Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

माझ्या बालपणीच्या आठवणींमध्ये गोष्टींना एक अपूर्व स्थान आहे. गोष्ट ही लहानपणातली अपरिहार्य गोष्ट आहे, असंच काहीसं मनावर बिंबलेलं आहे. आजी, काका, आई-वडील हे सगळे लोक जमेल तेव्हा, जमेल तशा गोष्टी मला सांगायचे. आजी अर्थातच जास्त सांगायची. कारण ती घर-संसाराच्या लबेद्यातून मुक्त होती. मला गोष्टी सांगण्यातला वेळ वाया गेला असं तिला वाटत नव्हतं. आणि तो उगाच वाया जातही नव्हता. तेव्हाच्या माझ्या त्या सीमित, परावलंबी अस्तित्वाला तो वेगवेगळे आयाम पुरवत होता. त्या गोष्टींमध्ये देवादिक होते, पुराणं होती, खरे-खोटे राजेरजवाडे होते, पऱ्या, भुतंखेतं होती, प्राणी-पक्षी होते, चंद्र-सूर्य होते, बिरबल-तेनालीराम होते, अलिबाबा-मर्जिना होते. पुढे वाढत्या वयानुसार गोटय़ा- चिंगी होते, श्याम होता. वेगळ्या अर्थानं एक भलतंच ‘हाऊसफुल्ल’ आयुष्य होतं ते. गोष्टी ऐकण्यावाचून पुढे गोष्टी रचण्याच्या, गोष्टी सांगण्याच्या वयापर्यंत मी आले, तरीही त्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी मला साथ देत होत्या.
जे घरी, तेच शाळेतही! प्रत्येक आठवडय़ातले दोन दिवस शाळेतला शेवटला तास हा ‘अवांतर वाचना’चा असायचा. त्यावेळी शाळेचा शिपाई एक पत्र्याची पेटी घेऊन वर्गात यायचा. ती पुस्तकांनी भरलेली असायची आणि प्रत्येक बाकावर एकेक गोष्टीचं पुस्तक त्या तासभर वाचायला मिळायचं. त्या पेटीतलं ‘चांगल्यातलं चांगलं’ पुस्तक आपल्याला मिळावं म्हणून आम्ही ज्या

 

