Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

१० फेब्रुवारी हा दुर्गाबाईंचा जन्मदिन. यंदा त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. दरवर्षी ७ मे रोजी त्यांच्या स्मृतिदिनी ‘दुर्गा भागवत शब्द पुरस्कार’ दिला जातो. पुरस्काराचं हे चौथं वर्ष. त्यानिमित्तानं या तेजस्वी, कणखर अन् तत्त्वनिष्ठ लेखिकेला ही वंदना..
सात मे हा दुर्गाबाई भागवतांचा स्मृतिदिन. हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष. यानिमित्तानं त्यांचं स्मरण होणं हे साहजिकच! एरवीदेखील या उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यांवरची बहाव्याची झाडं पिवळ्या फुलांनी बहरली किंवा गुलमोहोर लालभडक फुलांनी शोभू लागले की बाईंची, त्यांच्या ‘ऋतुचक्रा’ची आठवण येतेच. शिवाय साहित्य संमेलनाचा जेव्हा तमाशा होतो, लेखनावर बंधनं येतात, लेखकाची लेखननिष्ठा डळमळीत होते, नेत्यांचं नीच पातळीवरील वर्तन, भ्रष्ट सत्तास्पर्धा समोर येते, तेव्हाही दुर्गाबाईंची आठवण अगदी अपरिहार्यपणे येते. आशयघन, भावगर्भ

 

ललितलेखन करणारी संवेदनक्षम, चिंतनशील वृत्तीची लेखिका, व्यासंगी अभ्यासक, लोकसाहित्याची संशोधक ही त्यांच्या व्यक्तित्वाची अनेकानेक रूपं आपण अनुभवलेली आहेत. तसंच स्वातंत्र्याचा ध्यास घेणारी, देशप्रेमी, अन्यायकारी गैरव्यवहारांविरुद्ध आवाज उठवणारी, विचारक्षम, जागरूक नागरिक म्हणूनही आपण त्यांचा अनुभव घेतलेला आहे.
आणीबाणीनंतर झालेल्या कराडच्या साहित्य संमेलनातील त्यांचं अध्यक्षीय भाषण, त्यात त्यांनी उत्स्फूर्ततेने लोकांना केलेलं स्वातंत्र्याचं आवाहन उपस्थितांना थरारून टाकणारं ठरलं. लोकांनी त्यांना ‘अग्निशिखा’, ‘राष्ट्रधर्मी दुर्गा’ वगैरे विशेषणांनी गौरविलं. तेव्हापासून आपल्या अंतर्मनातील सदसद्विवेकबुद्धीचा आवाज दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्त्वात मूर्त झाला आहे, असं सुजाण, सर्वसामान्य लोक मानू लागले. वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीशी नातं जोडू पाहणारे, त्या परिस्थितीवर विचार करून समाजाला काही सांगू पाहणारे मराठी लेखक अपवादानेच आढळतात. दुर्गाबाई या अशा अपवादात्मक लेखकांपैकी एक होत्या.
तसं पाहिलं तर दुर्गाबाईंचा मूळ पिंड हा राजकीय, सामाजिक कार्यकर्तीचा नव्हे. परंतु याबाबतीतले भान मात्र त्यांना लहानपणापासूनच होते. भागवतांच्या घरात राष्ट्रीय भावना जागृत असल्याने बाईंच्या मनावर लहानपणापासून तसेच संस्कार होत गेले. तो काळ होता १९२० च्या सुमाराचा. आजूबाजूचे वातावरणदेखील स्वातंत्र्य चळवळीला अनुकूल होत चाललेले होते. दुर्गाबाईंच्या मनात ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध तीव्र भावना होत्या. त्या म्हणतात, ‘‘१९२० नंतर भारतातल्या राष्ट्रीय राजकारणाने क्रियाशील दिशा धारण केली. स्वदेशीची चळवळ घरात शिरली. आम्हाला विलायती कपडे मिळणार नाहीत, असं वडिलांनी सांगितलं. गांधींवर आजोबांचा लोभ जडला होता. ‘क्रॉनिकल’नं धर्मपोथीचं रूप घेतलं होतं. तेव्हापासून सुरू झालेली ही आपल्या राजकीय अस्तित्वाची जाणीव या ना त्या रूपाने पुढे सतत वाढतच गेली. राजकीय अस्तित्वाच्या जाणिवेत संघर्ष आपोआपच येतो. आमच्या कृती, भावना याला मर्यादा होत्या. यशही अगदीच नव्हते असे नाही. पण राष्ट्रीय चळवळीमुळे आणि गांधींच्या नेतृत्वामुळे आत्मसंतुष्टता मात्र बाधू शकली नाही. हा माझा सर्वात मोठा लाभ झाला.’’
