Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

नुकतीच वयात आलेली आणि यौवनानं रसरसलेली शकुंतला आपल्या दोन मैत्रिणींबरोबर तपोवनाच्या परिसरात झाडांना पाणी घालते आहे. एक भुंगा सारखा गुणगुण करत तिच्याभोवती घोटाळतो आहे आणि ती त्याची तक्रार मैत्रिणींकडे करते आहे.
झाडाच्या आडोशाला उभा असलेला राजा दुष्यंत त्या तिघींना पाहतो आहे, ऐकतो आहे आणि त्याचे डोळे शकुंतलेवर साभिलाष खिळले आहेत. शकुंतलेभोवती भिरभिरणाऱ्या त्या भुंग्याला उद्देशून तो मनात म्हणतो आहे..
.. वयं तत्वान्वेषान्मधुकर हतास्त्वं खलुकृती।।
भुंग्याचा हेवा वाटतो आहे राजाला. कारण भुंगा शकुंतलेच्या डोळ्यांना स्पर्श करतो आहे, कानाशी लागून गोड गुणगुणतो आहे आणि प्रणयाचं सारसर्वस्व असलेल्या तिच्या ओठावर ओठ टेकतो आहे. राजाला जे करायचं आहे, पण जे करता येत नाही, ते सगळं अगदी सहज करतो आहे तो भुंगा.
- भुंगा अगदी प्रथम लक्षात राहण्याजोगा पाहिला तो ‘शाकुंतल’च्या या पहिल्या अंकात. आणि मग सबंध नाटकभर त्याची गुणगुण ऐकू येत राहिली. तोपर्यंत संस्कृतातल्या कितीतरी श्लोकांमधून आणि सुभाषितांमधून तो दिसला होता. कधी सुंदरीच्या

 

डोळ्यांची उपमा म्हणून, तर कधी चंचलपणाचं प्रतीक म्हणून. कधी अनेक ठिकाणचा मध टिपून घेण्याच्या त्याच्या गुणग्राहक वृत्तीचं कौतुक होतं, तर कधी कमळावरच्या त्याच्या प्रेमाचा गौरव होता.
‘शाकुंतल’मधला भुंगा त्या सगळ्यांपेक्षा वेगळा होता. शकुंतलेभोवती घुटमळून तिला बावरून टाकण्याइतकाच साधा नव्हता तो. कालिदासासारख्या प्रतिभावंत कवी-नाटककारानं त्या साध्या प्रसंगाचे धागे माणसांच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि भविष्याशीही किती खोलवर गुंतवून टाकले आहेत, हे लक्षात आलं आणि त्या भुंग्याचं वेगळेपण सहज कळलं.
एखाद्या नुकत्या उमलू लागलेल्या फुलासारखी आहे शकुंतला. यौवनानं दरवळणारी. जीवनाच्या मधानं काठोकाठ भरलेली. शिवाय आश्रमाच्या लहानशा जगात वाढल्यानं जगाच्या व्यवहारापासून आणि पुरुषाच्या स्त्रीच्या वाटय़ाला येणाऱ्या गुंतागुंतीच्या कित्येक अनुभवांपासून बहुतांशी दूर असलेली. कण्वांची मानसकन्या म्हणून विशेष संरक्षित असलेली. मुग्ध आणि भोळीही.
अकस्मात आश्रमात आलेला राजा दुष्यंत तिला पाहतो आहे आणि ती तरुण, कोवळी मुलगी त्याला हवीशी वाटते आहे. त्याच्या मनात उद्भवलं आहे ते प्रेम नव्हे; तर तिला चाखून पाहण्याची इच्छा! तो तिच्यासारखा अननुभवी नाही; प्रौढ आणि पक्व आहे. ‘ज्ञातास्वाद’ आहे. त्याच्या अंत:पुरात वसुमती आहे, हंसपदिका आहे. आणखीही राण्या असतील. पण त्याला शकुंतला आवडली आहे आणि तिचा आस्वाद घेण्याची त्याची इच्छा आहे. ती इच्छा कशी पूर्ण होईल, एवढाच विचार तो करतो. त्यासाठी योग्य ती सर्व समर्थनं शोधतो आणि कण्वांच्या अनुपस्थितीत आपली इच्छा तृप्त करून शकुंतलेला नंतर घेऊन जाण्याचं आश्वासन देऊन निघूनही जातो.
त्याआधीच आपल्या विदूषक मित्राला साऱ्या लव्याजम्यासकट त्यानं राजधानीत परत पाठवलेलं आहे आणि त्यानं शकुंतलेसंबंधीचं आपलं नवीन प्रकरण आपल्या राण्यांना सांगू नये म्हणून धूर्तपणे योग्य ती काळजीही घेतली आहे.
