Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

आकाशाला ठिगळ!
२८ मार्चची ‘चतुरंग’ पुरवणी वाचनीय, मननीय व संग्राह्य़ आहे. ‘फिरती जिद्द’ हा सई तांबे यांचा लेख वाचकाला वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. पण अशा प्रकारचे हे एकच विश्व नाही, अशी अनेक विश्वं आहेत. त्यापैकी काहींचं दर्शन आपल्याला पूर्वी घडलेही असेल, पण ते प्रत्येक विश्व वेगळेच आहे! यासंदर्भात आठवते की, ५०-५५ वर्षांपूर्वी बेस्टच्या ट्रॅम्स रस्त्यावरून धावत होत्या त्या काळात दादर टीटी ते म्युझियम अशी ट्रॅमची लंबीचवडी खेप असे. एक वा दीड आण्यात (जुने सहा पैसे) तास- दीड तास ट्रॅम आपल्याला वेगवेगळ्या विश्वांचे दर्शन घडवीत दादरपासून म्युझियमपर्यंत मुंबईप्रदक्षिणा करीत असे. अशा या जुन्या विश्वांचा अजूनही उद्धार झालेला दिसत नाही. उलट, त्यात भरच पडत चालली आहे. अशा विश्वांचे दर्शन घडल्यावर थोडा वेळ विचार

 

करायचा, ‘चुकचुक’ करायचे आणि मग पुन्हा आपले उद्योग सुरू! खरं तर मुंबईत दुसऱ्याकडे पाहायला माणसाला वेळच नसतो. त्यामुळे एखाद्या ‘अशा’ विश्वाचे दर्शन घडले की भावनिक माणूस त्यावर विचार करू लागतो आणि कालांतराने सारे विसरतो. नाही तरी या विश्वाचा ‘उद्धार’ करणे आपल्या कुणाच्याच हातात नसते. रस्त्यावर, रेल्वेस्टेशनवर अनेक ठिकाणी अशी बेवारसी मुले असतात. त्यांच्याकडे आपले लक्ष वर्तमानपत्रे लेख लिहून वेधतात. लेखांना विषय मिळतो, पेपरला पैसे मिळतात. प्रत्यक्ष मात्र ते जीवन जगणारे अर्धपोटी वा उपाशीच राहतात.
काही वेळा अशा उपेक्षित विश्वांचा उद्धार करण्याचे प्रयत्न काही जगावेगळे लोक करतातही; परंतु आपली उपेक्षित विश्वे इतकी आहेत, की आकाशाला ठिगळ लावण्याचा तो प्रयत्न असतो. आशेचा किरण एवढाच की, नगण्य प्रमाणात का होईना, असे प्रयत्न होत आहेत. हीच काळ्या आकाशाला असलेली सोनेरी कडा होय.
यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, ही जाणीव जरी सतत टोचत राहिली, तरी आज ना उद्या थोडेसे तरी याकामी यश मिळेलच. असे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यातलाच एक प्रयत्न ‘लोकसत्ता’च्या २७ मार्चच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘पुण्याच्या सेवासदन हायस्कूलमध्ये उजळली माणुसकी’ या बातमीतून आपल्यापर्यंत पोहोचतो. शाळेतल्या छोटय़ांनी सहा-सात लाख रुपये अल्पावधीत जमवून आपल्या मैत्रिणींचे प्राण वाचविले, ही सत्यकथा आपणास बरेच काही शिकवून जाते.
स्त्री-समस्यांची चर्चा करणारे ‘चिखलातून उमललेलं कमळ’ आणि ‘डॉ. लोहियांची महिला-नीती’ हे लेखही बरीच माहिती देतात. चिखलातल्या कमळाने तर स्त्री-समस्यांच्या बाबतीत भारताच्याही ‘पलीकडच्या’ जगातील स्त्रीवरील अन्यायाचे दर्शन घडविले आहे. शेवटी कुठेही जा- पळसाला पाने तीनच. फरक असलाच तर आकारात!
- धुंडिराज वैद्य, कल्याण

सहानुभूती तरी मिळावी
२८ मार्चच्या ‘चतुरंग’मध्ये ‘फिरती जिद्द’ हा सई तांबे यांचा लेख वाचला. या लेखामुळे फेरीवाल्या स्त्रियांचा संपूर्ण जीवनाचा संघर्षपट डोळ्यांसमोर उभा राहिला. सर्वसामान्यपणे या फेरीवाल्यांकडे रेल्वे डब्यातली एक अडचण म्हणूनच नाराजीने पाहिले जाते. हा लेख वाचून आपल्या नजरेत त्यांच्याबद्दल किमान सहानुभूती आली तरी खूप मिळवले.
- नंदकिशोर गौड, नाशिक.

