Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

‘द व्हजायना मोनोलॉग्स’ या गाजलेल्या इंग्रजी नाटकाचे वंदना खरे यांनी केलेले स्वैर रूपांतर म्हणजे ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’. हुरहुरत्या उत्सुकतेने त्या प्रयोगाला आलेल्या प्रेक्षकांना या प्रयोगाने चकित केले आणि चीतही! अफलातून प्रयोग बघण्याची ती अपूर्व संधी ठरली. मूळ इंग्रजी स्क्रिप्टपेक्षाही हे रूपांतरण भन्नाट आहे.
‘योनी’ या शब्दाचे जाहीर उच्चारणही अवघड, अशा विषयावर संपूर्णत: बेतलेला एक जबरदस्त नाटय़-अभिवाचनाचा प्रयोग नुकताच पाहायला मिळाला. ‘द व्हजायना मोनोलॉग्स’ या गाजलेल्या इंग्रजी नाटकाचे वंदना खरे यांनी केलेले हे स्वैर रूपांतर- ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’.
तसा हा विषय सार्वत्रिक चर्चेचा नाही. या विषयाभोवती संकोचाचा घट्ट वेढा आहे. आणि त्या आवळलेल्या नाडय़ांमुळे अनेकजणी मुस्कटदाबी सहन करत जीवन जगत असतात. असह्य उपेक्षा, अन्याय, पीडा मुकाट सोसत आयुष्य कंठत असतात.. त्याबद्दल ब्रही न उच्चारता! आणि महिलांचा हा मूकपणाच मग समाजातील अनेक विकृ तींचे कारण ठरतो.
या विषयावरील संकोचाचा पडदा दूर करणे आवश्यक तर आहेच, पण सद्य: सामाजिकतेचा विचार करता ते आव्हानात्मकही

 

आहे. समाजाच्या सेन्सॉर बोर्डातून सहीसलामत हिरवा सिग्नल मिळवणे सोपे नाही. ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या नाटय़ाभिवाचन प्रयोगाने संकोचाचा हा पडदा दूर करण्याचा मराठीतील पहिला प्रयत्न फारच आत्मविश्वासाने केला गेला आहे.
अमेरिका हा मुक्त संस्कृतीचा देश म्हणताना तिथे तरी हा विषय मांडणे कुठे सोपे होते? इव्ह इन्सलर या अमेरिकन लेखिकेने ‘द व्हजायना मोनोलॉग्स’ लिहिले तेच मुळी एकतर्फी संवादाच्या रूपात. कारण परस्परसंवादाचा मोकळेपणा अमेरिकन समाजात तरी कुठे होता? तिथेही योनी वर्षांनुवर्षे अव्यक्तच होती. तिच्याकडे बोलण्यासारखे खूप होते. ते ऐकवण्याची ऊर्मी अनेक महिलांच्या मनात दाटूनही आलेली होती. इव्ह ही एक स्त्रीवादी कार्यकर्ती आणि लेखिका. तिने अनेकींच्या मुलाखती घेतल्या. महिलांना या विषयावर बोलते करणाऱ्या कार्यशाळा घेतल्या. आणि त्यातून असंख्य अव्यक्त अनुभवांची शिदोरी तिच्याकडे जमा झाली. त्यातूनच इव्हचा हा ‘प्रयोग’ जन्मला. तिने त्याचा पहिला प्रयोग न्यूयॉर्कमध्ये १९९६ साली केला. तेव्हा तिथेही त्यावर बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रयोगामुळे इव्ह इन्सलर जशी अनेक पुरस्कारांची धनी झाली, तशीच असंख्यांच्या तिरस्काराचीही. पण इव्हने नेटाने या विषयावर चळवळ सुरू ठेवली. आणि तिच्या मूळ प्रयोगात ती वेळोवेळी अनुभवांचे नवनवे तुकडे जोडत गेली.
चार-पाच वर्षांपूर्वी या मूळ इंग्रजी नाटकाचा मुंबईत झालेला प्रयोग पाहिला होता. (त्या मूळ प्रयोगाबद्दलचा संजीवनी खेर यांनी लिहिलेला लेख त्यावेळी ‘चतुरंग’ पुरवणीत प्रसिद्ध झाला होता.) दरम्यानच्या काळात त्या नाटकाबद्दल बरेच वाद-विवादही वाचनात येत होते. त्यामुळे या नाटकाच्या मराठीतल्या प्रयोगाबद्दलची उत्सुकता ताणली गेली होती. थोडी साशंकताही होती. मूळ इंग्रजी नाटकाचे भाषांतर करणे ही बाब किती कठीण आहे, याची पूर्णपणे कल्पना होती. त्यातली बिनधास्त मांडणी, धीट संवाद जसेच्या तसे मराठीत कसे आणले असतील, याची जरा धास्तीच वाटत होती. वंदना खरे यांच्या निमंत्रणावरून त्या प्रयोगाला जाणाऱ्या काहींनी आपापसात ती धास्ती व्यक्तही केली होती.
