Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

माझ्या आठवणीप्रमाणे २००८ च्या डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा होता. २६/ ११ ची मुंबईवरील हल्ल्याची घटना ताजीच होती. एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह पोलीस दलातील अनेक मोहऱ्यांचा त्यात बळी गेला होता. दादर येथील पोलीस क्वॉटर्समध्ये हेमंत करकरे वास्तव्यास होते. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणाऱ्यांची अक्षरश: रीघ लागली होती. संध्याकाळची सहा- साडेसहाची वेळ होती. मन अंध:कारून गेले असल्यामुळे सूर्यास्ताची किरणेही बाहेर अंधार झाल्याची जाणीव करून देत होती. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी सपत्निक आले होते. काही वेळाने शारदा साठे यांच्यासह स्त्री-मुक्ती संघटनेच्या काही महिला कार्यकर्त्यांही आल्या. हे सर्वजण जातात तोवर मेधा पाटकर आल्या. त्याही थोडा वेळ बसल्या. प्रत्येकाच्या मनात हेमंतच्या काही ना काही आठवणी होत्या, ज्या आम्हाला नव्याने कळत होत्या.
बघता बघता साडेसात- आठ वाजले. मी हेमंत यांच्या फोटोसमोर संध्याकाळचा दिवा लावत असताना अचानक सात-आठ कार्यकर्त्यांसह किडकिडीत शरीरयष्टीची एक महिला झपाझप घरात आली. मागे पाच-सहा कार्यकर्ते. आल्याबरोबर हेमंतच्या

 

फोटोसमोर ‘सलाम, सलाम’ म्हणत त्यांनी हार ठेवला. लाल काठापदराची ऑफ व्हाइट साडी, मानेवर रुळणारी बारीकशी वेणी, वय वार्धक्याकडे झुकल्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट खुणा. परंतु हॉलमधील दहा-पंधरा मिनिटांचा त्यांचा वावर तरुणाईलाही लाजवणारा होता. उत्साह, धडाडी आणि प्रखर देशाभिमानाचे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव टिपत असतानाच त्यांची ओळख पटवून घेण्याचा मी प्रयत्न करीत होते. फोटोंमध्ये अनेकदा पाहिले होते, परंतु प्रत्यक्षात भेट मात्र झालेली नव्हती. तेवढय़ात शब्द कानावर आले, ‘अरे, तू कसा निघून गेलास रे? माझ्यासारख्या म्हाताऱ्यांना देव मागं ठेवतो आणि तुझ्यासारख्या तरुणांना आमच्यापासून हिरावून नेतो. हाच का त्याचा न्याय?’ ही वाक्यं कानावर आली आणि कोणीतरी त्या अहिल्याताई रांगणेकर असल्याची ओळख करून देताच मी एकदम भानावर आले.
१९९० ते १९९७ दरम्यान नागपूर येथे वास्तव्यास असताना माझे सासरे कमलाकर गोविंद करकरे यांच्याकडून त्यांना आलेला अनुभव ऐकला होता. सासरे पक्के कम्युनिस्ट. रेल्वेत नोकरी. मी त्यांना ‘अण्णा’ म्हणायची. १९७१ मध्ये गाजलेल्या रेल्वे संपात युनियनचे त्यांनी नेतृत्व केलेलं. भूमिगतही झाले होते. बडतर्फ झाले. नोकरी गेली. सासूबाई कुमुदिनी करकरे लेक्चरर. घरात हेमंतसह चार मुले. तेव्हा अहिल्याताईंनी अण्णांना मुंबईला बोलावून घेतले. निरनिराळ्या सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन संपकर्त्यांचा प्रश्न त्यांच्यासमोर तळमळीने मांडला. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, ‘यांच्या घरी चार मुलं आहेत. अजून ती करतीसवरती झालेली नाहीत. घरातल्या कर्त्यां पुरुषाचीच नोकरी गेली तर त्या कुटुंबानं करायचं काय? काही कारणासाठी एका ध्येयाने प्रेरित होऊन ते संपात सहभागी झाले त्याची त्यांना एवढी मोठी शिक्षा द्याल?’ खुद्द अण्णांनीच तेव्हा मला ही आठवण सांगितल्याचे स्पष्ट आठवते.
अण्णांची बाजू अहिल्याताईंनी सरकारपुढे ज्या हिरीरीने मांडली त्यावेळी त्यांची आणि अण्णांची फारशी ओळख होती असेही नाही. मला वाटते, तशी त्यांना गरजही नसावी. केवळ एखाद्यावर होत असलेल्या अन्यायाची चीड येऊन त्याला न्याय मिळवून द्यायचा, एवढीच त्यामागची भावना असावी. मग तो अन्याय कोणावर झाला, हा प्रश्नही त्यांच्या दृष्टीने गौण होता.
गेल्या सोमवारी पहाटे रेल्वेस्टेशनवरून आले आणि दारासमोर पडलेले पेपर उचलले. ठळक बातमी दिसली- अहिल्याताई रांगणेकर यांचे निधन. तशा दररोजच काही ना काही अस्वस्थ करणाऱ्या बातम्या वाचनात येतच असतात. पण ही बातमी मनाला चटका लावून गेली. कदाचित अलीकडेच त्यांच्या झालेल्या भेटीमुळेही असेल.
त्या दिवशी अवघ्या १०-१५ मिनिटांच्या त्यांच्या सहवासाने मला अण्णांनी सांगितलेल्या त्यांच्याविषयीच्या आठवणी तर जागवल्या गेल्याच, परंतु त्याचबरोबर हेमंत देशासाठी शहीद झाल्यानंतर किती आदरणीय व्यक्तींची पायधूळ आमच्या घराला लागली, हा विचार मनात येऊन ऊर अभिमानाने भरून आला.
हेमंत यांच्या फोटोसमोर हार ठेवताना अहिल्याताईंच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील डोळ्यांच्या कडा ओलावल्याचे मला स्पष्ट दिसले. मात्र, त्यातूनच या ‘रणरागिणी’च्या मनाच्या हळुवारपणाचेही दर्शन झाले. थोडा वेळ सर्वाशी बोलल्यानंतर त्या जायला निघाल्या तेव्हा त्यांना आठवण झाली ती बरोबर मेणबत्त्या आणल्याची. फाटकापर्यंत गेलेल्या अहिल्याताई माघारी फिरल्या. कम्पाऊंड वॉलच्या खाली असलेल्या चौथऱ्यावर उभ्या राहून हात उंच करून त्यांनी भिंतीवर अनेक मेणबत्त्या पेटवल्या. मेणबत्तीच्या त्या शांत ज्योतींमधूनही प्रखर देशाभिमानाची लकेर त्यांच्या चेहऱ्यावर मी अनुभवली. हेमंतचे शौर्य, त्यांचे वीरमरण काळाच्या अंधारात लुप्त होऊ नये म्हणूनही कदाचित हा प्रकाश असेल, असे मला सहजच वाटून गेले.
अहिल्याताईंची जीवनज्योत निमाली. जगरहाटी तर चालूच राहणार. माणसाला व्यवहार कुठे सुटले आहेत! पण सामाजिक जीवनातले धगधगते अग्निकुंड जेव्हा विझते, तेजस्वी, स्फूर्तिदायक आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा जेव्हा अंत होतो, तेव्हा मात्र पोटात गोळा उठतो.
अमृता करकरे