महाभारतात येणाऱ्या शकुंतलेच्या कथेतला राजा दुष्यंत तर पुरेसा व्यवहारी, संभावित आणि अनुभवानं तयार असा आहे. शाकुंतलात खुणेची अंगठी हरवण्याचं एक कथानक निर्माण करून कालिदासानं त्याला सावरून घेण्याचा आणि एका परीनं प्रेमाला वंचनेपासून वाचविण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. मात्र, राजाचं मूळचं व्यक्तिमत्त्व मोठय़ा सूचकतेनं त्यानं भुंग्याच्या प्रतिमेतून प्रकट केलं आहे. शकुंतलेला पुढे तो ओळखही नाकारतो. तिचा अपमान करून तिला हाकलून देतो. अशा प्रसंगापूर्वी, त्याची चाहूल देणारं एक भावाकुल गीत कालिदासानं त्याच्या हंसपदिका राणीला गायला लावलं आहे..
अभिनवमधुलोलुपस्त्वं तथा परिचुम्ब्य चूतमज्जरीम्।
कमलवसति मात्रनिर्वृतो मधुकर विस्मृतोऽस्येनां कथम्।।
- नवीन मधाला चटावलेल्या भ्रमरा, कमळात विसावण्याचा आनंद घेणारा तू, आम्रमंजिरीचं तशा प्रकारे चुंबन घेऊन, मग तिला सहज कसा विसरलास रे?
ज्यामध्ये मनाचं गुंतणं नाही, स्नेहाचा, आपलेपणाचा अंश नाही, असा आस्वाद घेण्यात कुशल असलेला भुंगा आणि सगळा संकोच नाइलाजानं दूर ठेवून रतीच्या अति नाजूक प्रसंगाची आठवण देत समोर उभ्या असलेल्या शकुंतलेला ओळखदेणंही नाकारणारा राजा! ‘शाकुंतल’ सार्वकालिक अनुभवांना सारखा स्पर्श करत राहतं. आस्थेच्या आणि निष्ठेच्या अभावी चंचल आस्वाद किती निष्करुण आणि कठोर होऊन जातो, त्याचं उदाहरण म्हणून कालिदासाचा भुंगा सतत प्रेमसंबंधांभोवती घोटाळत राहतो असं वाटतं. स्त्री-पुरुषांमधल्या कोवळ्या आणि मधुर नात्याला मिळालेला काळा शाप म्हणजे हा चंचलतेचा भुंगा- असं वाटत राहतं आणि मन विस्कटून जातं.
पण या विस्कटलेपणाला सावरणारं एका भुंग्याचं आत्मार्पणही खरं तर आपल्याला माहीत आहे ना? ज्ञानदेवांसारख्या प्रज्ञावंतानं आपल्या जाणिवेला दिलेली ती समृद्ध कळा कशी विसरावी? एक मध्ययुगीन कवीनं जीवनाचं, मानवी संबंधांचं एक विषण्ण आणि अंतर्मुख करणारं दर्शन कमालीच्या काव्यात्म, सूचक आणि संयत रीतीनं घडवलं; आणि काही शतकांनंतर दुसऱ्या एका कवीनं त्याच संबंधांचं दर्शन आपल्या प्रज्ञेच्या आणि प्रतिभेच्या बळानं कमालीच्या उदात्त पातळीवर नेलं.
ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात अर्जुनाच्या मनातला विषाद व्यक्त करताना ज्ञानदेवांनी लिहिलेल्या त्या ओव्या आठवा..
जैसे भ्रमर तरी भेदी कोडे। भलतैसे काष्ठ कोरडे
परी कळिकेमाझी सापडे। कोवळिये।।
तेथ उत्तीर्ण होईल प्राणे। परी ते कमळदळ चिरू नेणे
ऐसे कठिण कोवळेपणे। स्नेह देखा।।
जगन्नाथ पंडिताच्या ‘भामिनीविलासा’तला म्हणून प्रसिद्ध असलेला, पण बहुधा त्याच्या पूर्वी आणि ज्ञानदेवांच्याही पूर्वी सर्वश्रुत असलेला एक संस्कृत सुभाषितश्लोक आहे-
बन्धनानि खलु बहूनि सन्ति।
प्रेमरज्जुकृतबन्धनमन्यत्।
दारुभेदनिपुणोऽपि षडंध्रि:।
निष्क्रियो भवति पंकजकोशे।।
बंधनं पुष्कळ असतात, पण प्रेमाचं बंधन काही वेगळंच आहे. लाकूड पोखरण्यात कुशल असलेला भुंगा कमळाच्या कोशात (अडकल्यावर मात्र) निष्क्रिय होतो.
