Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० एप्रिल २००९
विविध

भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये २६/११ चा हल्ला अडथळा ठरू नये -इम्रान खान
इस्लामाबाद २९ एप्रिल/पीटीआय
भारत-पाकिस्तान यांचे संबंध तेल आणि पाण्यासारखे एकमेकांना दूर लोटणारे नसावेत तर दूध व लोण्यासारखे एकमेकात मिसळायला लावणारे असावेत. २६ नोव्हेंबरला मुंबईत झालेला हल्ला ही भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांसाठी पायाभूतरेषा मानली जाऊ नये किंबहुना हे संबंध या एका घटनेत अडकून ठेवू नयेत, असे मत पाकिस्तानी क्रिकेटपटू व राजकीय नेते इम्रान खान यांनी आज व्यक्त केले.

‘रिन्यूएबल एनर्जी’च्या निर्मितीक्षेत्रात भारत व अमेरिकेदरम्यान उत्तम सहकार्य प्रस्थापित व्हावे - ओबामा
वॉशिंग्टन, २९ एप्रिल/पीटीआय
पुर्नवापर करता येण्याजोग्या उर्जेच्या (रिन्यूएबल एनर्जी) निर्मितीसाठी क्षेत्रामध्ये भारत व अमेरिकेदरम्यान उत्तम सहकार्य प्रस्थापित करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची इच्छा आहे. हवामानातील बदल या विषयावरील पंतप्रधानांचे विशेष दूत श्याम सरन यांनी आज ओबामा यांची भेट घेतली. त्यावेळी ओबामा यांनी हे मत मांडले. या महिन्याच्या प्रारंभी लंडन येथे झालेल्या भेटीत बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबरोबर हवामानातील बदल व ऊर्जा सुरक्षा या विषयांवर सविस्तर चर्चा केली होती.

‘पृथ्वीवरील जीवसृष्टी धूमकेतूंमुळे निर्माण झाली’
तेल अवीव विद्यापीठातील संशोधनाचा निष्कर्ष
लंडन, २९ एप्रिल/पीटीआय
आकाशात अवचितपणे अवतरणाऱ्या धूमकेतूंविषयी सर्वानाच कुतूहल आहे. वैज्ञानिकांनी या कुतूहलात आता आणखी भर टाकली असून, पृथ्वीवरील जीवसृष्टी या धूमकेतूंच्या माध्यमातून निर्माण झाली असावी असे त्यांचे म्हणणे आहे. तेल अवीव विद्यापीठातील प्रा. अकिवा बार-नन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धूमकेतूंचा अभ्यास केला असता त्यांच्या असे लक्षात आले, की पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली त्या वेळच्या प्रक्रियेतील हरवलेल्या घटकांचा मूळ स्रोत म्हणजे हे धूमकेतू आहेत. इकारस नियतकालिकाने या संशोधनाची माहिती दिली आहे.

काँग्रेसच्या पालखीचे भोई बनण्याची आम्हाला इच्छा नाही - प्रकाश करात
नवी दिल्ली, २९ एप्रिल/पीटीआय

लोकसभा निवडणुकांनंतर तिसऱ्या आघाडीत अधिकाधिक पक्ष सामील होतील असे भाकित करून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) सरचिटणीस प्रकाश करात यांनी सांगितले की, केंद्रात सरकार स्थापनेसाठी काँग्रेसला डावे पक्ष अजिबात पाठिंबा देणार नाहीत. काँग्रेसच्या पालखीचे भोई बनण्याची आम्हाला इच्छा नाही.