शहरातला निसर्ग..
२८ मार्चच्या पुरवणीतील राधा गानू यांचा ‘वसंत.. सहाव्या मजल्यावरचा’ हा लेख आवडला. सदैव धावपळीमध्ये व्यग्र असणाऱ्या मुंबई महानगरीतील वाढत्या सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात आपल्याला निसर्गातील ऋतुबदल जाणवेनासेच झाले आहेत. उंच उंच टॉवर्समुळे आकाशही झाकले गेले आहे. तरीही शिल्लक उरलेल्या जमिनीवरील झाडा-पानांमुळे खऱ्या रसिकमनाला ऋतुचक्राचे सुखद बदल जाणवत राहतात. मार्च-एप्रिलमध्ये झाडांना येणाऱ्या नव्या पालवीबरोबर पहाटे पडल्या पडल्या कानांवर येणारे कोकीळ पक्ष्याचे सुरेल, सुमधुर गाणे दिवसाची सुंदर व प्रसन्न सुरुवात करते. कधी कधी ‘टॉकऽऽटॉकऽऽ’ असा आवाज करणारा छोटासा हिरवा पक्षी फांदीवरून दूर उडाला तरच त्याचे निसटते दर्शन होते. मे-जून महिन्यामध्ये झाडांवर बहरणारा लालचुटूक गुलमोहर कडक उन्हाळ्यामध्ये रसिकाचे मन बहरून टाकतो. कावळे घरटी बांधण्यासाठी काडी काडी जमवताना आढळतात. चिऊताई अलीकडे फारशा दिसत नाहीत. घुमणारी कबुतरे नेहमी घराच्या वळचणीला आश्रय करणारी. पण कधी कधी ती झाडांवरही दिसतात. पोपटांचे थवे येऊन पाना-फांद्यांशी इतके एकरूप होतात, की त्याचे अस्तित्व ओळखताही येऊ नये.
पावसाळ्यामध्ये पाना-पानांमधून टपकणारे पाण्याचे थेंब तर टपोरे मोती होऊन क्षणभंगुर, पण सौंदर्यलेणे होऊन जातात. कधी कधी संध्याकाळी ढगांची ‘नभात झिम्मड निळी-जांभळी’ अनुभवाला येते. घारी पंख सरळ ठेवून लयबद्धपणे विहरत असतात. पावसानंतर स्वच्छ झालेल्या आकाशामध्ये हे सुंदर दृश्य दिसते. पावसाळा संपल्यानंतर येणाऱ्या गणपती, नवरात्री, दिवाळी या सणांच्या सांजवेळी आल्हाददायक सोनेरी किरणे घेऊन येतात. नंतर येणारी थंडी आपल्याला घरातील पंखे मंदगती करायला लावते. एक सुखद गारवा सर्वत्र भरून राहतो. शुष्क शहरीकरणामध्ये हे टिकून राहिले आहे, हे खरे. यापुढे सभोवतालच्या परिसरातील पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे रक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. कारण त्यावरच मानवाचे भवितव्य अवलंबून आहे.
- दत्तकुमार भिवंडकर, माहीम

‘द लास्ट लेक्चर’ आवडले
२१ मार्च ‘चतुरंग’मधील डॉ. विद्या मराठे यांचा ‘द लास्ट लेक्चर’ हा लेख वेगळाच आनंद देऊन गेला. लेखाच्या निमित्ताने ‘वर्षतु सकळ मंडळी भेटतु भूतां’ अशी अवस्था झाली.
मृत्यूच्या जाणिवेने माणसाच्या अंतरंगात किती आमूलाग्र बदल होतो, हे रँडी पॉश यांच्या उदाहरणावरून कळते. भारतीय संस्कृतीतसुद्धा संतांनी ‘याचि देही, याचि डोळा मुक्तीचा सोहळा’ पाहून दिलेले ज्ञान किती अनुभवसंपन्न व उद्धार करण्यास समर्थ असे होते याचा प्रत्यय आला.
- अभिषेक कुलकर्णी, कल्याण.