घटक आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या यशाचे गमक ओळखून निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी जोरदार केल्याने, या खेपेस मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. प्रभागनिहाय कार्यकर्ते नेमून केलेली मतदारसंघाची विभागणी, त्यांच्यावर लक्ष ठेवायला चार प्रभागांमागे एक निरीक्षक, स्थानिक पोलिंग एजंट यामुळे सेनेच्या पद्धतीने राष्ट्रवादीने देखील मतदानासाठी मजबूत आखणी केली आहे.

एसएमएस प्रचाराने मतदाता त्रस्त
ठाणे/प्रतिनिधी

विकासाच्या मुद्याऐवजी व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपापर्यंत पोहचलेल्या निवडणूक प्रचारात मोबाइलवरील एसएमएसचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जात आहे. आक्षेपार्ह एसएमएससंबंधी तक्रार करण्यासाठी स्वतंत्र सेल निर्माण करण्यात आले असताना कल्याणचे उमेदवार वसंत डावखरे यांची अपवादात्मक तक्रार वगळता एकही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लादलेले एसएमएस नाइलाजास्तव मतदारांना वाचावे लागत आहेत.

‘बदलापुरात सांस्कृतिक भवन उभारावे’
बदलापूर/वार्ताहर

एका लहानशा खानावळीपासून मंगल कार्यालयापर्यंतचा खडतर प्रवासाची २५ वर्षे साजऱ्या करणाऱ्या काटदरे बंधूंनी बदलापुरात सांस्कृतिक भवन उभारावे, असा सल्ला आमदार किसन कथोरे यांनी दिला. २५ एप्रिल रोजी काटदरे मंगल कार्यालयाने २५ वर्षे पूर्ण केली. या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या सोहळ्यात एरवी इतरांच्या लग्नकार्यासाठी सज्ज असणारे कार्यालय रौप्यमहोत्सवानिमित्त शुभेच्छा द्यायला काटदरे बंधूंवर प्रेम करणारे अनेक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या काटदरे बंधूंच्या मिसळीचा किस्सा कथोरे यांनी सांगितला. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या बंधूंनी नव्या व्यावसायिकांना आदर्श घालून दिला. यामागे त्यांचे कुटुंबीय आणि आई-वडिलांची मेहनत होती, असे नगराध्यक्ष राम पातकर यांनी सांगितले. नगरसेवक आशिष गोळे, वामनराव गोळे, श्रीकांत जोशी, डी. बी. पाटील आदींची यावेळी भाषणे झाली.विश्वास काटदरे यांनी खानावळ ते कार्यालय उभारणीतील आठवणींना उजाळा दिला.

ग्रामविकासासाठी ‘बबली की बंटी’
डोंबिवली/प्रतिनिधी-
येथील इनरव्हील क्लब या सेवाभावी संस्थेतर्फे बदलापूरजवळील कुड्राण हे गाव दत्तक घेण्यात आले असून, त्याच्या विकासासाठी सावित्रीबाई फुले नाटय़मंदिरात १२ मे रोजी ‘बबली की बंटी’ या नाटकाचा प्रयोग ठेवला असून, त्याच्या प्रवेशिका खरेदीतून जी रक्कम जमा होईल, ती ग्रामविकासासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रसिकांनी हे नाटक पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे. या क्लबतर्फे प्रौढ साक्षरता प्रसार, पोलिओ लसीकरण, वैद्यकीय शिबिरे व मोफत औषधे वाटप आदी विविध कार्य केले आहे. प्रवेशिकांसाठी अध्यक्षा डॉ. अनुराधा गोपालन ९८३३४५८००४ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाडा तालुक्यात शेतकरी मंडळाची स्थापना
ठाणे/प्रतिनिधी

मौजे गोराड, ता. वाडा येथे ‘श्री गणेश’ शेतकरी मंडळाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्राचे उपमहाव्यवस्थापक उत्तम पवार, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी पाटील, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक अनंत घाटे, तसेच परिसरातील ग्रामस्थ व बचत गटांच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करणे परवडत नाही, असे सांगितले. शाखा व्यवस्थापक प्रभाकर परब यांनी सेवा क्षेत्रातील गावांमध्ये शेतकरी मंडळ स्थापनेबाबत विचार व्यक्त केले. नाबार्डच्या पाटील यांनी शेतकरी मंडळाबाबतचे नाबार्डचे धोरण विशद केले. अनंत घाटे यांनी कृषी कर्जाबाबत माहिती दिली व शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या उत्पन्नात वाढ करण्याचे आवाहन केले. एकजुटीचे महत्त्व सांगून शेतकरी मंडळांच्या सर्व सभासदांना सामूहिक विकासासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. अध्यक्षीय भाषणात उत्तम पवार यांनी कृषीकर्जाबाबत मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांच्या सर्व आर्थिक गरजांची बँकेच्या धोरणानुसार पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमात महिला बचत गटास शेतीविषयक कर्जमंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.

स्व. कृष्णराव केतकर कलादालनाचे उद्या उद्घाटन
कल्याण/ प्रतिनिधी

दिवंगत चित्रकार कृष्णराव केतकर यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या कलादालनाचे उद्घाटन १ मे रोजी डोंबिवली एमआयडीसीतील ज्येष्ठ शिल्पकार भाऊ साठे यांच्या शिल्पालयात करण्यात येणार आहे. यावेळी निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या मीनल बजाज उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी जगद्विख्यात चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन १ ते ७ मे या कालावधीत शिल्पालयात आयोजित केले
आहे. यामध्ये कृष्णराव केतकर, गोपाळ देऊसकर, नेत्रा साठे, ज. द. गोंधळेकर, निवेदिता लिमये, मुरलीधर आचरेकर, अल्पना लेले यांच्या चित्रांचा समावेश आहे. हे प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत रसिकांना खुले आहे, असे शिल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीरंग साठे यांनी सांगितले.
संपर्क- शिल्पालय,
ए-१३२, एमआयडीसी,
फेज-१, डोंबिवली, दूरध्वनी-२४४३०९१.