Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९

दारुडय़ा बापाची हत्या, पुत्राला अटक
अमरावती, २९ एप्रिल / प्रतिनिधी

दररोज दारू पिऊन घरात भांडण करणाऱ्या पित्याविषयी राग अनावर झाल्याने एका युवकाने त्याच्या पित्याची विळ्याने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हत्येच्या आरोपावरून गाडगेनगर पोलिसांनी युवकाला अटक केली आहे. राहुल बाळू झंझाड (रा. भीमनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुलची आई कुसूम हिने गाडगेनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

रामाळा तलावात आणखी ५० किलो काडतुसे सापडली!
चंद्रपूर, २९ एप्रिल/ प्रतिनिधी

शहरातील रामाळा तलावात बुधवारी पुन्हा ५० किलो जिवंत काडतुसे सापडल्याने पोलिसांना धक्काच बसला आहे. या काडतुसांचा वापर पोलीस यंत्रणेकडून होत असला तरी ती नक्षलवाद्यांनी लुटीतून मिळवलेली असावी, अशी शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. रामाळा तलावाच्या साफसफाईचे काम सध्या सुरू आहे. बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास तलावाला लागून असलेल्या पाचदेवळाजवळच्या परिसरात खेळणाऱ्या मुलांच्या हाती काही काडतुसे लागली. सफाईचे काम करणाऱ्या मजुरांनी लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

योजनांचा पाऊस, पाण्याचा मात्र ठणठणाट
अकोला, २९ एप्रिल / प्रतिनिधी

पाणीटंचाईने सर्वत्र कळस गाठला असतानाच कोटय़वधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना जाहीर करून नागरिकांना पोकळ दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. पाण्यासाठी पायपीट करणारे नागरिक मात्र या घोषणांमुळे संतापले असून या योजनांचे पाणी मिळणार तरी कधी? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. पाणीपुरवठय़ाच्या अनेक योजना अकोला जिल्ह्य़ात अर्धवट स्थितीत आहेत. या योजनांवर कोटय़वधी रुपये खर्च झाले आहेत. या योजनांचे पाणी नागरिकांपर्यंत कधी पाहोचणार हा प्रष्टद्धr(२२४)न सध्या तरी अनुत्तरित आहे.

ग्राम निधी गैरव्यवहाराची चौकशी प्रलंबित
बुलढाणा, २९ एप्रिल / वार्ताहर

जिल्ह्य़ातील तेरा तालुक्यातील ४०८ ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी व जवाहर रोजगार योजनेतील १ कोटी ७१ लाख १० हजार ६४१ रुपयांच्या गैरव्यवहाराची प्रकरणे गेल्या दोन वर्षांपासन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्यासमक्ष ग्रामपंचायत विभागामार्फत चौकशी अधिकारी नेमण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप या प्रकरणाची चौकशी झाली नाही. त्यामुळे ही रक्कम जिल्हा परिषदकडे जमा झालेली नाही. सरपंच भेटले नाहीत.

जैन कलार समाज सांस्कृतिक भवनाचे रविवारी लोकार्पण
भंडारा, २९ एप्रिल / वार्ताहर

जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळाच्यावतीने जिल्ह्य़ातील लाखनी (सावरी) परिसरात खेडेपार मार्गावर बांधण्यात आलेल्या जैन कलार समाज सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण रविवार ३ मे रोजी सकाळी ९ वाजता नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार राहणार आहेत. या कार्यक्रमास राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, आमदार सेवक वाघाये, आमदार केशव मानकर, आमदार आशीष जयस्वाल, जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र दुरुगकर उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण विद्युतीकरण योजनेला मुदतवाढ
गोंदिया, २९ एप्रिल / वार्ताहर

केंद्र शासन पुरस्कृत राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेला येत्या ३० जून २००९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बीपीएल यादीमध्ये नाव असलेल्या ज्या कुटुंबाच्या घरात अद्याप विद्युत कनेक्शन लागलेले नाही, अशा कुटुंबाने फक्त १५ रुपये भरून आपल्या घरी विद्युत कनेक्शन लावावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पी.एम. माटे यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत प्रथम टप्प्यात महाराष्ट्रातील नांदेड, सोलापूर व धुळे या जिल्ह्य़ाबरोबर गोंदिया जिल्ह्य़ाची निवड करण्यात आली होती व ९१ हजार बीपीएल कुटुंबाकडे विद्युत कनेक्शन पुरवण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. अधीक्षक अभियंता माटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २००९ पर्यंत जिल्ह्य़ातील ६४ हजार २०९ बीपीएल कुटुंबाकडे विद्युत कनेक्शन लावण्यात आले. मात्र, अजूनही बरेच लाभार्थी आहेत. ज्यांच्याकडे विद्युत कनेक्शन लावण्यात आलेले नाही. ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीजपुरवठा उपलब्ध करून १०० टक्के विद्युतीकरण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत ज्या गावातील १०० टक्के बीपीएल धारकांकडे विद्युत पुरवठा केला जाईल, त्या गावातील सरपंचाचा विद्युत विभागाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव केला जाणार आहे. १०० टक्के विद्युतीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन माटे यांनी केले आहे.