निवडणूक आयोगाची दिग्विजय यांना ताकिद
नवी दिल्ली, २९ एप्रिल/वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्यावर सीबीआयतर्फे कारवाई करू, असा इशारा देणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याचे मान्य करीत निवडणूक आयोगाने त्यांना सक्त ताकिद दिली आहे. आपल्या वक्तव्याबद्दल सिंग यांनी चार दिवसांपूर्वी पाठविलेला खुलासा आयोगाने फेटाळून लावला. आपण मंत्री अथवा सरकारी पदाधिकारी नसून काँग्रेसचे सरचिटणीस आहोत, त्यामुळे सरकारी अधिकाराचा आपण गैरवापर केलेला नाही, असा युक्तिवाद सिंग यांनी केला होता. निवडणूक आयोगाने तो धुडकावला. सिंग यांचे वक्तव्य म्हणजे सरकारी अधिकाराचा गैरवापर असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई येथील सभेत २० एप्रिल रोजी सिंग यांनी हे बेफाम वक्तव्य केले होते. ‘मायावती या काँग्रेस कार्यकर्त्यांना छळत आहेत. त्यांनी हे लक्षात ठेवावे की त्यांच्याविरोधातील एक प्रकरण सीबीआयकडे पडून आहे. आम्ही तपास यंत्रणेचा गैरवापर करू इच्छित नाही पण तसे करू शकतो,’ असा इशारा सिंग यांनी दिला होता. त्यांच्या भाषणाची चित्रफीत पाहून २५ एप्रिल रोजी आयोगाने त्यांच्यावर नोटीस बजावली होती.

उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत ४० कोटय़धीश नशीब आजमावणार
लखनौ, २९ एप्रिल/पीटीआय

उत्तर प्रदेशात गुरुवारी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीत ४० कोटय़धीश, तीन डझन गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे उमेदवार आणि काही राष्ट्रीय नेते आपले नशीब आजमावणार आहे. उत्तर प्रदेश राज्यातील १५ लोकसभा मतदारसंघात उद्या निवडणूक होणार आहे.तिसऱ्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राय बरेली या मतदारसंघातून आपली विजयी घोडदौड कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल. याशिवाय बहुजन समाज पक्षाचे अखिलेश दास गुप्ता आणि भाजपचे लालजी टंडन यांच्यातील लखनौमधील लढतीलकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. गुप्ता यांची मालमत्ता ५४ कोटी रुपये आहे.२००४च्या सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पार्टीने १५ पैकी सहा जागा जिंकण्याची करामत दाखविली होती. तथापि, कट्टर प्रतिस्पर्धी बहुजन समाज पक्षाने पाच जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी दोन खासदार निवडून आले होते. राय बरेली आणि लखनौ या जागी महत्त्वाचे राष्ट्रीय नेते उभे असल्याने तिसऱ्या टप्प्यात ते सर्वात प्रतिष्ठेचे ठरणार आहे.१९९१नंतर लखनौ जागेवर भाजपचेच वर्चस्व दिसून आले आहे. अटल बिहारी वाजपेयी सक्रिय राजकारणातून दूर राहिल्यामुळे यंदा या जागेकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. परंतु खरी लढत मात्र भाजपचे टंडन आणि बसपाचे गुप्ता यांच्यात आहे. याचप्रमाणे काँग्रेसच्या रीता बहुगुणा जोशी आणि सपाच्या नफिसा अली यांच्यामुळेही लखनौतील जागेवर जोरदार लढत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

आगाऊपणे लोकल चालविल्याने भीषण अपघात; सहा ठार
चेन्नई, २९ एप्रिल / पी. टी. आय.

चेन्नई नजीकच्या व्यासरपाडु जिवा उपनगरी रेल्वे स्थानकानजीक आज झालेल्या एका विचित्र रेल्वे अपघातात सहा जण ठार झाले, तर अन्य ११ जण जखमी झाले.
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मूर मार्केट रेल्वे यार्डातून दोघा अज्ञात इसमांनी बेकायदेशीररीत्या इएमयू गाडी सुरू केली. गाडी अधिकृतपणे सुटली, असे समजून काही प्रवासीही गाडीत चढले. मात्र गंमत म्हणून त्या दोघांनी सुरू केलेल्या त्या गाडीवर त्यांना नियंत्रण राखता आले नाही. सात किलोमीटर ही गाडी अतिशय वेगाने पळत गेली आणि पुढे एका मालगाडीवर आदळली त्यामुळे भीषण अपघात झाला.
अपघातात गाडी चालविणारे दोघेही ठार झालेच; पण अन्य चौघांचे प्राणही गेले, तसेच इतर ११ जण जखमी झाले. ज्या मालगाडीवर ही गाडी आदळली तिच्या चालकांनी आपल्या दिशेने वेगाने गाडी येत असून ती अनियंत्रित असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी इंजिनातून उडय़ा मारल्याने ते वाचले. या अपघाताची चौकशी केली जाईल, असे रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी सांगितले. अपघातांतील मृतांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे.

