Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

थंडी कमी होत होत पहाटेपुरतीच राहायची. आणि मग परीक्षा आणि उन्हाळ्याची चाहूल बरोबरच लागायची. त्याचवेळी आमच्या आया-आज्यांची उन्हाळी वाळवणांची लगबग चालू व्हायची. फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रथम लाल ओल्या मिरच्यांचे गालिचे धाब्यांवर, गच्च्यांवर वा अंगणात पसरले जायचे. तो लालभडक काश्मिरी गालिचा उन्हात डोळे दिपवायचा. दोन-चार दिवसांत मिरच्या छान कोरडय़ाखट्ट झाल्यावर सुपा-परातीत घेऊन, बोटांना तेल लावून त्यांची डेखं निघायची. त्यातल्या काही लाल तिखटाकरता दळणासाठी कांडप गिरणीकडे रवाना व्हायच्या. काही मसाल्यासाठी कोठीघरातल्या डब्यात जायच्या. मिरच्यांच्या पसाऱ्याच्या आगेमागेच नव्या गव्हाची पोती डेरेदाखल होत. मग गव्हाची सतरंजी उन्हात ठिकठिकाणी अंथरलेली दिसायची. चांगली कडकडीत दोन-तीन उन्हं दाखवली की अडसून, पाखडून, निवडून गहू कोठीमध्ये विश्रांतीला जायचे. सर्वसाधारणत: मोठय़ा एकत्र कुटुंबामधले गावा-तालुक्यांतले हे २०-२५ वषार्ंपूर्वीचे परिचयाचे

 

दृश्य. त्या जुन्या दिवसांतल्या वडे, पापड-कुरडयांच्या वाळवणांची गंमत वेगळीच असे. विशेषत: लग्न- घरी गौरीच्या पूजेला पाटावर मध्ये पैसा- सुपारी ठेवून मुहूर्ताचे वडे घातले जायचे. घरोघरी इतरत्रही वर्षांचे वडे घातले जायचे. (अजूनही आमच्या आसपासच्या खेडय़ांत पायली-पायलीने डाळी भिजवून दळल्या जातात. आता जागोजाग गिरण्याही आहेत.) प्लॅस्टिकच्या लांबलचक कपडय़ावर पिवळ्या वडय़ांची बुट्टेदार नक्षी गच्च्यांवर खुलून दिसायची.
कुरडयांचा पसारा तर तीन-चार दिवस व्यापायचा. चांगल्या प्रतीचे गहू तीन दिवस भिजत पडायचे. कुरडया शुभ्र होण्यासाठी रोज पाणी बदलून त्यांची तांब काढायची. मला आठवतं, आजीकडे कुरडयाचे (गहू दळायचे) यंत्र होते. ते अशावेळी नेमके गल्लीतल्या कुणाकडे तरी डय़ुटीवर गेलेले असायचे. मग आजीचा हुकूम व्हायचा- ‘‘जा गंऽ, सुतवण्यांकडे जाऊन आपलं यंत्र घेऊन ये. बरोबर शिवरामला ने. जड आहे. तुला नाही आणता येणार.’’ त्याचा ‘स्क्रू’ नीट, न हरवता आणण्याबद्दलही आजी बजावून सांगायची. एव्हाना कोठीघराच्या कोपऱ्यात वर्षभर सायडिंगला पडलेली जड बुडाची पितळी पातेली, पळ्या, उलथणी आईने लक्षुंबाईकडून घासूनपुसून लख्ख केलेली असायची. घरात तीन दिवस गव्हाचा आंबूस वास पसरलेला असायचा. चार घरांतले लाकडी वा पितळी सोरे घेऊन चार शेजारणी यायच्या. उन्हं वाढायच्या आत लवकरच सकाळी गव्हाचा चीक शिजवून गच्चीत प्लॅस्टिकवर किंवा स्वच्छ धोतरांवर कुरडयांची पांढरीशुभ्र चक्रे खुलून दिसायची. चिकाचा वानवळा, कुरडयांचा नमुना या साऱ्याची शेजारपाजारी देवाणघेवाण चालायची. तसा (जिरेदार) शुभ्र चीक कैक वर्षांत खाल्लेला नाही. पण त्याची चव मात्र अजून जीभ विसरलेली नाही. गव्हाच्या राहिलेल्या चोथ्याची दुसऱ्या दिवशी कांद्यावर केलेली भाजी काय मस्त लागायची भाकरीबरोबर!