डॉ. नीळकंठ भुसारी यांच्या संशोधन प्रकल्पाला ‘यु.जी.सी.’ ची मान्यता
वरूड, २९ एप्रिल / वार्ताहर

महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीळकंठ भुसारी याच्या ‘सातपुडा पर्वतराजीतील जैवविविधतेचा अभ्यास’ या संशोधन प्रकल्पाला विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली असून त्यासाठी जवळपास ५ लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जैवविविधतेचा कसा उपयोग करता येईल, यावर या प्रकल्पात विशेष भर दिला जाणार आहे. पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक चक्रे सुरळीतपणे चालवण्यासाठी, सजीवांसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य इत्यादी नैसर्गिक गरजा भागवण्यासाठी जैवविविधतेचा मोठा उपयोग होतो. डॉ. भुसारी यांनी यापूर्वीसुद्धा अनेक संशोधन प्रकल्प व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध विविध स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत. या प्रकल्पांतर्गत त्यांचे सहयोगी संशोधक म्हणून डॉ. सुनील कोंडूलकर आणि प्रा.ओ.एस. देशमुख काम करणार आहेत.

वरोऱ्यात वीरमाता रुखमा खिरटकरांचा सत्कार
वरोरा, २९ एप्रिल / वार्ताहर

स्फूर्ती स्पोर्टिगच्या वतीने मुंबईत दहशतवाद्यांशी लढणारे शूरवीर संदीप खिरटकर यांच्या मातोश्री रुखमा खिरटकर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. खासदार हंसराज अहीर यांच्या हस्ते खिरटकर यांना गौरवण्यात आले. स्फूर्ती स्टेडियममध्ये झालेल्या या कार्यक्रमास नगरपालिकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम खिरटकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नरेंद्र आसेकर, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, शांताराम बरबटकर, अशोक सोनटक्के, सुनीता कारूडे उपस्थित होते. स्फूर्ती स्पोर्टिग क्लबने देशाला व्हॉलीबाल खेळाचे दर्जेदार खेळाडू दिले आहेत. गेल्या २६ नोव्हेंबरला मुंबईत दहशतवाद्यांशी दोन हात करणारे शूरवीर संदीप खिरटकर यांनाही स्फूर्ती स्पोर्टिग क्लबने घडवले, असे गौरवोद्गार हंसराज अहीर यांनी यावेळी काढले. याच कार्यक्रमात राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करणाऱ्या स्वप्निल चौधरी, आकाश तोडासे, इक्राम पटेल, सागर कुरेकार, निशी भत्ते, लीना मत्ते या खेळाडूंचा अहीर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक विनोद पद्मावार यांनी केले. संचालन विनोद ऊमरे यांनी केले. आभार राजीव दोडके यांनी मानले.

करंजेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश
साकोली, २९ एप्रिल / वार्ताहर

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने घेण्यात आलेल्या गेट या स्पर्धा परीक्षेत बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या येथील बी.फार्म अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे. या महाविद्यालयाचे सात नियमित व पाच माजी असे एकूण बारा विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले आहेत. नियमित विद्यार्थ्यांपैकी हेमंत मांडलिक, भास्कर संग्रामे, पल्लवी निखाडे, महेंद्रसिंग चव्हाण, अश्विन बसेशंकर, गणेश मिसाळ आणि महेंद्र खंडारे हे विद्यार्थी उच्च गुण घेऊन पात्र झाल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना एम.फार्म करिता प्रवेश निश्चित आहे. महाविद्यालयाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, सचिव डॉ. वंृदा करंजेकर, प्राचार्य शेंडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

भारनियमन बंद करण्याची मागणी
चंद्रपूर, २९ एप्रिल/ प्रतिनिधी

कडक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत असतानाच भारनियमनामुळे गडचांदूर परिसरातील नागरिक मेटाकुटीस आले आहेत. गडचांदूरहा औद्योगिक परिसर असल्यामुळे दाहकता अधिक प्रमाणात दिसून येत आहे. भरदुपारी भारनियमन सुरू असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम होत आहे. औद्योगिक परिसरातील गडचांदूर, नांदा, बीबी, आवारपूर, उपरवाही, पिंपळगाव आदी गावात विद्युत कंपनीने तीन दिवस सकाळी तर तीन दिवस भरदुपारी भारनियमन सुरू केले आहे. दुपारचे भारनियमन बंद करण्याची मागणी कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यअभियंता यांना निवेदन देऊन केली आहे. भारनियमनामुळे पिकावरही विपरीत परिणाम होत आहे. गडचांदूर परिसरातील छोटे दुकानदारही त्रस्त झाले आहेत. या भागातील भारनियमन त्वरित बंद करण्याची मागणी होत आहे.