सुभाषितकाराचा दृष्टांत किती बोलका आहे! लाकूडसुद्धा पोखरू शकणारा भुंगा त्याच्या प्रेमाच्या कमळकळीत अडकतो तेव्हा मात्र निष्क्रिय होतो. त्याला त्या कमळाच्या पाकळ्या पोखरून बाहेर पडणं शक्य होत नाही. प्रेमाच्या बंधनाचं हे वैशिष्टय़च आहे. ते असतं कोवळं. पण ते तोडणं तेवढंच कठीण असतं. प्रेम करणाऱ्याला तर अशक्यच असतं.
सूर्यविकासी कमळ संध्याकाळी सूर्य मावळल्यावर पुन्हा मिटून जातं आणि चंद्रविकासी कुमुदही चंद्र मावळल्यावर पहाटे मिटून जातं. कमळाच्या अंत:कोशात विसावलेल्या भुंग्याला उडण्याचं भान नसतं किंवा त्याला उडून दूर जायचंच नसतं. म्हणून तो त्या मिटल्या कळीत अडकतो. सुभाषितकारानं या निसर्गघटनेचा उपयोग प्रेमबंधनाचं मर्म सांगण्यासाठी केला खरा; पण ज्ञानदेवांनी त्याची ती कल्पना अनुवादताना किती समृद्धपणे विस्तारली आहे!
भुंगा लाकूड पोखरतो, पण तो अगदी सहजपणे. विनासायास. आणि ते लाकूडही असतं अगदी कोरडं. शुष्क. पण तो जेव्हा कोवळ्या कळीत सापडतो तेव्हा काही वेगळंच घडतं. लाकडाचा कठीणपणा आणि कळीचा कोवळेपणा आवर्जून सांगतात ज्ञानदेव आणि म्हणतात, ‘तिथे तो भुंगा प्राण देईल, पण त्या कमळाची पाकळी पोखरणार नाही. दुखावणार नाही तो त्या कळीला. तिला इजा करणार नाही. प्रेम किती कठीण कोवळं असतं पहा!’
कोवळ्या कळीत सापडतो भुंगा. ज्ञानदेव ‘अडकतो’ म्हणत नाहीत; ‘सापडतो’ म्हणतात. आणि कळीलाही पुन्हा ‘कोवळी’ असं एक विशेषण लावतात. भुंगा त्या कमळकळीत उतरला आहे. तिच्या गाभ्याशी विसावला आहे. त्याचा जीव तिच्या जीवात गुंतला आहे. आता ती मिटली म्हणून दूर व्हायचं कसं? तिच्या पाकळ्या पोखरल्याशिवाय त्याला बाहेर पडता येणार नाही. त्याला ते माहीत आहेच. आणि त्याच्यासाठी ते अगदी सोपंही आहे. जो कठीण असं लाकूड सहज पोखरू शकतो त्याला कमळाची मृदु पाकळी पोखरणं काय अवघड आहे?
पण भुंगा ते करणार नाही. त्या कळीच्या कोवळेपणाला तो धक्का लावणार नाही. पण मग त्याला त्या बंद कळीतून बाहेरही पडता येणार नाही. प्राणच जाईल त्याचा. म्हणजे मुक्ती मिळेल. पण ती प्राणांचीच मुक्ती असेल. भुंग्याला ते माहीत आहे. आणि तरी तो कमळाला धक्का लावणार नाही. जिच्यावर प्रेम केलं त्या कळीला सुखरूप ठेवण्यासाठी तो स्वत:चे प्राणही देईल, पण तिला इजा नाही होऊ देणार.
आपण जिच्यावर एकतर्फी प्रेम केलं, तिनं प्रतिसाद दिला नाही तर तिच्यावर अ‍ॅसिड फेकणाऱ्या किंवा तिला जीवे मारणाऱ्या प्रेमवीरांना प्रेमाचं हे हृदयरहस्य कधी तरी कळेल का? आपण ज्याच्यावर जिवाभावानं प्रेम केलं, त्या माणसाच्या प्रेमाचा हळुवार आस्वाद घेण्याइतकं ते विवश असतं, त्या माणसाला सर्वस्वानं जपण्याइतकं कोवळं असतं. आणि तसं जपण्यासाठी प्राणांचं मोल देण्याइतकं कठोर निर्धाराचंही ते होऊ शकतं.. ‘ऐसे कठिण कोवळेपणे स्नेह देखा.’
सुभाषितकाराचं ऋण श्रीमंत करत ज्ञानदेवांनी या ओव्या लिहिल्या नसत्या तर शाकुंतलातला तो अदय आणि चंचल भुंगा, प्रेमाच्या कोवळ्या सुगंधी कळीपर्यंत कसा पोचला असता? आणि हळूहळू प्राणार्पणालाही सिद्ध झालेली त्याची मनोज्ञ गुणगुण आपल्या जाणिवेपर्यंत तरी कशी पोहचली असती?
अरुणा ढेरे