Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

शहरामधील एका शाळेत मी इयत्ता दुसरीची वर्गशिक्षिका आहे. वरचेवर मला काही प्रश्नांची उत्तरं देणं भाग पडत असतं. खरं म्हणजे रोजच्या अभ्यासक्रमाशी हे प्रश्न मुळीच निगडित नसतात. असले प्रश्न राष्ट्रीय पातळीवरच्या चाचणी परीक्षेतही विचारले जात नाहीत. त्या प्रश्नांपैकी काही प्रश्न वर्गामध्ये संशोधनाचा विषय मात्र नक्कीच बनू शकतात. (‘इस्थॅम बाई, फुलपाखरं वेगवेगळ्या रंगांची का बरं असतात?’ ‘थंडीमध्ये गवत कसं मरून जातं आणि उन्हाळ्यात परत जिवंत होतं?’) काही प्रश्न तर खोलवर विचार करण्यास भाग पाडतात आणि त्यांना बरोबर की चूक असं अचूक उत्तरही नसतं.
मुलांची उत्सुकता दाबून टाकणाऱ्यांपैकी मी नव्हे. तशी वेळ आल्यास आम्ही त्या संधीचा उपयोग करून घेत असतो व वर्गात त्यावर थोडय़ाफार प्रमाणात चर्चाही घडवून आणतो. मी प्रत्येकाला त्याचं/ तिचं मत व्यक्त करण्यास प्रोत्साहित करते व प्रत्येकाला आपलं असं स्वत:चं स्वतंत्र मत असतं हे नंतर समजावून सांगते. (‘रोज रात्री आम्हाला गृहपाठ का करावा लागतो?’ ‘जगामध्ये खरंच देवदूत असतात का?’) असे अनेक प्रश्न असतात त्या चिमूरडय़ांचे..
माणसामाणसात असणारा फरक या विषयावर आमची चर्चा अतिशय चांगल्या प्रकारे सुरू झाली होती. मी वर्गाला उद्देशून प्रश्न केला की खूप उंच व्यक्ती चांगली का वाईट असू शकते? केवळ उंच आहे म्हणून ती व्यक्ती चांगली किंवा वाईट होऊ शकत नाही यावर सगळ्यांचं एकमत झालं. मग मी त्यांना सांगितलं की मला एक बाई माहिती होती ती नीट चालू शकत नसे, त्यामुळे

 

