Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

पंधरवडय़ापूर्वी वृत्तपत्रांमधून दिल्लीतील एका शाळेसंबंधीचे वृत्त ठळकपणे चर्चिले गेले. शानू नावाच्या तिसरीतील मुलीला तिच्या शिक्षिकेने इंग्रजी येत नाही म्हणून दिलेल्या कठोर शिक्षेत त्या मुलीच्या दुर्दैवी अंत झाला. सर्व वृत्तपत्रांमधून, वाहिन्यांवरून शानूच्या मृत्यूविषयी हळहळ व शिक्षिकेविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुलांना कोंडून ठेवणे, शरीरावर वळ उठेपर्यंत मारणे, चटके देणे, उन्हात उभे करणे असे शिक्षेचे क्रूर, कठोर प्रकार सातत्याने प्रसिध्द होत असतात. अशा शारीरिक दुखापत करणाऱ्या शिक्षांबरोबर गळ्यात पाटी अडकविणे, शाळेच्या एकत्र प्रार्थनेच्या वेळी मुलांच्या चुकीबद्दल बदनामीकारक शब्द उच्चारणे- अशाही घटना घडतात. या घटना संवेदनशील मुलांच्या मनावर दूरगामी परिणाम करतात. शाळेविषयीची अप्रीती, अभ्यासाविषयीची नावड, आत्मविश्वास हरविणे, मानसिक खच्चीकरण हे सारे शिक्षेच्या भयातून निर्माण होते.
गेली २० वर्षे मुलांमध्ये काम करताना, त्यांच्या शैक्षणिक अपयशाची कारणे शोधताना त्याची मुळे ही अशा घटनांपर्यंत गेलेली

 

