Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

मुलांना वाढताना मदत व्हावी, त्यात आपला डोळस सहभाग असावा म्हणून धडपड करणारे पालक दिसतात तेव्हा बरं वाटतं. कुणी मुलांना वस्तू खोलून बघायला प्रोत्साहन देतं, कुणी दूरवर फिरायला घेऊन जातं, कुणी सोबतीनं वाचन करण्यासाठी वेळ काढतं, कुणी आवर्जून मुलांबरोबर खेळतं..
आपल्या अगदी सहज हाताशी असलेल्या एका गोष्टीचा मात्र आपल्याला बऱ्याचदा विसर पडतो ती म्हणजे भाषा. आपली भाषा कधीही कुठेही आपल्याबरोबर असतेच. वेळोवेळी आपण आठवणीनं इतर वस्तू सोबत घेतो, तसं भाषा बरोबर घ्यायचं काम आपल्याला करावं लागत नाही. इतका ती आपला अविभाज्य भाग बनून गेलेली असते. गरीब-श्रीमंत, लहान-थोर, स्त्री-पुरुष.. सर्वाकडे ती असते. जगाच्या पाठीवर कुठेही आपण गेलो आणि काहीही करीत असलो तरी तिची सोबत असतेच.
संपर्काचं माध्यम म्हणून भाषेचं महत्त्व काय आहे याबद्दल खूप चर्चा होते. त्यापलीकडे भाषा आणि विचार, भाषा आणि भावना, भाषा आणि समस्या सोडवण्याची क्षमता, भाषा आणि परिस्थितीला वळण देण्याच्या शक्यता.. अशा अनेक पैलूंबाबत संशोधन होत राहिलं आहे.
कोणालाही अतिशय सहज उपलब्ध असल्यामुळे भाषेच्या उपलब्धतेबाबत आपण काहीसे बोथट होऊन जातो की काय याचा विचार करायला हवा. मुलांना भाषिक समृद्धी द्यायची असेल, तर हा बोथटपणा घालवायला लागेल. भाषेकडे जाणीवपूर्वक

 

बारकाईनं आणि संवेदनशीलतेनं बघायला शिकावं लागेल.. यासाठी करण्यासारखं खूप काही आहे; त्यापैकी शब्दांच्या काही खेळांबद्दल आपण समजून घेणार आहोत. मुलांना तर हे खेळताना विचार करायला मजा येतेच. पण आपल्यालाही तितकीच मजा येते!
कोणत्याही भाषेत शब्द एक असला तरी वेगवेगळ्या संदर्भात त्याचा अर्थ वेगवेगळा होतो, असे कितीतरी शब्द सापडतात. हे शब्द शोधणं मोठं रंजक असतं. मुलांच्या बहुदिश विचाराला त्यातून उत्तम प्रकारे चालना मिळते. नेमकेपणानं शब्दाच्या अर्थाचं वर्णन करण्याची क्षमताही त्यातून वाढीला लागते. मुलांनी शोधलेले शब्द आणि आपल्या स्वत:च्या शब्दात सांगितलेले अर्थ पाहा -
खार म्हणजे झाडावर चढणारी खार आणि लोणच्याचा खार.
पाट म्हणजे बसायचा पाट आणि पाण्याचा पाट.
पाठ म्हणजे आपली पाठ आणि कविता पाठ करतात ते पाठ.
वाट म्हणजे चालायची वाट आणि खाऊ वाट.
मोजा म्हणजे पायात घालतात तो मोजा आणि वस्तू मोजा.
घास म्हणजे भांडी घास आणि आपण खातो तो घास.
वा म्हणजे शाब्बास आणि रागवतात ते वा.
वाढ म्हणजे मोठं होतात त्याला म्हणतात आणि मला भात वाढ.
काढा म्हणजे चित्र काढा किंवा वही पिशवीतून काढा किंवा औषध पितात तो काढा.
मान म्हणजे मान द्यायचा असतो तो मान आणि आपली मान.
अशा सोप्या शोधांनी सुरुवात केली की पुढे एका शब्दाचे विविध संदर्भातले अर्थ शोधण्याचं आव्हान मुलं आनंदानं आणि सक्षमपणे पेलायला लागतात. भाषेकडे डोळसपणे आणि सखोलपणे बघणं हळूहळू त्यांच्या अंगवळणी पडत जातं. आपल्यालाही चटकन् लक्षात येणार नाहीत असे असंख्य संदर्भ मुलं शोधून काढतात. आतापर्यंतचा मुलांचा भाषिक अनुभव, मुलाचं वाचन, त्यांच्या भोवताली त्यांना ऐकायला मिळणारी भाषा हे सगळं मानसिक पातळीवर या निमित्तानं उजळलं जातं आणि नवा संदर्भ त्यांच्या मनात चमकला की त्यांचे डोळेही चमकून जातात!
पुण्यात गेली आठ र्वष मूलगामी भाषा विकास केंद्रात, दर शनिवारी मी मुलांबरोबर असते. तिथं चालणाऱ्या भाषेच्या वर्गात ‘पडणे’ या क्रियापदाचे मुलांनी शोधलेले असंख्य संदर्भ लिहिताना माझी दमछाक झालेली मला अजून आठवते. त्यातले काही संदर्भ, मुलांच्याच शब्दात, खरोखर पाहण्यासारखे आहेत.
कोणीतरी खाली पडतं. घडय़ाळाचे ठोके पडतात. दात पडतो. कधी कधी भांग नीट पडत नाही. खड्डा पडतो. भाग पडतात. पाऊस पडतो. ऊन पडतं. थंडी पडते (म्हणजे सुरू होते). वारा पडतो (म्हणजे थांबतो). बर्फ पडतो, गारा पडतात. अंधार पडतो आणि उजेड पण पडतो. झाडाची पानं पडतात. कापडाला, कागदाला किंवा कशालाही भोक पडतं. सांडलं की डाग पडतो. खळी पडते. दुपारी आजी पडते म्हणजे जरा वेळ झोपते. निवडणुकीत काहीजण पडतात. किती मार्क पडले. गाडी बंद पडते, घडय़ाळ बंद पडतं. माणूस मेला की त्याचं हृदय बंद पडतं. हे तुम्हाला केवढय़ाला पडलं. स्वस्त पडलं, महाग पडलं. लागलं की कधी कधी पाय काळानिळा पडतो. असं म्हणतात की तुमच्या तोंडात साखर पडू दे. पिकावर रोग पडतो. सिनेमा चालला नाही की पडतो, नाटक संपलं की पडदा पडतो. चेहरा पडतो. भूकंपात त्यांचं घर पडलं. स्वप्न पडतं. टक्कल पडतं!!
याहून कितीतरी जास्त संदर्भ मोठय़ांनी विचारात पडावं इतके नाना संदर्भ मुलांनी शोधले..
भाषेकडे कुतूहलाने बघण्याची सुरुवात करायचा अवकाश, त्यातली मजा पुन्हापुन्हा अनुभवण्याचा मोह आपल्यालाही न झाला तरच नवल!
वर्षां सहस्रबुद्धे