Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
व्यक्तिवेध

बाकी साऱ्यांसाठी निवडणुकीचा आणि ट्रेकर्ससाठी खास भटकंतीचा असलेला सध्याचा मोसम. मात्र एका धक्कादायक बातमीने तो अचानक शोकाकुल वातावरणात बदलला. महाराष्ट्रातील तमाम गिर्यारोहकांना विशेषत: हिमालयीन मोहिमा करणाऱ्यांना परवा म्हणजे २५ एप्रिलला हिमालयातून आलेल्या या बातमीने हेलावून सोडले. गिर्यारोहण, पदभ्रमणावर मनापासून प्रेम करणारा सह्याद्रीचा एक सुपुत्र आपण पराग सहस्रबुद्धेच्यारूपाने गमावला. ४२ हे काही तसे मृत्यू येण्याचे वय नाही. गिर्यारोहकांना तसे मृत्यूचे भय नसतेही. किंबहुना म्हणूनच तर ते निधडय़ा छातीने अनेक मोहिमांना सामोरे जातात. परागही त्यातीलच एक होता. अगदी सर्वाना

 

अभिमानास्पद वाटणाऱ्या एव्हरेस्ट मोहिमेपर्यंत जाऊन आलेला. मृत्यू, मग तो कोणाताही असो, दुखदच असतो. पण परागचा मृत्यू सर्वाच्या काळजाला चटका लावून गेला कारण तो खूपच तरुणपणी गेला. त्याच्याकडून गिर्यारोहणक्षेत्राला खूप अपेक्षा होत्या. पदभ्रमणासाठी जावे आणि पाय घसरून खोल दरीत पडावे, याशिवाय दुसरा दैवदुर्विलास तो काय म्हणावा? परागने ‘गिरीविहार’ संघटनेमधून पदभ्रमण आणि गिर्यारोहणाला सुमारे २० वर्षांपूर्वी सुरुवात केली. त्या काळात त्याने सह्याद्रीची दऱ्याखोरी पादाक्रांत केली आणि अनेक सुळके यशस्वीरीत्या सर केले. प्रस्तरारोहण- रॉक क्लाइंबिंग- या क्रीडाप्रकाराची त्याला विशेष आवड होती. सह्याद्री बव्हंशी फिरून झाल्यानंतर त्याला हिमालय खुणावू लागला. त्यासाठी त्याने दार्जििलग येथील ‘हिमालयन माऊंटेनिअरिंग इन्स्टिटय़ूट’मधून गिर्यारोहणाचे बेसिक व अ‍ॅडव्हान्स कोर्स पूर्ण केले. त्यामुळेच पुरेशा तयारीनिशी असलेला हिमालयातील अनेक मोहिमांमधला त्याचा सहभाग यशस्वी झाला. गंगोत्री एक, देवतिब्बा, शैल कोटेश्वर या त्यातीलच काही मोहिमा. याशिवाय अतिशय खडतर मानला गेलेला ‘मुंबई ते लेह’ हा तब्बल तीन हजार किलोमीटरचा सायकलप्रवासही परागने पूर्ण केला होता. अशा प्रकारे एका मागोमाग एक मानाचे तुरे शिरपेचात खोवत पुढे जाताना १९९८ साली महाराष्ट्राच्या गिर्यारोहकांची ती ऐतिहासिक एव्हरेस्ट मोहीम ठरली. तिचे नियोजन करताना पराग सहस्रबुद्धेचे नाव घेतले गेले. या आव्हानात्मक मोहिमेसाठी त्याचा फिटनेस उत्तम होता. हिमालयातील मोहिमांमध्ये गिर्यारोहकाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो. एव्हरेस्ट शिखरचढाईच्या मोहिमेत १३ जणांचा सहभाग होता. त्यातील पाच जणांकडे मोहिमेची आखणी आणि मदतीची कामगिरी होती तर उर्वरित आठ जणांची निवड क्लायंबिंगसाठी- प्रत्यक्ष चढाईसाठी करण्यात आली होती. परागचा त्या चमूत समावेश होता. त्याचा फिटनेस तिथेही चांगला लक्षात आला होता. नंतर तो चौथ्या कॅम्पवरच थांबला होता. खरे तर तो आणि एव्हरेस्ट सर करणारा सुरेंद्र चव्हाण असे दोघेही पुढे जाणार होते. ते २५ हजार फुटांपर्यंत वरती गेलेही होते. मात्र नंतर अचानक वातावरण बदलले आणि खराब हवामानामुळे गिर्यारोहकाऐवजी एक शेर्पा वरती नेण्याचा निर्णय घेण्यात आला. एव्हरेस्टवर चढाई करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचून त्याला स्पर्श करण्याची संधी न मिळणे ही गिर्यारोहकाला खट्टू करणारी बाब! पण त्याविषयी चकार शब्दही न काढता उर्वरित पूर्ण मोहीम परागने तेवढय़ाच तत्परतेने आणि उमेदीने पूर्ण केल्याची आठवण एव्हरेस्ट मोहिमेचे शिल्पकार हृषिकेश यादव नेहमीच सांगतात. गिर्यारोहणातील अशा मोहिमांमध्ये आपल्यातील संघभावनेचाही कस लागतो. परागने त्या मोहिमेत संघभावनेचा एक चांगला आदर्श सर्वासमोर ठेवला. त्याच मोहिमेत बेस कॅम्पला जाण्यापूर्वी खूप बर्फ पडले होते. त्या वेळेस सामानाची ने-आण माणसांतर्फे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा परागने स्वत पुढे होत ती जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली होती. पण पराग सर्वाना खऱ्या अर्थाने लक्षात राहिला तो कॅम्प फायरमुळे! त्याच्या सोबत पदभ्रमण केलेल्या सर्वानाच त्याने गाजविलेले कॅम्प फायर लक्षात आहेत. मोहिमांमधील ताणतणाव कॅम्प फायरमध्ये दूर होतात. अगदी मृत्यूच्या आदली रात्रही त्याने खोडकर आणि मोकळ्या स्वभावाने अशीच जागवली होती. पण ती त्याची शेवटची रात्र होती, हे कुठे कुणाला ठाऊक होते?