Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांनी आपली रणशिंगे फुंकली आहेत. सगळ्याच पक्षांचे उमेदवार आता रिंगणात उतरले आहेत आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. कुठे शालजोडीतले शेलके नजराणे तर कुठे अचूक शरसंधान, कुठे वस्त्रहरण तर कुठे पुरती दाणादाण. एकीकडे निवडणुकीचं हे सगळं धुमशान चालू असताना दुसरीकडे मात्र मनात हुरहुर दाटून येते. यातले किती उमेदवार स्त्रिया आहेत? किती घोषणा स्त्रियांसाठी दिल्या जात आहेत? अर्ध आकाश स्त्रियांनी व्यापलेलं असताना राजकारणात मात्र केवळ मूठभर स्त्रिया? इतर सर्व क्षेत्रांत सक्षमतेनं वावरणाऱ्या स्त्रिया काय राजकारणात आपली चमक दाखवू शकणार नाहीत? स्थानिक पातळीवर कुशलतेनं कारभार करणाऱ्या स्त्रिया काय लोकप्रतिनिधी बनून संसदेत आपली क्षमता सिद्ध करू शकणार नाहीत? की ‘गल्लीत तुम्ही आणि दिल्लीत मात्र आम्ही’ हाच यच्चयावत पक्षांमधल्या शक्तिमान पुरुषांमध्ये झालेला छुपा करार आहे? या पाश्र्वभूमीवर, उच्चस्तरीय राजकारणात सक्रिय असणाऱ्या दोन कर्तृत्ववान महिलांच्या जीवनकार्याचा वेध घेणे औचित्यपूर्ण वाटते. या दोघींनीही लिहिलेल्या त्यांच्या आत्मचरित्रांमधून त्यांची अद्भूत जीवनकहाणी उलगडत जाते. स्वतंत्र भारताचे तिसरे अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्या सहधर्मचारिणी दुर्गा देशमुख यांचे ‘आमची कथा’ आणि ग्वाल्हेर संस्थानच्या एकेकाळच्या महाराणी विजयाराजे शिंदे यांचे ‘राजमाता’.
‘आमची कथा’ हा दुर्गाबाई देशमुख यांच्या ‘चिंतामण अ‍ॅण्ड आय’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद होय. मुळातच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या आणि त्यातही स्त्रियांविषयी विशेष आस्था असणाऱ्या दुर्गाबाईंनी स्त्रियांसाठी भरीव कार्य केले. स्त्रियांसाठीचे कार्य हे राष्ट्रउभारणीचे कार्य समजून त्यांनी आपल्या प्रभावक्षेत्रातील स्त्रियांना शिक्षित व सक्षम करण्यासाठी

 

आपले अवघे जीवन समर्पित केले. बालपणी झालेला आपला विवाह मोडण्याचे धाडस त्यांनी दाखवले. देवदासीची दुष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी देवदासींना संघटित करून त्यांना महात्मा गांधींचे विचार ऐकवण्यासाठी दुर्गाबाईंनी धडपड केली. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे १२ वर्षे! त्यांना स्वत:लाही शिक्षणासाठी झगडावे लागले. त्यांची कुशाग्र बुद्धी ओळखून त्यांनी बाहेरून मॅट्रीकच्या परीक्षेला बसावे हा त्यांना मिळालेला सल्ला त्यांनी ऐकला आणि पुढे आंध्र विद्यापीठाची राज्यशास्त्र विषयाची एम.ए. व १९४१ साली कायदेविषयक पदवीही संपादन केली. मद्रास कोर्टातल्या त्या निष्णात वकील होत्या. यानंतर पंडित नेहरूंनी त्यांची योजना समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आणि त्यांच्याकडे समाजकल्याण खात्याची जबाबदारी सुपूर्त केली. दुर्गाबाईंच्या पुढाकारातून समाजोपयोगी कामांसाठी फार मोठा निधी राखून ठेवण्याची परंपरा सुरू झाली.