ती नेहमी चाकांच्या खुर्चीचा वापर करत असे. मी प्रश्न केला की मग ती चाकाच्या खुर्चीचा वापर करायची म्हणून वाईट, दुष्ट होती का? आणि सर्वानी कबूल केलं की तसं काही ठामपणे त्यांना सांगता येत नव्हतं. अशा प्रकारे आम्ही बराच वेळ प्रश्नोत्तरांचा सिलसिला चालू ठेवला व अशा निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो की माणसामाणसातल्या तफावतीमुळे ती व्यक्ती चांगली का वाईट हे ठरवता येत नाही. फरक एवढाच की ती व्यक्ती सगळ्यांपासून वेगळी दिसते.
ती चर्चा मी जरा वैयक्तिक पातळीवर नेण्याचं ठरवलं आणि आमच्या सर्वामधल्या वेगळेपणाचा शोध घेण्याचा विचार केला. आमच्यापैकी प्रत्येकजण बाकींच्यापेक्षा कसा वेगळा आहे. दोन व्यक्तींमध्ये कधीच पूर्ण साम्य कसं नसतं. जुळ्या मुलांचं व्यक्तिमत्त्व कसं वेगवेगळं असतं. नाकीडोळे ते कसे निरनिराळे दिसतात आणि दोन स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळखता येतात, या सर्व बाबींवरती आम्ही अगदी मोकळेपणाने बोललो. नंतर मी त्यांना हेही सांगितलं की वर्गात सर्वापेक्षा वेगळी मी होते, कारण माझी उंची सर्वापेक्षा जास्त होती. मी एकटीच रेड ओक गावात राहणारी होते म्हणूनदेखील मी सगळ्यांपेक्षा वेगळी होते, कारण सगळे विद्यार्थी डॅलस शहरात राहत होते.
नंतर प्रत्येकाने आपण स्वत: कशा प्रकारे कसे वेगळे आहोत, हे वर्गाला समजावून सांगावं असं मी जाहीर केलं. मी पहिल्या विद्यार्थ्यांला जवळ बोलावतच होते तेवढय़ात वर्गामधल्या सर्वात शांत स्वभावाच्या मुलाने हात वर करत सांगितलं, ‘इस्थॅम बाई, खूप वेगळ्या दिसतात कारण त्यांचा वर्ण (रंग) सगळ्यांपेक्षा वेगळा आहे.’
आज मी जेव्हा त्याच्या त्या विधानावर विचार करते की पंधरा मोठी माणसं अशी एकत्रितपणे खोलीत बसलेली असताना हे साधं सरळ स्पष्ट सत्य जर कोणी सर्वासमोर मांडलं असतं, तर पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी सर्वाची अवस्था झाली असती. कोणीतरी त्या विचित्र शांततेचा भंग करावा या अपेक्षेने आपापसात नेत्रपल्लवी झाली असती. पण दुसरीच्या वर्गामधल्या पंधरा लहान लहान मुलांच्यात असं काहीच घडलं नव्हतं. ते वक्तव्य ऐकून उलट मुलांचा आरडाओरडाच सुरू झाला.
‘‘हो हो, इस्थॅमबाई तर गौरवर्णी आहेत.’’
‘‘नाही. गोऱ्या नाहीयेत की, त्यांचा रंग गुलाबी गुलाबी आहे.’’
‘‘मला वाटतं, त्या छानपैकी गव्हाळी रंगाच्या आहेत बरं का!’’
‘‘छे छे. मी सांगते-सायीसारखा रंग आहे त्यांचा.’’
‘‘मुळीच नाही. त्या पिवळसर वर्णाच्या आहेत.’’
‘‘त्यांची कातडी किती चकाकणारी आहे.’’
येणारं हसू दाबत मी वर्गाला सांगितलं की छोटे छोटे ग्रुप करून त्यांनी त्यावर चर्चा करत बसावं आणि मी हजेरीपुस्तक घेऊन ऑफिसमध्ये जाण्यास निघाले. वर्गातून बाहेर पडताक्षणी माझं गालात दडलेलं हसू बाहेर पडून मी पोट धरधरून हसायला लागले. तशीच हसत हसत मी ऑफिसमध्ये गेले व तिथे हजर असणाऱ्या दुसऱ्या एका शिक्षिकेला मी घडलेला प्रकार सांगितला. कधी एकदा वर्गात परत जाऊन त्यांची चर्चा ऐकतेय असं झालं होतं मला!
वर्गाचं दार उघडून मी आत शिरेपर्यंत प्रत्येकजण आपापल्या जागेवरती जाऊन बसलाही होता. त्यांची चर्चा संपलेली दिसत होती. (अरेरे! मी चुकवलंच ते सगळं!) मी निवडलेल्या एका ग्रुपचा म्होरक्या म्हणाला की त्याच्या ग्रुपमधल्या सगळ्यांना कळलं होतं की माझा वर्ण नक्की कोणता होता तो. पण त्यांचा अंदाज बरोबर की चूक होता हे मी सांगावं, असा त्यांचा आग्रह होता. तो मुलगा पुढे असंही म्हणाला की, पूर्ण वर्गानेच निर्णय घेतलाय की मला कोणताच रंग नव्हता. म्हणजे मी ‘निर्दोष’ होते.
‘निर्दोष?’ मी परत एकदा महत्प्रयासाने येणारं हसू दाबलं. त्या निर्णयापर्यंत ते कसे काय येऊन पोहोचले होते? तेवढय़ात शाळेची घंटा झाली. त्यांचा पुढचा तास त्यांचा व्यायामशाळेत होता. त्यामुळे माझी तात्पुरती तर सुटका झाली होती. व्यायामशाळेतून परत आल्यावर आपण त्या विषयावर बोलू असं सांगून मी त्यांना तिकडे पिटाळलं. आता ते आठवून मला कळतंय की तेव्हा मला परत भेटायची त्यांना खूप उत्सुकता लागून राहिली होती.
पेपर तपासता तपासता मी परत सकाळच्या घटनेचा विचार करत होते. मला आठवू लागलं की मी जेव्हा कधी अधिवेशन किंवा कार्यशाळेत जात असे किंवा एखाद्या पार्टीला गेले तरी मला एक प्रश्न नेहमी विचारला जाई. ‘‘तुमच्या विद्यार्थ्यांपैकी किती अश्वेत आहेत? किती गौरवर्णी आहेत? तुमच्या वर्गामध्ये हिस्पॅनिक विद्यार्थीदेखील आहेत का?’’ कित्येक प्रसंगी मी स्तब्ध होऊन, विचार करून व अक्षरश: मोजून मग एकेक उत्तर देत असे. ‘‘किती बरं अश्वेत मुलं आहेत माझ्या वर्गात? एकूण विद्यार्थी आहेत पंधरा. म्हणजे दहा अश्वेत, पाच हिस्पॅनिक का अकरा अश्वेत व चार हिस्पॅनिक’’ असा मला प्रश्न पडत आहे.
मला तो प्रश्न विचारणारी व्यक्ती आश्चर्यचकितच होत असते व तिला कोडं पडतं की मला वर्गातल्या मुलांची वांशिक माहिती कशी नाही. माझ्या अंदाजानुसार त्याचं कारण एकच की मी जेव्हा शिकवत असते तेव्हा मुलांना शिकवत असते. वेगवेगळ्या रंगांना शिकवत नाही. मला उमजू लागलं की माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही असंच होत असावं. ते मला श्वेत-अश्वेत की हिस्पॅनिक म्हणून ओळखत नाहीत तर एक व्यक्ती म्हणून माझ्याकडे बघतात. त्यांची काळजी घेणारी, त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन देणारी आणि रोज त्यांच्या बरोबरीने खूप काम करणारी या दृष्टीनेच ते मला बघत असतात.
माझे विद्यार्थी वर्गात परत आल्यावर त्यांच्याही डोक्यात सकाळी झालेल्या चर्चेचा विषय घोळतच होता. त्यांचा अंदाज बरोबर होता की चूक होता, हे मी त्यांना सांगावं म्हणून ते अजीजीने मला विनवत होते. शेवटी मला सत्य काय ते सांगावंच लागलं. त्यांचा अंदाज अगदी शंभर टक्के बरोबर होता. ‘‘मला काहीच-कोणताच रंग नाहीये.’’
आता जेव्हा कधी अधिवेशनात, कार्यशाळेत किंवा पार्टीला तो अनिवार्य प्रश्न मला विचारला जातो, ‘‘तुमच्या वर्गात किती श्वेत, अश्वेत व हिस्पॅनिक मुलं आहेत?-’’ त्यावर माझं एकच ठराविक उत्तर तयार असतं. अजिबात न अडखळता, न चाचरता, न मोजता प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यास डोळा भिडवत मी सांगते, ‘‘कोणी वेगळी वेगळी अशी नाहीचेयत मुळी. त्यांचा कोणाताही वेगळा असा रंग नाहीये!’’
मेलिसा डी. स्ट्राँग इस्थॅम
What Colour Are You?
स्वैरानुवाद : उषा महाजन
sayhi2usha@rediffmail.com