पुढेही राष्ट्रीय जाणीव सतत मनात घेऊनच त्यांचे शिक्षण झाले. सेंट झेवियर्स महाविद्यालयात त्या जेव्हा शिकत होत्या तेव्हा राष्ट्रीय चळवळीचा जोर खूपच वाढला होता. १९२९ साली बाईंनी एक वर्षांसाठी कॉलेजशिक्षण सोडून स्वातंत्र्य आंदोलनात भागही घेतला. या आंदोलनात जीव ओतून आपण काहीतरी करावे, अशी आंतरिक प्रेरणा होती. त्यात त्यांनी आठ महिने कामही केले. नंतर मात्र ‘आधी आपले शिक्षण पूर्ण करण्याचा’ सल्ला घरातल्यांनी दिला. आर्थिक परिस्थिती फार बिकट होती आणि सगळे शिक्षण शिष्यवृत्तीवर होत होते. त्यावेळी जरी त्यांनी पुन्हा प्रवेश घेऊन शिक्षण चालू ठेवले तरी लगेचच घडलेल्या एका प्रसंगाने त्यांच्या आंतरिक प्रेरणांना कलाटणी मिळाली. त्यावेळी जतींद्रनाथ दास हे क्रांतिकारक प्राणान्तिक उपोषण करून तुरुंगात वारले होते. देशभर हरताळ पडला होता. झेवियर्सच्या विद्यार्थ्यांनाही तसेच करावेसे वाटत होते. पण जर्मन प्राचार्य डय़ूर यांची नाराजी आपल्याला सोसता येईल का, याचा अंदाज त्या विद्यार्थ्यांना येईना. साऱ्यांनी मिळून दुर्गाबाईंना पुढे केले. प्राचार्याना त्यांनी सांगितलं, ‘‘आमचे देशभक्त नेते जतींद्रनाथ आज तुरुंगात वारले आहेत. त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहणार आहोत.’’ असं म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी समोरच्या आझाद मैदानावर (तेव्हा ते कापाचे मैदान होते!) धाव घेतली. एक खुर्ची आणली गेली. दुर्गा भागवत या हुशार विद्यार्थिनीला त्यावर उभं राहण्यास सांगण्यात आलं. बाईंनी तिथे पाचच मिनिटं भाषण केलं. त्यात त्यांनी सर्वातर्फे म्हटलं, ‘‘जतींद्रनाथ, तुमच्या त्यागाची नि देशप्रेमाची सर आम्हाला नाही. पण देशासाठी तुमचं उदाहरण पुढे ठेवून आमच्या अल्प शक्तीप्रमाणे आम्ही सतत प्रयत्न करू.’’ नंतर हे वचन आपल्याला पेलता येईल का, या भीतीने त्या गांगरल्या. त्यांना घुसमटल्यासारखे वाटले. हा प्रसंग वर्णन करून पुढे त्या म्हणतात, ‘‘आता मागे वळून पाहताना वाटते- ते वचन पाच टक्क्यांनी का होईना, आपण पाळले आहे. देशहिताला विघातक असे आपल्या हातून काहीही घडले नाही. प्रलोभने टाळता आली ती त्यामुळेच. अजूनही देशाचा प्रश्न समोर येऊन लहान बाबतीतही निर्णय घेताना हे वचनच मला स्वार्थ टाकायला शिकवते.. धैर्य देते!’’
वयाच्या १८-१९ व्या वर्षी दिलेले हे वचन बाईंनी शेवटपर्यंत पाळले. या प्रसंगाआधीची गोष्ट. बाई तेव्हा नाशिकच्या शाळेत होत्या. त्यांची आत्या- सीताबाई या त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांच्याजवळ या बहिणी राहत. एकदा गांधींची सभा नाशिकला घाटावर होती. दुर्गाबाई म्हणतात, ‘‘भाषण झाल्यावर कस्तुरबा लोकांत फिरल्या व त्यांनी (आंदोलनासाठी) दागिन्यांची मागणी केली. दागिन्यांचा त्याग केलेल्या त्या सौभाग्यमंडित वृद्धेला नाही म्हणवेना. मी हातातल्या दोन बांगडय़ा व धाकटय़ा बहिणीने अंगठी त्यांना दिली. हसून शाबासकी देऊन कस्तुरबा गेल्या. ती शाबासकी आम्हाला धन्यतेची वाटली. ही सगळी हकीकत जेव्हा घरी कळली तेव्हा आत्या गप्प होती. पण आजोबा म्हणाले, ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.’ आत्या नंतर म्हणाली, ‘जे तुमचं नव्हतं ते तुम्ही दिलंत.’ तेव्हा ‘दागिने आपले नव्हते’, हे कळले. जे आपले नाही, ते घालूच नये, असा विचार बळावत चालला. अलंकरणाबद्दलची उदासीनता एक स्वभावधर्मच बनून गेली. आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या जाणिवेचा पाया या घटनेने घातला गेला.’’