त्या दिवसांत घरोघरी नेमाने आठवडय़ातले काही उपवास करणारी मंडळी भरपूर. मग त्यांची सोय म्हणून (त्यांच्याबरोबर उपास न करणाऱ्यांची सोयही व्हायची!) साबुदाण्याचे पळीपापड घातले जायचे. शिवाय बटाटय़ाचे, पोह्याचे पापड असेही कितीतरी प्रकार. बटाटय़ाच्या चकत्या, कीस वगैरे प्रकरण आणखीन वेगळेच. तेव्हा बायकांना हे सोपस्कार करण्याची आवड व सवड दोन्ही असायचे. किंबहुना त्यांचे हे वर्षांचे काम या दिवसांत ठरलेलेच. कारण एकतर आतासारखं तेव्हा सगळे काही ‘रेडिमेड’ मिळतही नव्हतं आणि मोठय़ा कुटुंबांना विकतचं घेऊन कुठून पुरवठा पडणार, हेही बायका जाणून असत. त्यामुळे ही वाळवणाची कामे अग्रक्रमानं केली जायची.
खिशीच्या पापडांचा वेगळाच धबडगा. नागलीची असो वा तांदळाची खिशी असो, हा गृहिणीप्रिय प्रकार जो खाईल त्याला आवडणारा. ‘खिशी घेणे’ हा प्रकार जिला अगदी हातखंडा जमतो, तिच्यावर हे पापड तडीस लावण्याची सारी भिस्त असायची. पीठ किती, पाणी किती, चवीला काय काय अन् किती प्रमाणात, वाफ कशी दणदणून हवी, इ. सोपस्कारांत ती वाकबगार असायची. पापड अलगद लाटून पालथ्या टोपलीवर पसरवायचे व अलगद उन्हात टाकायचे. हे विशिष्ट तंत्र बहुतेक बायांना वर्षांनुवर्षे पापड करण्याच्या सरावाने अंगवळणी पडलेले. वाळून तयार झालेल्या नव्या पापड-कुरडयांचा भाजून, तळून आस्वाद घेताना घरातल्या मंडळींची शेरेबाजी चालायची. ‘पसाभर फुललीय कुरडई तळल्यावर- अन् रंगही काय शुभ्र आलाय!’ ‘मीठही अगदी योग्य तेवढेच झालंय.’ ‘आणखी भाजा हो पापड शेगडीवर. मस्त टेस्ट आलीय.’ असे शेरे कानी पडले की करणारीला पहाटेपासून उठून, उन्हातान्हात केलेल्या कष्टांचे चीज झाल्यागत वाटायचे.
माघाची थंडी सरता सरताच घरात पायली- दोन पायली नागली येऊन पडायची. मंगळसूत्राच्या झीरो मण्यांच्या आकाराचे किंवा बारीक मोहरीसारखे लालसर किरमिजी रंगाचे नागलीचे दाणे कोठीघरात घमेल्यात विसावले असायचे. मग ती स्वच्छ धुऊन, पाण्यात भिजत घालून पीठ करण्यापर्यंतचे सगळे सोपस्कार आजी व आई निगुतीने करायच्या. खिशी घेण्याच्या वेळी ‘खिशी एक्स्पर्ट’ आंबूताईला सांगावा धाडलेला असल्याने ती हजरच असायची. आजीलाही खिशी जमायची. पण तिला आंबी जोडीदारीण लागायचीच. ‘बघ- पाणी इतकं पुरे का?’ वगैरे सल्लामसलत चालायची. शिवाय पिठाची उकड घेताना तो एवढा मोठा ऐवज हलवायला बळही हवे ना! त्याकरता म्हणून आंबूताई लागायचीच.
