Leading International Marathi News Daily
शुक्रवार, १ मे २००९

निरूत्साहच!
अवघे ४४ टक्के मतदान
मुंबई, ३० एप्रिल / खास प्रतिनिधी
पूर्ण पाच वर्षांनी आलेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या आजच्या तिसऱ्या टप्प्यावर मुंबई-ठाण्यात गडद छाया उमटली ती मतदारांच्या निरुत्साहाचीच. गेले सुमारे दोन महिने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ज्या मतदारांच्या जिवावर (आणि ज्यांच्यासाठी) प्रचार मोहीम राबविली त्या मतदारांनीच मतदानकेंद्रांकडे पाठ फिरविल्याने नेते-कार्यकर्त्यांचे चेहरे सायंकाळी काळवंडले. मुंबई-ठाण्यातील मतदानाची सरासरी पन्नाशीसुद्धा ओलांडू शकले नाही. काही ठिकाणी तर ते अवघे ३५-४० टक्के एवढेच होते.
आजची मतदानाची सुट्टी, उद्या, महाराष्ट्रदिन/ कामगारदिनाची सुट्टी आणि नंतर शनिवार - रविवार अशा जोडून सुट्टय़ा आल्याचा मोठा फटका मतदानाला बसला. मुंबईबाहेर जाणाऱ्या रेल्वे गाडय़ा, लोकल, बस आणि खासगी वाहने प्रवाशांनी भरभरून जात होत्या. बुधवार-गुरुवारच्या मध्यरात्री सीएसटीवरून सुटणाऱ्या कसारा आणि कर्जत लोकल अगदी दुथडी भरून गेल्या. माथेरान, महाबळेश्वरसह जवळपासची सहलकेंद्रेसुद्धा हाऊसफुल्ल झाली आहेत. मतदानाला सुट्टय़ांचा जसा फटका बसला तसाच कमालीचा उन्हाळा आणि उकाडाही कारणीभूत ठरला. जी मंडळी बाहेर गेली नाहीत ती घराबाहेरही पडली नाहीत. काही मोजक्या मतदानकेंद्रांवर आज रांगा दिसल्या. एरवी लोकशाही प्रक्रियेबद्दल फारसा उत्साह न दाखविणाऱ्या अनेक सेलिब्रिटींनी मात्र आवर्जून मतदान केले. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांचा प्रतिसादही चांगला होता. परंतु मध्यमवर्गीय, नोकरदारांच्या अनुत्साहाने या सगळ्या आशादायक चित्रावर पाणी फिरविले. दिवसभर सुनेसुने असलेले रस्ते आणि बेस्ट बसेस व लोकल गाडय़ा उन्हे उतरल्यानंतर मात्र गर्दीने फुलू लागल्या. बागा, चौपाटय़ा, भेळपुरीच्या गाडय़ा ओसंडून वाहू लागल्या. दुर्दैव असे की या सार्वजनिक ठिकाणी गप्पा रंगल्या त्या मात्र कोणी कुठे ‘स्कोर’ केला आणि कोणी कुठे ‘गटांगळी’ खाल्ली याच्याच.
पहिल्या दोन टप्प्यांप्रमाणेच अखेरच्या टप्प्यात शहरी भागातही मतदारांत निरुत्साहाचे वातावरण असल्याने मुंबई व ठाण्यातील दहा मतदारसंघांमध्ये सरासरी ४४ ते ४५ टक्केच मतदान झाल्याचा अंदाज आहे. गतवेळच्या तुलनेत मुंबईतील मतदानात घट झाली आहे.
नागपूर, पुणे, नाशिक, सोलापूर व औरंगाबाद या शहरांमध्ये मतदान कमीच झाले होते. पुण्यात जेमतेम ४१ टक्के तर नागपूरमध्ये ४३ टक्के मतदान झाले होते. शहरी भागात कमी मतदानाची परंपरा मुंबईतही कायम राहिली. मतदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत सरासरी ४७ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत मुंबईत यंदा कमी मतदान झाले आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात सुमारे ५४ टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्याच्या तुलनेत मतदानात दोन टक्के घट होऊन ५२ टक्के मतदान झाले होते. तिसऱ्या टप्प्यात तर मतदान आणखी घटले. प्राथमिक अंदाजानुसार ४५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गुरुदास कामत व गजानन कीर्तिकर यांच्यात लढत असलेल्या उत्तर-पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक ५० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. सर्वात कमी मतदान भिवंडी मतदारसंघात झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यात ५० टक्के मतदान
नवी दिल्ली, ३० एप्रिल/खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात आज १४.४ कोटी मतदारांपैकी सरासरी ४९ ते ५० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, गुजरात, सिक्कीम ही नऊ राज्ये तसेच दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव या दोन केंद्रशासित प्रदेशांतील लोकसभेच्या १०७ जागांसाठी रणरणत्या उन्हात मतदान झाले. तिसऱ्या फेरीअखेर लोकसभेच्या ३७२ जागांसाठी मतदान पार पडले असून उर्वरित दोन फेऱ्यांचे मतदान ७ व १३ मे रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त आर. बालकृष्णन यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये ६४ टक्के, तर कर्नाटकमध्ये ५७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. सिक्कीममध्ये ६० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. गुजरातमध्ये ४९ ते ५० टक्के, बिहारमध्ये ४८ टक्के, उत्तर प्रदेशात ४५ टक्के, मध्य प्रदेशात ४४ ते ४५ टक्के, महाराष्ट्रात ४३ ते ४५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघात ३० टक्के मतदान झाल्याची माहिती बालकृष्णन यांनी दिली. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, भाजप-रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते जसवंत सिंह, रालोआचे संयोजक आणि जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव, लोकसभेतील माकपचे नेते वासुदेव आचार्य अशा दिग्गज नेत्यांसह १५७२ उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक मतपेटय़ांमध्ये बंद झाले आहे.