दुर्गाबाईंच्या मनावर त्यांच्या आत्याच्या शिस्तप्रिय वागणुकीचा परिणाम खूप मोठय़ा प्रमाणावर होता. अनेक गोष्टी तिने शिकवल्या, असं त्या कृतज्ञतेनं नमूद करतात.
लहानपणापासून अशा संस्कारांत वाढलेल्या दुर्गाबाईंनी स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या आणीबाणीचा निषेध करावा, सरकारी पुरस्कारांवर बहिष्कार घालावा, हे त्यांच्या विचारांशी सुसंगतच होते. त्या स्वत: कॉलेजात असताना त्यांनी त्या वयानुरूप कविता केल्या होत्या. संपूर्ण ‘गीतांजली’ संस्कृतात अनुवादिली होती. त्यांच्यातल्या लेखनोर्मी तरलतेने अभिव्यक्त होत होत्या. पण त्यातून त्यांच्या मनाचे समाधान होत नव्हते. त्यांनी आपल्या साऱ्या कविता जाळल्या. त्या म्हणतात, ‘‘मी कविता जाळल्या, त्या सुखाने जाळल्या. कारण माझ्या मनात काहीतरी प्रेरणा रुजू घातली जात होती. अवतीभोवती राष्ट्रीय आंदोलन चालू असताना रुद्र-करुणाचे जे ‘न भूतो, न भविष्यति’ असे नाटय़ मी प्रत्यक्ष पाहत होते व जगतही होते, निसर्गाची जी संथ लय मला सदैव घेरून टाकीत होती, त्या सर्वाचे स्पंदन माझ्या शरीरात व मनात सारखे होत होते. माझी कविता यातले काहीच धारण करीत नव्हती, असे मला चक्क जाणवले आणि मी ती नाहीशी केली.’’
राष्ट्रीयत्वाची एवढी तीव्र भावना मनात असताना त्यांनी पुढेही सक्रिय राजकारणात भाग का घेतला नसावा, असा प्रश्न मनात येतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९७५ पर्यंत त्या एक लेखिका म्हणूनच परिचित होत्या. त्यानंतर मात्र त्यांची भूमिका अधिक समाजाभिमुख झाली. लेखनावर, विचारांच्या अभिव्यक्तीवर आलेली बंधने झुगारून देण्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे, अशी ओढ त्यांना लागली. कारण ‘लेखनावर बंधनं आली की लेखन मरतं. लेखन मेलं की विचार मरतात. आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते नि विकृतीला आरंभ होतो,’ असं त्यांना वाटू लागलं होतं. तेव्हा त्यांना जाणवत होतं की, लेखक म्हणून आपली जबाबदारी आता निराळी आहे. त्या म्हणतात, ‘‘तेव्हा जाणवलं की, हल्ली राजकारणच तुमच्या जगण्याची निश्चित तऱ्हा ठरवतं. राजकीय वातावरण, सामाजिक सुव्यवस्था, तुमच्या जगण्याची चाकोरी हे सारं या राजकारणामुळेच ठरतंय. आज आपण अशा समाजात राहतो की जिथे बदल हा अटळ आणि हवासा आहे. पण लोकांना हे समजत नाही. आपण हवा तसा बदल घडवून आणू शकतो, हे त्यांना जाणता येत नाही. त्यामुळेच अशावेळी लेखकाची जबाबदारी अधिक वाढते. तुम्ही लेखक असलात तर एखाद्या विशिष्ट कारणासाठी, काही वैशिष्टय़पूर्ण प्रयोजनासाठी तुमची मानसिक गुंतवणूक अवश्य हवी. एक जागरूक नागरिक ही भूमिका हवी. एक नागरिक म्हणून आणि एक लेखिका म्हणून यावेळी माझं व्यक्तित्व एकच असायला हवं.’’
दुर्गाबाईंसारखी तेजस्वी, कणखर व्यक्तित्वं मनाला उभारी देतात, बळ वाढवतात. म्हणूनच त्यांचं स्मरण वारंवार करावंसं वाटतं, त्यांचे शब्द आठवावेसे वाटतात. २५-३० वर्षांपूर्वी त्यांनी एका भाषणात म्हटलं होतं, ‘‘राष्ट्र म्हणजे व्यक्तींचा समूह नव्हे. व्यक्तिमत्त्व असलेल्यांचा समूह म्हणजे राष्ट्र. अखंड विचारप्रवाहानं हे व्यक्तिमत्त्व घडतं. म्हणून मुक्त विचार आवश्यक आहे. आजूबाजूच्या अंधारानं आपण दबून जाता कामा नये. आपल्या हृदयात जेवढा प्रकाश असेल, तो सोबत घेऊन दुबळ्या पावलांनी, पण धीमेपणानं आपण वाटचाल केलीच पाहिजे. सावध राहा!’’
डॉ. मीना वैशंपायन