दरम्यान, अत्यंत बुद्धिमान व चिकित्सक वृत्तीच्या सी. डी. देशमुख यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. उतारवयातला त्यांचा व चिंतामणरावांचा हा विवाह समाजाच्या चर्चेचा विषय झाला. दाक्षिणात्य परंपरेत वाढलेल्या, अत्यंत साध्या पेहरावातल्या दुर्गाबाई आणि ऐटबाज, पाश्चिमात्य राहणी अंगिकारलेले सी. डी. देशमुख या दोघांचाही विवाह कमालीचा सफल झाला. याचे कारण, त्यांच्या सहजीवनाला त्यांच्यातल्या समविचारांइतकीच त्यांच्यातल्या देशप्रेमाची किनार लाभली होती. चिंतामणरावांची दूरदृष्टी व अभ्यासू वृत्ती यांची जोड दुर्गाबाईंनी समाजकल्याण खात्यातर्फे अंगीकारलेल्या कार्याला लाभली. दोघांमधली त्यागशील व नि:स्पृह वृत्ती वाखाणण्याजोगी होती. एके ठिकाणी दुर्गाबाई म्हणतात,
- ‘‘पूर्ण विचाराअंती आम्ही असे ठरवले की, आमच्यापैकी एकाने पूर्ण पगारावर नोकरी करावी व दुसऱ्याने देशासाठी विनामूल्य सेवा करावी आणि मला सांगायला आनंद वाटतो की हा आमचा संकल्प आम्ही जन्मभर पाळला.’’-
दुर्गाबाई व सी. डी. देशमुख या दोघांनाही जवळ आणणारा देशप्रेमाचा दुवा इतका बळकट असल्यामुळेच या प्रकाशज्योती एकमेकांत मिसळून गेल्या आणि उंचच उंच युकॅलिप्टस वृक्षांच्या साक्षीने सुरू झालेल्या या प्रेमकहाणीने युकॅलिप्टसची उंची गाठली.
माहेरच्या व सासरच्या घराण्यांचा इतिहास सांगता सांगताच विजयाराजे शिंदे आपल्या जन्माची कथा आपल्या ‘राजमाता’मध्ये कथन करतात. जन्मानंतर केवळ नऊ दिवसांतच आईचं छत्र हरपलेल्या एका अजाण मुलीला तिच्या आजीनं खूप लाडाकोडात वाढवलं. आपली नात तिच्या वडिलांकडे जाऊ नये म्हणून या आजीने खूप प्रयत्न केले. उपवर विजयाराजेंना खूप मोठय़ा घराण्यांमधील मुले सांगून आली. अखेरीस क्षत्रिय कुळातील विजयाराजे, मराठा कुळातील जिवाजीरावांशी विवाहित होऊन ग्वाल्हेरच्या महाराणी बनतात. योगायोगानं प्राप्त झालेलं राज्ञीपद, वैभव, मानमरातब हा खरं तर त्यांच्या जीवनातला विलक्षण भाग्ययोग! त्यानंतर दोन मुलींच्या आगमनानंतर झालेला मुलाचा जन्म आणि त्याचबरोबर मिळालेला राजमातेचा सन्मान, रसिक, उमद्या मनाच्या जोडीदाराचं प्रेम आणि सुखाचा संसार. सुखालाही भोवळ यावी, अशी स्थिती आणि त्यावर चढलेली दाट साथीसारखी तृप्ती!
स्वातंत्र्योत्तर काळात मात्र ही जीवनकहाणी वेगळं वळण घेते. संस्थाने विलीन होतात. हे विलीनीकरण राजीखुशीने स्वीकारून काँग्रेसवरील आपली निष्ठा दाखवून देण्यासाठी नाइलाजाने निवडणूक लढविण्याची वेळ येते आणि आतापर्यंत प्रजेला नखही न दिसलेली ही महाराणी संसद सदस्या होते. दरम्यान, चार कन्या आणि एक पुत्र यांच्या समवेत सुखाने गुजराण करीत असतानाच जिवाजीरावांचा दुर्दैवी अंत होतो. महाराणीचे भावविश्व उद्ध्वस्त होते आणि त्या ‘राजमाता’ बनतात. त्यांच्या जीवनकहाणीतले हे आणखीन एक महत्त्वाचे वळण!