काही लटपटी करत असायचो त्याला तोड नाही. याखेरीज घरात येणारे वर्गणीचे मुलांचे मासिकांचे अंक असायचे. मोठय़ांच्या मासिकांमधली मुलांची पानं असायची. एवढी बेगमी केली तरी ऐकायला, वाचायला पुरेसं मिळत नाही, असंच वाटायचं. वाचलेलं सगळं फार खरं वाटायचं. अमुकतमुक गोष्ट ‘छापून आलीये’ ही तिच्या विश्वासार्हतेची अंतिम कसोटी. तिच्यापुढे प्रश्न विचारायचे नाहीत. असा बाळबोधपणा! तेवढीच आत्मीयताही! बाल, किशोर, कुमार अशी अवस्थांतरं अनुभवताना प्रौढपणाला भिडण्याच्या अगोदरची एक-दोन र्वषच फक्त उपासमारीची गेली. कारण त्या अडनिडय़ा वयाला बालसाहित्य पुरेनासं झालं होतं आणि प्रौढ साहित्य पेलवेनासं वाटत होतं. म्हणून दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहत होता. पुढे पाहुण्याने एका- म्हणजे प्रौढांच्या घरात मजबूत पाय रोवले आणि उरलेल्या आयुष्याला वाचनसुखाचं अस्तर लागलं, ते कायमचंच!
या पाश्र्वभूमीवर आताची मुलं गोष्टी कशा ऐकतात, वाचतात, याचा धांडोळा घेणं मनोज्ञ ठरतं. ‘कोणीच काहीच वाचत नाही’, असली निर्णायक, नकारात्मक विधानं माझं वाचन मला करू देत नाही. पण कोण काय वाचतं, याचा शोधही ते थांबू देत नाही. या शोधात कानावर पडलेली काही वाक्यं, काही विधानं, मतप्रदर्शनं सलग एकापुढे एक ठेवते आहे. टीकेविना!
‘‘आताच्या मुलांना वेळ कुठे आहे वाचायला? त्यांच्यासाठी दिवसभराचे एकापुढे एक असे इतके कार्यक्रम घरच्यांनी लावून ठेवलेले असतात, की थकून जातात बिचारी. वाचायलाही वेगळ्या प्रकारची शक्ती लागते, ती उरते कुठे त्यांच्याकडे?’’
‘‘सध्या सायन्स, आय.टी., कॉम्प्युटर यांचा जमाना आहे. तेव्हा अवांतर वाचायचंच झालं तर या विषयामधलं वाचा. उगाच कुठल्यातरी काल्पनिक गोष्टी वाचून वेळ वाया घालवू नका, असं घरचेच सांगतात. आता बोला!’’
‘‘आताची पोरं गोष्टीत रमतात. गोष्टी सांगतात. गोष्टींची वाट बघतात. फक्त त्या आदल्या रात्री पाहिलेल्या एखाद्या टी.व्ही. मालिकेच्या एपिसोडमधल्या असतात. मधल्या सुट्टीत डबे खाताना फक्त तेवढंच बोलणारी मुलंही असतात. त्यातली त्यांची अद्ययावतता थक्क करणारी असते.’’
‘‘तुमच्या वेळी पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी असे एकेक गट पाडून एकगठ्ठा पुस्तकं पुरवता येत असतील. आता विसरा तो सबगोलंकारपणा! सध्याच्या प्रचंड वेगवान आयुष्यात चौथीतल्या मुलांना तिसरीतली मुलं ‘बाळं’ वाटत असतात आणि सातवीतली पोरं ‘आम्ही सहावीत असताना पूर्वी असं नव्हतं, वगैरे सांगतात.’’
‘‘आताची पोरं भाबडी नसतात हो तुमच्यासारखी. चंट असतात. खूप माहिती बाळगून असतात. जिथे तिथे ती वापरून शंका, खुसपटं काढणारी असतात. म्हातारी भोपळ्यातून कशाला जाईल- सरळ ए.सी. व्होल्वोनं जायचं सोडून? भीष्म शरपंजरी पडला म्हणजे बहुधा त्याचं अ‍ॅक्युपंक्चर झालं असेल.. असं चालतं यांचं डोकं. यांना काय गोष्टी सांगणार? कपाळ?’’
‘‘आम्ही एका सुट्टीत मुलांच्या पुस्तकांचा वेगळा विभाग काढला होता आमच्या वाचनालयात. फीसुद्धा माफक ठेवली होती. पण प्रतिसाद बेताचा. दुसऱ्या सुट्टीत फी वाढवून सी.डी. वगैरे ठेवल्या तर मुलांची रांग लागायला लागली.’’
‘‘आपल्या लेखक लोकांचं काय होतं- ते स्वत:चं बालपण आठवून कुठेतरी त्या आधारावर बालसाहित्य लिहायला जातात. आताच्या मुलांचं बालपण कुठल्या कुठे गेलंय, याचा अंदाजच नसतो त्यांना. त्यामुळे आताची मुलं वाचताना त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाहीत.’’
‘‘जी मुलं मराठी माध्यमात शिकतही नाहीत, ती मराठी पुस्तकं वाचतील कशाला म्हणतो मी? उगाच भलत्या अपेक्षा का करता?’’
‘‘तुम्ही इथे शहरात बसून लिहिणार. तिकडे खेडय़ापाडय़ातल्या पहिल्या पिढीतले बालवाचक ते वाचणार. कसा सांधा जुळावा सांगा बरं?’’
‘‘इंग्रजीतसुद्धा एवढय़ा वर्षांत एका हॅरी पॉटरचं गणित जमलं. बाकी तिथेही बालसाहित्याबद्दल चुकामूकच आहे. उगाच ऊठसूट आपल्या लेखकांना का वेठीला धरता?’’
‘‘आता पोरांना नुसती अक्षरं नकोत काळी-पांढरी. चित्रं हवीत. रंग हवेत. कॉमिक्स हवीत. रामायण-महाभारतसुद्धा पिक्चर स्ट्रीपच्या स्वरूपात लागतं या मुलांना, माहितीये?’’
‘‘अहो, रामायण-महाभारत आवडतं तेही युद्धासाठी, चमत्कारांसाठी. पडद्यावर दाखवलं तर त्यातल्या स्टंटस्साठी. त्यातली भावनिक गुंतागुंत मुळी पोहोचतच नाही कोणापर्यंत. आपण कोरडे पाषाण!’’
‘‘माझा मुलगा कध्धीचा नेटवरून हवं ते मिळवतो, वाचतो. उगाच दोन महत्त्वाच्या वाक्यांसाठी दोनशे पानं वाचत बसत नाही. पटकन् तेवढी दोन-चार वाक्यं डाऊनलोड करून घेतो. काय वाचन वाचन करताय?’’
‘‘मोठी सुट्टी लागली की लगेच आम्ही पुढच्या वर्षांची क्रमिक पुस्तकं आणतो मुलांना. ते वाचन खरं! शेवटी मार्कच उपयोगी पडतील ना?’’
‘शेवटी’ काय काय होईल हे माहीत नाही! तूर्तास मुलांसाठी गोष्ट ही भलतीच ‘अवघड गोष्ट’ झाली आहे, हे मात्र जाणवतं!
मंगला गोडबोले
mangalagodbole@gmail.com