राजधानी एक्स्प्रेसमधून पडून तरुणाचा मृत्यू
चंद्रपूर, २९ एप्रिल/प्रतिनिधी

भरधाव जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बाबुपेठ परिसरात घडली. मृताची ओळख वृत्त लिहेपर्यंत पटली नाही. याप्रकरणी शहर पोलिसांनी मृत्यूची दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. आर. नाले करीत आहेत. विवाहितेचा छळ, आरोपींविरुद्ध गुन्हा माहेरून पैसे आणावे या मागणीसाठी सतत वर्षभर पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण करणाऱ्या कुटुंबीयांवर वरोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरोरा येथील रामंदिर वॉर्डातील गौरी आशीष पाठक(२५) हिने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गौरीला माहेरून पैसे आणावे या मागणीसाठी ३१ डिसेंबरपासून पाठक कुटुंबीय शारीरिक छळ करून मारहाण करीत होते. अखेर गौरीने पती आशीष अशोक पाठक, अशोक लक्ष्मण पाठक व अश्विनी पाठक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केला.

नरनाळा अभयारण्यात पर्यटकांना ९ मे पासून प्रवेश बंदी
आकोट, २९ एप्रिल / वार्ताहर

आकोट वन्यजीव विभागांतर्गत नरनाळा वान व अंबारवा या अभयारण्यात ९ मे ते १६ मे दरम्यान वन्यजीव प्रगणना करण्यात येणार आहे. या काळात अभयारण्यात पर्यटकांसाठी प्रवेश बंदी राहणार आहे. ९ मे रोजी पाणवठय़ावरील प्रगणनेला सुरुवात होईल तर १३ ते १६ मे च्या दरम्यान पदचिन्ह प्रगणना करण्यात येईल. या प्रगणनेदरम्यान वन्यजीव पाहण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळणार आहे. या गणनेमुळे ९ मे ते १६ मे या कालावधीत अभयारण्यात पर्यटकांकरिता पूर्णपणे प्रवेश बंदी ठेवण्यात येणार आहे. ९ व १० मे रोजी नरनाळ्यासह वान व अंबारवा सुद्धा बंद राहील तर १३ ते १६ मे दरम्यान वान, अंबारवा अभयारण्यात सकाळी ११ वाजेपर्यंत प्रवेश बंदी राहील, असे कळवण्यात आले आहे. प्रगणनेच्या पूर्व तयारीसाठी उपवनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी शहानूर पर्यटन संकुलात वनपरिक्षेत्र अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची सभा झाली.
येत्या ५ मे रोजी वन्यजीव विभागाच्या वन्यजीव प्रगणने संदर्भात आकोट येथील वनविश्रामगृहावर निसर्गप्रेमींसह वन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

सवरेपचार रुग्णालयात पेईंग वॉर्ड बंद, रुग्णांची गैरसोय
अकोला, २९ एप्रिल / प्रतिनिधी

सवरेपचार रु ग्णालयातील पेईंग वॉर्ड अनेक दिवसांपासून बंद असून, या वॉर्डात उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांची यामुळे गैरसोय होत आहे. रुग्णालयातील पेईंग वार्ड त्वरित सुरू करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार जगन्नाथ ढोणे यांनी केली आहे.
रुग्णालयातील पेईंग वॉर्ड बंद करण्यात आल्यामुळे, रुग्णांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. अनेक अधिकारी, पुढारी, नोकरवर्ग आणि व्यापारीवर्ग या वॉर्डात उपचार घेण्यासाठी दाखल होतात. पेईंग वॉर्ड बंद झाल्यामुळे अशा रुग्णांची गैरसोय होत आहे. पेईंग वॉर्ड त्वरित सुरू करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. ढोणे यांनी केली आहे. सध्या रुग्णांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रुग्णांना सुविधा पुरवल्या जात नसून, डॉक्टर आणि अन्य कर्मचारीही गैरहजर राहत असल्यामुळे उपचारामध्ये दिरंगाई होते. रुग्णालयातील सावळा गोंधळ कमी करण्यात यावा, प्रशासनात सुधारणा करून रुग्णांना सुविधा पुरवण्यात याव्या, असेही डॉ. ढोणे यांनी म्हटले आहे.

बसच्या धडकेने दोघे जखमी
खामगाव, २८ एप्रिल / वार्ताहर

नांदुऱ्यावरून खामगावला येत असताना एमआयडीसी वळणावर दुचाकीस धडक दिल्याने दोघे जखमी झाले. दोघांची प्रकृती गंभीर आहे. प्राप्त माहितीनुसार दिनकर तुकाराम लांडे व यशवंत वासुदेव कोलते (रा. डिघी) हे दोघे टीव्हीएस स्टार सिटी (एमएच २८ पी २५९२) ने नांदुरा येथून डालडय़ाचे डबे घेऊन खामगावला येत होते. दरम्यान, खामगाव- नांदुरा बस (एमएच ३१-९३७३) नांदुऱ्याकडे जात असताना एमआयडीसी वळणावर सदर अपघात झाला. अपघात एवढा भयानक होता की, एसटीच्या समोरील चाकात दुचाकी अडकली तर दिनकर लांडे हे त्यात फसलेले होते. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी घटनेचा प्रत्यक्षदर्शी ऑटोचालक अशोक संपत वाघ रा. लांजुड यांच्या तक्रारीवरून एसटी चालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.