मग एकीकडे ते अलवार लाटलेले पापड उन्हं खात पडायचे आणि घरातील मागच्या न्हाणीघराच्या चौकात ते रेबडलेले पातेले, पळी, उचटणे, झाकणी इ. पाण्यात भिजत दुसऱ्या दिवशी येणाऱ्या सोनूबाईची वाट बघत पडलेले असायच. आणि आजीच्या चेहऱ्यावर ‘पडलं बाई पार एकदाचं!’ असा समाधानी भाव असायचा.
आता आम्ही त्या कष्टाळू, सुगरण आजीच्या नाती नागलीचे पापड शेकडय़ाच्या भावाने (लागले तरच) विकत घेतो. गॅसवर ते धड भाजताही येत नाहीत. तळले तर कॅलरीजच्या गॅलरीज भरतात. त्यामुळे आताशा फक्त कुळधर्म- कुळाचाराच्या वेळी, सर्व आप्त एकत्र जमले की पापड, कुरडया नैवेद्याला लागतात म्हणून तळणे होते, तेवढेच!
उडीद, मुगाच्या पापडांचाही असाच व्याप असायचा. पापडखार, मिरीच्या प्रमाणावर आई-आजीची साधकबाधक चर्चा व्हायची. बहुतेक वेळा उडदाचेच पापड व्हायचे. मुगाचे क्वचित. या पिठाच्या गोळ्याचे ‘मऊ मेणाहून व वज्राहून कठीण’ असे वर्णन करणे अतिशयोक्तीचे न ठरावे. तेल लावून ते पीठ बत्त्याने कितीतरी वेळ कुटले जायचे. मग त्याच्या दोऱ्याने किंवा सुरीने टपोऱ्या लाटय़ा. त्यांच्या वाटय़ा घरोघरी पोचवायची व आणायची जबाबदारी माझी व माणिक या आत्येबहिणीची. दातात गचागच अडकायच्या तरी त्या लाटय़ा खाव्याशा वाटायच्या. संगमरवरी, लाकडी (सनमायकाचे तेव्हा नव्हते), गुलाबी दगडाचे वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे पोळपाट व वेगवेगळ्या अंगकाठय़ांची लाटणी बायकांसकट जमायची. समोरच्या कोकिलाबेनकडून रेघाची लाटणी येयाची. लाटय़ांच्या वाढत्या गोलांवर उमटणाऱ्या रेघांची मजा वाटायची. आम्ही पोरीसोरीही हौसेने जोर देऊन घसाघसा पापड लाटायचो.
दुसऱ्या दिवशी हातांचे तळवे दुखरे जाणवायचे. लाटलेले पापड उन्हात व पोळपाट-लाटणी ज्याची त्याच्या (जिची तिच्या) बरोबर घरी पोहोचत असे. यथाकाल पापडांच्या चळती डालडाच्या डब्यांचे पत्रे ठोकून केलेल्या मोठय़ा ऐसपैस गोल डब्यात जात. हा उडीद पापडांचा साठा घरोघरी नमुना पाठवून, लेकीसुनांना देऊन, वर्षभर वेळोवेळी वापरूनही नव्या पापडांच्या मोसमापर्यंत पुरून उरत असे.
या सगळ्या प्रकारांच्या तुलनेत हात-शेवया व पाट-शेवयाचे काम भलतेच नजाकतीचे व कौशल्याचे. आता खेडय़ापाडय़ांत हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच मायभगिनी हे प्रकार करत असतील. मला माझ्या आजीने केलेली व नंतर सासूबाईंना करताना पाहिलेली गहू ओळावणे, दळणे, वस्त्रगाळ पीठ करणे, रवा वेचणे वगैरे सारी कुटण्याची कामे आठवतात व त्या बायकांची धन्य वाटते. त्या केसासारख्या बारीक शुभ्र लांबसडक शेवया. अजून आमच्या मालेगावी मोठय़ा घराच्या देवघरात मला बांबूवर वाळत टाकलेल्या लांबसडक शेवया पाहिल्याचा कधी कधी भास होतो. अलीकडे इंग्लंडच्या लेकीकडे पास्त्याच्या लांब, जाड विणकामाच्या सुया पाहिल्या आणि पुन्हा आपल्याकडच्या शेवयांची आठवण झाली. बाकी आता इतर कामांसारखे हेही काम यंत्रे हा-हा म्हणता करू लागली आहेत.