..बट इट वॉज सिंपली जबरदस्त!
हुरहुरत्या उत्सुकतेने या प्रयोगाला आलेल्या प्रेक्षकांना त्याने चकित केले आणि चीतही! अफलातून प्रयोग बघण्याची ती अपूर्व संधी ठरली. किंबहुना मूळ इंग्रजी स्क्रिप्टपेक्षाही हे रूपांतरण भन्नाट आहे. हे नुसते भाषांतर नाही, तर तो आशय आपल्या मातीतल्या संदर्भासह, भाषिक विविधतेच्या लहेजांसह या प्रयोगात उतरला आहे. या विषयाबद्दलचे गैरसमज, अंधश्रद्धा, संकोच या साऱ्या भावभावनांना भिडण्याचा एक परिपूर्ण प्रयत्न वंदना खरे यांनी केला आहे. आणि सादरीकरणात कुठेही ‘बघा, आम्ही कसे बिनधास्त आहोत!’, असा बडेजाव वा आविर्भाव त्यात नाही.
या प्रयोगात ‘योनी’ला मध्यवर्ती व्यक्तिरेखा केले गेले आहे. आणि मग सर्व अंगांनी एखाद्या विषयाला भिडावे, तो विषय सर्वार्थाने फुलवावा, तसा खटाटोप त्यांनी यात केलेला आहे. योनी या विषयाबद्दलच्या संकोचातून तिला बहाल केले गेलेले समानार्थी बोलशब्द, तिच्या अंतरंगाबद्दलची अनभिज्ञता, तिच्या अस्तित्वाची बेदखल, तिच्याबद्दल बोलण्याची घृणा, तिची एकूणच उपेक्षा- हे सारे अतिशय मोकळेढाकळेपणाने या प्रयोगात व्यक्त झाले आहे. त्याला स्पष्ट, धीट आणि गंभीर बाज आहे. नर्मविनोद, उपहास यांच्या ड्रेसिंगसह ते वास्तव समोर येते आणि म्हणूनच ते पेलणे सुकरही होते. या अवघड विषयावर महत्प्रयासाने काहीजणींना बोलते केले, तर सलज्ज कोकणी गोयंकार बाई कशी व्यक्त होईल, घाटावरच्या रांगडय़ा भाषेतले प्रकटीकरण कसे असेल, एखादी टीनएजर याच विषयावर काय सांगेल, आणि ७० वर्षीय जुने खोड तिच्या नाजूक अवयवाबद्दल काय बोलेल, अशा विविध अभिव्यक्ती त्या- त्या भाषेच्या छटांसह सामोऱ्या येतात तेव्हा विविध संस्कृतींतील योनीविषयक दृष्टिकोनांचे कवडसे आपल्यासमोर सादर होतात. आणि त्यामुळेच हे रूपांतरण परके वाटत नाही.
विविध अनुभवांचा कॅलिडोस्कोप या नाटकात समोर येतो. या अवयवाचे अस्तित्वच हीन मानणाऱ्या एका तरुणीला नेमका त्यावर मन:पूत प्रेम करणारा प्रियकर भेटतो, तेव्हा तिचा त्या अवयवाकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलून जातो. ती चक्क त्या अवयवाच्या प्रेमात पडते आणि मग इतकी वर्षे नकोशी असलेली योनी ती मोठय़ा असोशीने सांभाळू लागते. तिचा अभिमान बाळगू लागते.
एकीकडे असा सुखद सोहळा, तर दुसरीकडे भयंकर अनुभवाचा अंगार. युद्धनीतीचा भाग म्हणून बलात्काराच्या अस्त्राला बळी पडलेल्या महिलेच्या योनीने किती भयंकर अत्याचार अनुभवले असतील, हे जागतिक वास्तव दुसरी स्त्री अत्यंत विखारी शब्दांत परिणामकारकतेने शब्दांकित करते.
शृंगार आणि सृजन या दोन्ही भूमिकांत महत्त्वाचा ठरणारा हा अवयव. सृजनाच्या वेळी स्वत:चा नाजूकपणा भिरकावून देत विशाल रूप धारण करणाऱ्या योनीचा, तिच्या प्रजननक्षमतेचा यथार्थ गौरवही यात आहे.