अनेकदा जाणवली आहेत. मुलांच्या स्वभावातील कोडगेपणा, उद्धटपणा, क्रौर्य या भावनांचा उगमही काही वेळा शिक्षेच्या अतिरेकात असतो. यामुळेच शिक्षकी पेशात असणाऱ्या सर्वानीच ‘शिक्षा’ या मुद्दय़ाकडे अधिक गंभीरपणे, सजगपणे पाहण्याची आवश्यकता आहे.
शिक्षा करण्याचा विचार मनात आला की एक चेकलिस्ट स्वत:च स्वत:साठी बनवावी.
१. मुलाचा गुन्हा तेवढा गंभीर आहे का?
२. मुलाच्या वयाला ही शिक्षा योग्य आहे का?
३. त्याच्या कोणत्या चुकीसाठी ही शिक्षा आहे, याची त्याला जाणीव होणार आहे का?
४. शिक्षा देताना पूर्वआकस, स्वत:ची मन:स्थिती याचे प्रतिबिंब शिक्षेत पडते आहे का?
५. शिक्षेतून वर्तन-बदलाची शक्यता आहे का?
६. शिक्षेचा हेतू चूक सुधारणे हा आहे, की त्याच्यावर व इतर मुलांवर दहशत बसावी हा आहे?
प्रलंबित शिक्षा जशी योग्य नाही तशीच प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे केली जाणारी शिक्षाही योग्य नाही, त्यासाठीच हा चेकलिस्टचा अवधी.
‘आनंद निकेतन’ या नाशिकच्या प्रयोगशील शाळेत गेली ७-८ वर्षे काम करताना शिस्त व शिक्षा या विषयावर अनेकदा आम्ही शिक्षकांनी एकमेकांशी चर्चा केली. त्यातून काही सहमतीचे मुद्दे सहजपणे तयार झाले.
* मुलांच्या अंगाला हात, पट्टी, काठी याचा स्पर्शही करायचा नाही.
* वर्गातून बाहेर काढणे हा उपाय अपवादानेच वापरायचा.
* चुकविलेला गृहपाठ किंवा चुकलेली गोष्ट यांत्रिकपणे दहा-बारा वेळा लिहून काढ- ही निर्बुद्ध शिक्षा कटाक्षाने टाळायची.
* जी शिक्षा व्यवहारात उतरविणे शक्य नाही त्याची वाच्यताही करायची नाही. उदा. उन्हात उभे करीन, उपाशी ठेवीन, शाळेभोवती १०० फेऱ्या मारायला लावीन, इ. कारण बाईंना हे करणं शक्य नाही, याचा अंदाज लहान मुलांनाही येतो.
* एखादी चूक व त्यासाठीची शिक्षा यात समानता (सर्व मुलांसाठी समान दृष्टिकोन) व एकवाक्यता (शिक्षकांमधील) असली पाहिजे व ती मुलांना दिसलीही पाहिजे.
छोटय़ा मुलांसाठी तर त्यांना खूप आवडणाऱ्या एखाद्या कृतीपासून काही काळ वंचित ठेवणे, उदा. खेळाचा तास, कार्यानुभाचा तास, आवडत्या शिक्षकांचे त्यांच्याशी न बोलणे, वर्गातील सामूहिक कामात सहभागी करून न घेणे, फळ्यावरील चांगल्या कामाबद्दल स्टार मिळविणाऱ्यांच्या यादीत नाव नसणे- अशाही शिक्षा परिणामकारक ठरतात.
मोठय़ा वर्गातील (चौथीच्या पुढील) मुलांसाठी काही वेगळेही उपाय करून पाहिले. वेगळे यासाठी की मुले जसजशी मोठी होतात, तशी त्यांची स्वप्रतिमा अधिकाधिक स्पष्ट होते. स्वत:ची मते, स्वभावना, स्वओळख जपण्याकडे कल वाढतो. या मुलांसाठी करून पाहिलेले काही उपाय-
१. शालेय वर्षांच्या सुरुवातीला ‘आमचे नियम आम्हीच करणार, आम्हीच पाळणार’ अशी एक नियमावली विद्यार्थी-सभेत सर्वाच्या सहमतीने तयार करून सर्व वर्गामध्ये लावली.
२. गणवेश नसणे, मूल्यमापनपत्रिका वेळेवर न आणणे अशा काही कृतींना पालक जबाबदार असतात, असे लक्षात आल्यास पालकांकडून दंड घेणे.
३. नागरिकशास्त्र हे आम्ही कायमच वर्तनशास्त्र म्हणून शिकवतो. विद्यार्थी म्हणून आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये, अधिकार यांची कायमच त्यांच्याबरोबर चर्चा होते, यातूनच शिस्त ही बाहेरून लादण्याची गोष्ट नाही तर ती आतून निर्माण झाली पाहिजे, हा विचार मुलांपर्यंत पोहोचतो.
४. सातत्याने गृहपाठ न करणे, वर्गात शिकवताना गडबड करणे- अशात पुढाकार घेणाऱ्या २-३ मुलांच्या बाबत गृहभेटींचा प्रयोग केला. त्यातून वर्तनसमस्येची मुळे काही वेळा लक्षात येतात व ताई घरी येतात, पुन्हा कधीही येण्याची शक्यता आहे, यामुळे मुलांवर थोडा अंकुश बसतो. हा उपक्रम इतर सर्वच मुलांसाठी सुरू ठेवावा, असा पालकांचा आग्रह आहे.
मध्यंतरी नाशिकमधील एका शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये बसण्याच्या जागेवरून मारामारी झाली व त्यात एका मुलाचा बाकावर डोके आपटून जीव गेला. या मृत्यूला जबाबदार कोण? शिक्षक, पालक, ती मुले की क्रौर्याचे अती दर्शन- याची आम्ही मुलांबरोबर चर्चा केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलांमध्ये स्वयंशिस्त, स्वनियंत्रण नसणे, हेच या दुर्घटनेमागील प्रमुख कारण असल्याचे मत अनेक मुलांनी व्यक्त केले.
आमच्या शाळेत सहावीच्या वर्गात काही विद्यार्थी सातत्याने गृहपाठ करीत नाहीत, असे लक्षात आल्यावर यावर उपाय म्हणून वर्गातील सर्व मुलांची यादी वर्गातील पॅनेलबोर्डवर लावली. नावांसमोर तारखांचे रकाने करून गृहपाठ करणाऱ्या व न करणाऱ्या मुलांच्या नावासमोर तशी नोंद केली. याची लाज वाटून दुसऱ्याच दिवसापासून सर्वाचा गृहपाठ वेळेवर होऊ लागला.
एका मारामारीच्या प्रसंगात सहभागी असलेल्या सातवीच्या दोन मुलांना दोरीने हात बांधून दिवसभर वावरण्याची शिक्षा दिली. बांधलेल्याच हातांनी त्यांनी त्या दिवशी सर्व कृती केल्या. सर्वाना वाटल्े की, यांना शिक्षेचे काहीच वाटले नाही, पण ही मुले वयाच्या ज्या टप्प्यावर आहेत त्यात मनातील अपराधीपण चेहऱ्यावर दिसू न देणे, वरवर अत्यंत सहजभाव भासवणे हे स्वाभाविकच आहे. शिक्षा करताना मुलांचे वय, त्या वयाची वैशिष्टय़े, त्यांची मानसिकता, त्यांची पाश्र्वभूमी अशा सर्व गोष्टी शिक्षकाला माहीत असणे गरजेचे आहे.
शिक्षा विघातक नको, विधायक हवी, तनाला नको मनाला हवी- हा जसा या घटनेमागील प्रमुख मुद्दा आहे तसाच या प्रकरणात सर्वानी दुर्लक्षिलेला एक मुद्दा आहे तो म्हणजे शानूला झालेल्या शिक्षेमागील कारण. एखादी गोष्ट मुलाला येत नाही, हा मुलाचा दोष होऊच शकत नाही. एखाद्या शब्दाचे इंग्रजीत भाषांतर करता न आल्याने शिक्षा करणे हे गुलाम मानसिकतेचे लक्षण आहे. इंग्रजीविषयक न्यूनगंड व भयगंड या पोटी इंग्रजीचा अतिरेक छोटय़ा इयत्तांपासून केला जातो. पहिलीपासून सेमीइंग्लिशच्या जिथे जाहिराती लागू शकतात, त्यावरून हा न्यूनगंड किती खोलवर रुजला आहे, याचा प्रत्यय येतो. त्या मानसिकतेच्या गुलामीतून हा शिक्षेचा अतिरेक घडला आहे, याकडे डोळेझाक करता येणार नाही.
शिक्षा व शिस्त हे खूपच जवळचे शब्द आहेत. त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर आमच्या शाळेत आले होते, तेव्हा त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला होता. तो म्हणजे, लाल, हिरवा, पिवळा हे सिग्नल शिक्षकांच्या शब्दातून, देहबोलीतून मुलांपर्यंत पोहोचले पाहिजेत. एखादी कृती कधीच करायची नाही, कधीतरी चालेल व नेहमी करावी- यातील सीमारेषा स्पष्टपणे जाणवून देणारा हा सिग्नल! हे प्रतीकात्मक संदेश मुलांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता शिक्षकांमध्ये विकसित झाली तर शिक्षेची गरजच उरणार नाही.
शोभना भिडे
मुख्याध्यापक, आनंदनिकेतन, नाशिक
shobhi.61@gmail.com