नाशिकमधील सातोटे हत्याकांड
सहाही जणांना फाशी
मुंबई, ३० एप्रिल/प्रतिनिधी
नाशिक रोड येथील बोलाटगवाण शिवारातील रघुनाथ देवराम हगवणे यांची पेरुची बाग कसणाऱ्या सातोटे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा घालीत असतानाच कुटुंबातील पाच व्यक्तींचे खून करणे, दोघांच्या खुनाचा प्रयत्न करणे आणि घरातील मायलेकीवर सामुहिक बलात्कार करणे, अशा संपूर्ण नाशिक जिल्ह्यास सुन्न करणाऱ्या सहा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने आज फासेपारधी समाजातील सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. हगवणे यांची पेरुची बाग त्र्यंबक एकनाथ सातोटे कसत असत व त्याच बागेत त्यांचे कुटुंब झोपडीवजा घरात राहात असे. ५ मार्च २००३ रोजी रात्री १० ते पहाटे दोन या वेळात याच पेरुच्या बागेत सशस्त्र दरोडा म्हणून सुरु झालेल्या या राक्षसी गुन्हेमालिकेत स्वत: त्र्यंबक सतोते, संदीप व भुऱ्या ऊर्फ श्रीकांत ही त्यांची दोन कोवळ्या वयाची मुले, सविता ही १५ वर्षांची मुलगी आणि त्या काळरात्री त्यांच्याकडे पाहुणा म्हणून राहायला आलेला त्र्यंबक सातोटे यांच्या मेव्हणीचा मुलगा भरत मोरे अशा पाच जणांचे चाकू, विळा, कुऱ्हाडीचा दांडा आणि फावडे अशा तेथेच उपलब्ध असलेल्या शेतीच्या अवजारांचा हत्यारे म्हणून वापर करून निर्घृण खून करण्यात आले होते. त्र्यंबक यांची पत्नी आणि त्यांची मुलगी यांच्यावर दरोडेखोरांनी सामुहिक बलात्कार केले होते. मारलेले सर्वचजण मेले असे समजून दारू पिऊन तर्र झालेले दरोडेखोर पहाटे निघून गेले होते. परंतु सुदैवाने विमलाबाई आणि त्यांचा आणखी एक मुलगा मनोज नरसंहारात जबर जखमी होऊनही वाचले होते. त्यांनीच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून दिलेल्या साक्षींमुळे गुन्हेगारांना सजा ठोठावण्यात आली. या खटल्यात नाशिकच्या सत्र न्यायालयाने अंकुश मारुती शिंदे, राज्या अप्पा शिंदे, अंबादास लक्ष्मण शिंदे, राजू म्हसू शिंदे, बापू अप्पा शिंदे आणि सुऱ्या ऊर्फ सुरेश नागू ऊर्फ गंगाराम शिंदे या फासेपारधी समाजातील सहा आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली होती. अपिलात उच्च न्यायालयात न्या. बी. एच. मर्लापल्ले व न्या. आर. एस. मोहिते यांच्या खंडपीठाने १२ जून २००६ रोजी फक्त अंकुश, राज्या व राजू यांची फाशी कायम ठेवली होती व इतर आरोपींना जन्मठेप ठोठावली होती. या निकालाविरुद्ध आरोपींनी व राज्य सरकारने केलेल्या दोन अपिलांवर सर्वोच्च न्यायालयात तीन महिन्यांपूर्वी सुनावणी होऊन निकाल राखून ठेवला गेला होता. न्या. डॉ. अरिजीत पसायत व न्या. मुकुंदकम शर्मा यांच्या खंडपीठाने आज तो जाहीर केला व सहाही आरोपींच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले. या आरोपींपैकी अंकुशला गुन्ह्यानंतर १८ दिवसांनी अटक झाली होती. नंतर चार महिन्यांनी इतर पाचजणांना जालना जिल्ह्यातील भोकरधन येथे आणखी एका गुन्ह्यासाठी अटक झाली तेव्हा नाशिक रोड येथील राक्षसी गुन्ह्यांमधील त्यांचा सहभागही उघड झाला होता. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. रवींद्र अडसुरे यांनी तर सर्व आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सुशील कारंजकर यांनी काम पाहिले.