लिट्टेकडून घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कर सतर्क
नवी दिल्ली, २९ एप्रिल/पी.टी.आय.
लिट्टेकडून भारतीय हद्दीमध्ये होणारी संभाव्य घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराच्या जवानांसह नौदल आणि तटरक्षक दलाच्या सैनिकांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तटरक्षक दल आणि नौदलाचे जवान प्रथमच दक्षिणी समुद्र किनारपट्टीवरून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. लिट्टेकडून घुसखोरी रोखण्यासाठीच ही खास उपाययोजना करण्यात आल्याचे लष्कराचे व्हाइस चीफ लेफ्टनंट जनरल नोबल थंबुराज यांनी सांगितले. लिट्टेकडून आतापर्यंत तसे प्रयत्न झाले आहेत काय असा प्रश्न विचारता ते म्हणाले की आतापर्यंत तसे प्रयत्न झाल्याची कोणतीही खबर आलेली नाही. घुसखोरी तात्काळ लक्षात येण्यासाठी लष्कराने अनेक टेहळणीची अनेक तांत्रिक उपकरणे प्रत्यक्ष दक्षिणी सीमेवर तैनात केली असून जवान सतर्क असल्याचे ते म्हणाले.

गांधीनगरमध्ये अडवाणी यांचे मतदान नाही
अहमदाबाद, २९ एप्रिल/पी.टी.आय.
गांधीनगर मतदारसंघातून पाचव्या खेपेस लोकसभेची निवडणूक लढवत असलेले लालकृष्ण अडवाणी व त्यांच्या पत्नी यांची नावे तेथील मतदारांच्या यादीत नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे या दोघांची नावे येथील मतदार यादीतून गायब झाली आहेत. मात्र, अहमदाबाद पश्चिम मतदारसंघाच्या पुनर्रचनेत शाहपूरमधील भराडियावास येथील पालिका शाळेच्या मतदान केंद्रावरून मात्र ते मतदान करू शकणार आहेत. गांधीनगर मतदारसंघात रानीप भागात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव आहे. मात्र अडवाणी यांचे हुकलेले मत मोदी यांच्या मतामुळे भरून निघणार आहे.

पाकिस्तानात ५० अतिरेकी ठार; बुनेर तालिबानमुक्त!
इस्लामाबाद, २९ एप्रिल/पी.टी.आय.

पाकिस्तानी लष्कराने आज केलेल्या हवाई हल्ल्यात ५० तालिबानी ठार झाले. या कारवाईत सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण असलेल्या बुनेर प्रांतातून तालिबान्यांना हुसकावून लावण्यात पाकिस्तानी लष्कराला यश आले. लष्कराच्या स्वतंत्र मोहिमेत तालिबान्यांनी बंधक बनवलेल्या सीमेवरील ७० पोलीसांपैकी १८ जणांना मुक्तही करण्यात आले. त्याचप्रमाणे तालिबान्यांच्या ताब्यात असणाऱ्या पोलीस चौक्या आणि इमारतींमधून त्यांना हुसकावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बुनेर प्रांतातील बहुतांश भाग पाकिस्तानी लष्कराने पुन्हा ताब्यात घेतल्याचेही लष्करी प्रवक्ते मेजर जनरल अथर अब्बास म्हणाले. सुमारे ५०० तालिबान्यांनी बुनेर प्रांतावर वर्चस्व प्रस्थापित करून पाकिस्तानसमोर पेच निर्माण केला होता. आजच्या कारवाईत तालिबान्यांना स्वात खोऱ्याकडे हुसकावून लावण्यात आले. दरम्यान, अमेरिकन ड्रोन विमानाने दक्षिण वझिरिस्तानातील अतिरेक्यांच्या तळांवर केलेल्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात १० अतिरेकी ठार झाले आहेत. तालिबानी संघटनेचा म्होरक्या कमांडर बैतुल्ला मसूद याचा प्रभाव असलेल्या कनिग्राम भागात ही कारवाई करण्यात आली.