या नाटकात योनीला व्यक्तिरेखेची भूमिका दिल्यामुळे तिला अनेक अंगांनी सादर केले गेले आहे. तिच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, आवडी-निवडी ज्या एरवी अव्यक्त राहिलेल्या असतात, त्या इथे थेटपणे शब्दबद्ध होतात. या प्रयोगाला अभिवाचनाचे स्वरूप होते. आठजणींनी स्टेजवर रांगेत खुच्र्या मांडून केलेले हे अभिवाचन, काळ्या-लाल रंगांची वेशभूषा असा हा साधासुधा प्रयोग होता. पण कसदार लेखन आणि वंदना खरे, गीतांजली कुलकर्णी, सावित्री मेधा अतुल, संगीता टिपले, निर्मला देशपांडे, सुहिता थत्ते, मेघा कुलकर्णी यांची प्रत्ययकारी संवादफेक यामुळे एकंदर आविष्कार सफाईदार होता. विशेषत: सावित्री आणि गीतांजली यांची अभिवाचने तर भन्नाट होती. या प्रयोगात प्रेक्षकांनाही सुरुवातीलाच सामील करून घेतले गेले होते. त्यांना मोकळेपणी प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे आवाहन केले गेले होते. त्यामुळे एकूणात संकोची विषयावरचा हा प्रयोग एकदम नि:संकोचपणे सादर झाला. प्रेक्षकवर्गही अभिरुचीपूर्ण होता. असा परिपक्व प्रेक्षक आणि वातावरण ही या प्रयोगासाठी आवश्यक व अपरिहार्य बाब आहे. त्याचे जाहीर, सार्वत्रिक प्रयोग शक्य वाटत नाहीत. शिवाय वंदना खरे यांना प्रयोगासंदर्भात काही व्यावहारिक अडचणींचाही सामना करावा लागतो आहे. त्यामुळे हा प्रयोग यापुढे छोटय़ा गटांसमोर सादर करण्याचा त्यांचा मानस आहे. केवळ प्रयोग नव्हे, तर ही एक चळवळ व्हावी, असे वंदना खरे यांच्यातील चळवळ्या कार्यकर्तीला वाटते. त्या ‘पुकार’ या स्वयंसेवी संस्थेत काम करतात. त्यांचा पिंड स्त्रीवादी विचारांच्या चळवळीवर पोसलेला आहे. त्यामुळे आपला हा प्रयोग म्हणजे या विषयासंबंधीचा संकोच दूर करणारी चळवळ ठरावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. या प्रयोगाला जोडूनच महिलांच्या गटचर्चा घडवाव्यात, अधिकाधिक जणींना यासंदर्भात बोलते करावे आणि त्याद्वारे या अवयवाच्या अस्तित्वामुळे स्त्रियांच्या वाटय़ाला येणारे अन्याय, अत्याचार, गौणत्व, पारतंत्र्य अशा नकारात्मक गोष्टी दूर कराव्यात, असे लेखिकेला वाटते आहे. या नाटय़प्रयोगाच्या निमित्ताने संकोचाचा पडदा दूर करण्याच्या या प्रयासाचे स्वागत करायला हवे.
शुभदा चौकर

‘मागच्या वर्षी ‘नवा माणूस’ दिवाळी अंकात लेख लिहिण्याच्या निमित्ताने माझी या नाटकाशी जवळून ओळख झाली. समाजाकडून संशोधनाच्या रूपात गोळा केलेली माहिती पुन्हा एका सृजनात्मक आविष्काराच्या रूपात समाजापर्यंत पोहचविणे आणि त्यातून समाजोपयोगी काम सुरू करणे, ही या नाटकाची प्रक्रिया मला खूप जवळची वाटली. एकप्रकारे मी आजवर ज्या प्रकारचे काम माझ्या संशोधन आणि प्रशिक्षणांच्या निमित्ताने केले आहे, त्याचा पुढचा भाग म्हणजे हे नाटक आहे, असे मला वाटते. मी या नाटकाकडे केवळ एक परफॉर्मन्स या दृष्टिकोनातून पाहतच नाही. या नाटकाचा प्रयोग हे एक साधन आहे. स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी बोलायला एक ‘अवकाश’ (स्पेस) निर्माण करणारी संधी या नाटकाच्या निमित्ताने तयार व्हावी, हा माझा हे नाटक करण्याचा मूळ उद्देश आहे. या प्रयोगांच्या निमित्ताने स्त्रियांनी आपल्या लैंगिकतेकडे ‘शारीरिक आरोग्य’ या मुद्दय़ापलीकडे जाऊन पाहावे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे..’
- वंदना खरे