सूचनांअभावी निवडणूक अधिकारी ताटकळले
मुंबई, ३० एप्रिल/प्रतिनिधी

निवडणुकांची जबाबदारी पार पाडल्यावर आरे कॉलनी येथे आज अनेक निवडणूक अधिकाऱ्यांना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणत्याही सूचना प्राप्त न झाल्याने रात्री उशिरापर्यंत ताटकळत राहावे लागले. हे सर्व अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. सकाळी सात ते संध्याकाळी पाच या वेळात आपली जबाबदारी पार पाडल्यावर हे अधिकारी कामाचा मोबदला मिळण्याची प्रतीक्षा करीत होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेले क्षेत्रीय अधिकारी ‘पैसे मिळतील, थांबा’ या एका कारणासाठीच त्यांनी तेथून निघण्याची परवानगी देत नव्हते. मात्र आपले काम संपल्यावर चार तास अशा जंगलात थांबूनही पैसे न मिळाल्याने तेथे उपस्थित असलेल्यांच्या मनात साहजिकच संतापाची भावना निर्माण झाली होती. शेवटी रात्री नऊ वाजता त्या सगळ्यांनी स्वत:हून तेथून निघण्याचा निर्णय घेतला. यात अनेक महिलांचाही समावेश होता. त्या ठिकाणी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने या अधिकाऱ्यांची विशेषत: महिलांची फारच गैरसोय झाली. निवडणूक अधिकारी म्हणून काम करणारे हे कर्मचारी व्यवसायाने शिक्षक होते. रात्री उशिरा का होईना, घरी तर पोहोचलो अशी भावना व्यक्त होत असली तरी आता त्यांना प्रतीक्षा आहे ती केलेल्या कामाचा मोबदला मिळण्याची.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांना अटक
मुंबई, ३० एप्रिल / प्रतिनिधी

घाटकोपर येथील भाजपचे आमदार प्रकाश मेहता यांच्या नावाने काढलेल्या पत्रकावरून ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांचा प्रचार करण्याची बाब बुधवारी मध्यरात्री उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बन्सी कोरडे आणि अनिल आवटी या राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली. हे दोघे मेहता यांच्या नावाने काढलेली पत्रके वाटून पाटील यांना मतदान करा असे आवाहन करीत होते. ही बाब भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
प्रत्येक शुक्रवारी