निवडणूक कर्मचाऱ्यांचे ‘ट्रेकिंग’
सिलिगुडी, २९ एप्रिल / पी.टी.आय.

खांद्यावरील सॅकमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक यंत्र, मतदार याद्या असे मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व साहित्यांसह निवडणूक कर्मचाऱ्यांना सध्या ट्रेकिंग करावे लागत आहे. त्याला कारणही तसेच आहे. आयोगाने निवडणूक कामासाठी प्राण्यांचा वापर करण्यास बंदी घातल्याने सध्या हे काम कर्मचाऱ्यांनाच करावे लागत आहे. दार्जिलिंगमधील सुमारे १२ हजार फूट उंचावर असणाऱ्या १८ केंद्रावर गुरूवारी मतदानाची प्रक्रिया होत असून त्यासाठी कर्मचाऱ्यांना अशी कसरत करावी लागत आहे. दार्जिलिंगपासून या सर्व कर्मचाऱ्यांनी सुमारे १३३ कि.मी.चा टप्पा वाहनाने पार केला पण खरी कसोटी नंतर होती. येथून कर्मचाऱ्यांनी सर्व साहित्य घेऊन सुमारे १२ हजार फूट उंचावर असणाऱ्या केंद्राकडे कूच केले. यामध्ये शिकोला वगळता अन्य केंद्रावर जाण्यासाठी सुमारे सहा कि.मी.ची पायपीट या कर्मचाऱ्यांनी केली. शिकोला येथील केंद्र सर्वात उंचीवर असून तेथे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना तब्बल १२ कि.मी.अंतराची पायपीट करावी लागल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुरेंद्र गुप्ता यांनी दिली. यापूर्वी हे साहित्य घेऊन जाण्यासाठी प्राण्याचा वापर करण्यात येत होता. पण आता आयोगाने त्यावर बंदी घातल्याने कर्मचाऱ्यांना सध्या ‘ट्रेकिंग’ चा अनोखा अनुभव घ्यावा लागत आहे.

‘आसामचे जिम कार्बेट’रहमान यांचा दफनविधी
गुवाहाटी, २९ एप्रिल/पीटीआय

‘आसामचे जिम कार्बेट’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ आणि निष्णात शिकारी झिया उर-रहमान यांच्या पार्थिवावर मंगळवारी येथे दफनविधी करण्यात आला. ६७ वर्षीय रहमान यांचे सोमवारी गुवाहाटी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. धडाडीचे व निष्णात शिकारी मानले जणारे रहमान यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी वाघाची पहिली शिकार केली होती. त्यानंतर १९५२ ते २००२ या काळात त्यांनी, किमान २०० लोकांचा बळी घेणाऱ्या सुमारे ४० नरभक्षक वाघांना यमसदनी धाडले. आसाम प्रमाणेच प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसामधील नरभक्षक वाघांच्या व बिबटय़ांच्या शिकारीसाठी त्यांना राज्य सरकार कडून बोलावणे येत असे. आसाममधील उदलगुडी जिल्ह्य़ातील मझबात या गावी १९४२ मध्ये त्यांचा जन्म झाला. वाघ व बिबटे यांच्याबद्दलचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. रहमान केवळ शिकारीच नव्हते तर वाघ, बिबटे आदी प्राण्यांना जिवंत पकडण्यातही त्यांचा हातखंडा होता. कोणताही प्राणी नरभक्षक झाल्याची खात्री पटल्याशिवाय त्यांनी कधी त्याच्यावर गोळी घातली नाही, असा त्यांचा लौकिक होता. रहमान यांनी शंभरावर वाघ व अनेक बिबटे जिवंत पकडून दिले होते.मृत्यूच्या दोनच दिवस अगोदर गुवाहाटी पत्रकार संघात त्यांचा ‘गेस्ट ऑफ दी मंथ’ कार्यक्रमात रहमान यांना आमंत्रित केले असता त्यांनी त्यांचे वन्यजीवांबद्दलचे थरारक अनुभव कथन केले होते.