पुढे इंदिरा गांधींचा मनमानी कारभार आणि संस्थानिकांवरची बंधने यांना कंटाळून विजयाराजे जनसंघात प्रवेश करतात. त्यांच्या कामाचा व्याप वाढतो आणि एकाएकी आणीबाणी जाहीर होते. विरोधी पक्षातल्या नेत्यांची धरपकड सुरू होते. अटकसत्राच्या या काळात, कोणत्याही परिस्थितीत देश सोडून न जाता, काही काळ भूमिगत राहिल्यानंतर विजयाराजे स्वत:ला अटक करवून घेतात. आणीबाणीचे पर्व आणि तिहार जेलमध्ये गुन्हेगारांच्या समवेत काढलेला सहा महिन्यांचा कालखंड यांना या आत्मचरित्रात विशेष स्थान आहे. त्या तुरुंगात असतानाच त्यांच्या प्रासादांवर पडलेल्या धाडी, मालमत्तेची झालेली नासधूस यासारख्या प्रसंगांच्या कटू स्मृती हादेखील या आत्मचरित्राचा प्रमुख अध्याय होय; पण या सर्वावरचा कळसाध्याय म्हणजे, त्यांचे पुत्र माधवराव शिंदे यांचा काँग्रेस प्रवेश आणि इंदिरा गांधींना खूश करण्यासाठी आईपासून दूर राहण्याचे नाटक करता करताच हळूहळू आईपासून मनाने दूर गेलेल्या आपल्या मुलाच्या वियोगाचा चिरदाह! आई-मुलातला हा अंतराय पुढे मालमत्तेसंबंधीच्या कोर्टातल्या वादांमुळे जगजाहीर होतो. शेवटी ‘राजमाता’ या सन्मानातला लोपलेला अर्थ शोधण्यात उरलेले सारे जीवन व्यतीत होते. मुलाशी निर्माण झालेली तेढ ही त्यांची अखेपर्यंत दुखरी नस बनते.
पडदानशीन वातावरणातली ही कोमलांगी राजकारणात उडी घेते आणि सत्तासंघर्ष, सूड, निवडणुका, शत्रूपक्षांच्या जहरी कारवाया ही सारी वादळे अंगावर घेते. वेळ येताच चीन युद्धानंतर आपल्याजवळचे एक हजार तोळे सोनं चुटकीसरशी देणगीदाखल देते आणि पुत्रप्रेमासाठी मूल्यांशी तडजोड न करता शेवटपर्यंत भाजपची उपाध्यक्षा म्हणून कार्यमग्न राहते. दुर्दैवावर मात करणाऱ्या स्त्रीमधल्या विजिगीषू वृत्तीचे हे जिवंत उदाहरण! परिस्थितीचे सम्यक भान असणाऱ्या आणि कठोर आत्मपरीक्षण करणाऱ्या विजयाराजे आत्मचरित्रातून आपल्या पक्षाचेही परखड मूल्यमापन करताना दिसतात.
आजच्या विधिनिषेधशून्य राजकीय वातावरणात, समाजकारणातून राजकारणाकडे वळलेल्या तत्त्वनिष्ठ दुर्गाबाई आणि मुला-पुतण्यांना पुढे आणणाऱ्या आजच्या घराणेशाहीच्या वातावरणाशी पूर्णतया विसंगत अशा आई-मुलांमधल्या संघर्षांच्या जीवघेण्या वेदना उरात वागवणाऱ्या विजयाराजे! दोघी कर्तृत्वशालिनी.
वस्तुत: कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आवश्यक असणारी बुद्धिमत्ता, कल्पकता, भान, नियोजन, निर्धार, चातुर्य, साहस, कणखरपणा यांसारखी वैशिष्टय़े ही केवळ पुरुषवर्गाचीच मिरासदारी नव्हे. निसर्ग तर या बाबतीत मुळीच पक्षपाती नाही. त्याने उदारहस्ते स्त्रियांनाही या गुणांचे वरदान दिले आहे. हे खरे राष्ट्राचे ‘स्त्री-धन!’ मग इतर सर्वच क्षेत्रांत स्त्रिया आपली चुणूक दाखवत असताना राजकारणातच मागे का? कोणते अदृश्य बांध त्यांची या क्षेत्रातली ऊर्मी बांधून ठेवताहेत? स्त्रीविषयक बुरसटलेला दृष्टिकोन, की पुरुषशक्तीचे सत्ताकारण? आज एकूणच विशुद्ध, निष्कलंक व्यक्तींची राजकारणात वानवा असताना इतके विपुल ‘स्त्री धन’ दुर्लक्षित राहणे आम्हाला खचितच परवडणारे नाही. संसदेतील लोकप्रतिनिधी हाच देशातील जनतेचा खरा नियंता, त्यांचा भाग्यविधाता. या लोकप्रतिनिधींमध्ये स्त्री-वर्गाचा जितका जास्त समावेश होईल तितके संपूर्ण स्त्री-विश्व सक्षम व समृद्ध होऊन देश प्रगतीकडे झेपावेल. राजकीय क्षेत्रातील दुर्गाबाई आणि विजयाराजेंसारख्या पूर्वसुरींनी घालून दिलेली पायवाट योग्य संधी मिळाल्यास आजच्या स्त्रीसाठीदेखील नि:संशय तिची प्रकाशवाट होईल.
डॉ. उज्ज्वला करंडे
ujwala.karande@yahoo.com