या पदार्थात मीठ भरपूर असते व ते तळले जातात म्हणून डॉक्टर मंडळी पापड, लोणची खाण्यास हल्ली मनाई करतात. कशाला दमवणूक, कोण खाणार, असे प्रश्न ज्यांची पापडांची फर्माईश असते, तीच घरातली मंडळी विचारतात. बायकांना तरी कुठे वेळ आहे, हे पसारे मांडायला? अगदीच खावेसे वाटले तर आहेतच- लसणाच्या फ्लेवरबरोबर छानशा कवितेचा फ्लेवर असलेले, पसरलेल्या हाता-तळव्याच्या आकाराचे लिज्जत पापड किंवा मोठमोठे बिकानेरी पापड. पैसे टाका, सारे काही हजर!
पापड, कुरडया हे तळणीचे पदार्थ म्हणून नाके मुरडणाऱ्या आमची गंमत पाहा. आम्हाला कुरकुरे, लेज, फ्रायम्प्स, टोमॅटो किंवा पालक चिप्स, फ्रेंच फ्राइज हे नित्य नवनवे बाजारात चकचकीत पुडय़ांमध्ये येणारे चटकमटक प्रकार टाइमपास म्हणून चालतात. मात्र पापड- कुरडयांचे तळण म्हटल्याबरोबर कॅलरीजचा डोंगर आडवा येतो.
पूर्वीच्या मोठय़ा एकत्र कुटुंबांची ही वाळवणं म्हणजे एक गरज होती असे म्हणायला काही हरकत नाही. ‘घरचे केलेले मानत नाही’, हे आमच्या आया-आज्यांचे तत्त्व त्यामागे होतेच. वर उल्लेखलेल्या मुख्य वाळवण प्रकारांशिवाय आणखीही कितीतरी उपप्रकार.. उदा. राबवडय़ा, कोंडवडे, ताकातल्या मसाला मिरच्या, शंख सांडगे, आंबोण्या इ. वाळवले जात. उन्हाळ्यात भाज्या महागतात. खेडय़ातून शहरांकडे त्यांचा ओघ असतो. पावसाळ्यात काही वेळा अतिवृष्टीने त्या खराब होतात. भाजीपाल्याच्या अनुपस्थितीच्या वेळी ही वाळवणं गृहिणीच्या मदतीला द्रौपदीच्या थाळीगत धावून येत. मग कुरडयांची भाजी, राबवडय़ांची भाजी, वडय़ाची आमटी, पापडाची भाजी अशी ताटाची उजवी बाजू सजायची. शिवाय शेतीमळा असलेल्या कुटुंबात सालदार- महिनदारांच्या जेवणासाठी आलटून-पालटून हा बेत कामास येई. हे सारे अजूनही खेडोपाडी थोडय़ाफार प्रमाणात होतेच. एक चांगले आहे की, त्यातले शारीरिक कष्ट आता यंत्रसाहाय्यामुळे उणावले आहेत.
‘नेमेचि’ येणाऱ्या पावसाळ्याआधी उन्हाळाही येतोच. एखाद्या शेजारणीच्या गच्चीवर वडय़ा- पापडांचे गालिचे अंथरलेले सकाळी सकाळी दिसले की मला त्या गृहिणीच्या मेहनती वृत्तीचे कौतुक वाटते व आजीचे शब्द आठवतात- ‘घरचे मानत नाही!’
शोभा अशोक बडवे