Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

उन्हाळी सुट्टय़ांचे दिवस सुरू झाले आहेत. शाळा-कॉलेजात मोठी सुट्टी असल्यामुळे फिरायला बाहेरगावी जाण्याचे, सहलीचे, पर्यटनाचे कार्यक्रम ठरत असतील, ठरले असतील. एक काळ असा होता, जेव्हा मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत गावाला जायचे प्लॅन्स असत. हळूहळू तो काळ बदलला. सुट्टीच्या निमित्ताने थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचे, प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याचे दिवस आले. पर्यटनाचा आवाका देश-विदेशातही पसरला. एकटय़ा कुटुंबाने पर्यटनाला जायचं म्हणजे प्रवासाची तिकिटं काढणं, राहण्या-खाण्याची व्यवस्था करणं हे सगळं सहलीच्या खूप आधी करावं लागायचं. हे कष्ट वाचवायच्या उद्देशातून conducted tours, package tours सुरू झाल्या. एकूण काय तर सहल- पर्यटन याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन विस्तारतो आहे. Conducted किंवा Package Tour मध्ये अनेक वेळा प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा भरगच्च कार्यक्रम असतो. पण सगळ्यांनाच असा

 

भरगच्च कार्यक्रम मानवेलच असं नाही. त्यामुळे आपली आवड, हाताशी असलेला वेळ, आर्थिक क्षमता यांचा विचार करून सहल प्लॅन केली तर ती सर्वानाच अधिक एन्जॉयेबल होऊ शकते.
शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास असतो. अभ्यासक्रमात उल्लेख असणाऱ्या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली तर मुलांना त्यात इंटरेस्ट वाटू शकतो. महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले आहेत आणि महाराष्ट्राचा मोठा इतिहास या गडकिल्ल्यांभोवती गुंफला आहे. अशा काही गडकिल्ल्यांना सुट्टीत भेट देता येईल. सगळ्याच गडकिल्ल्यांना भेट देण्यासाठी ट्रेकिंग यावंच लागतं असं नाही. अनेक किल्ल्यांपर्यंत पायऱ्या किंवा चालण्याचा रस्ता आहे. ट्रेकिंगची इच्छा आणि हौस असणाऱ्यांसाठी दुर्गम गडकिल्ले आहेतच.
कुटुंबातल्या प्रत्येक माणसाची आवड वेगळी असते. त्यामुळे सहलीचं प्लॅनिंग करताना सर्वाच्या आवडीला वाव मिळेल, याचा विचार करावाच लागतो. आपण केवळ आपल्याच दृष्टिकोनातून सहल प्लॅन करून उपयोग नाही, याचा बोलका अनुभव आम्ही घेतला. अंदमान बेटांवर आम्ही फिरायला गेलो होतो. तिथे हॅव्लॉक नावाच्या बेटावरचा राधानगरी हा समुद्रकिनारा नितांत सुंदर आहे. तिथल्या स्वच्छ, निळ्याशार पाण्याच्या प्रथमदर्शनानेच जीव सुखावतो. आम्ही त्याचं कौतुक करत होतो तर आमच्या तीन वर्षांच्या मुलीने आम्हाला विचारलं, ‘तुम्ही माझी वाळूत खेळायची खेळणी आणली आहेत ना?’ तिच्यासाठी वाळूत खेळणं, आई-बाबांच्या सोबतीने किल्ला, भुयार करणं जास्त महत्त्वाचं होतं!
लहान मुलांना घेऊन सहलीला जायचं असेल तर प्रवास किती दूरचा आहे, याचा विचार फार महत्त्वाचा असतो. अतिदूरच्या प्रवासात मुलं कंटाळू शकतात, अगदी लहान मूल असेल, तर खाण्या- पिण्याच्या वेळा बिघडून मूल किरकिर करू शकतं. लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास उत्तम! ट्रेनमध्ये इकडून तिकडे फिरता येतं. अनेक स्टेशनांवर थांबत जाणारी ट्रेन असेल तर प्रत्येक स्टेशनवर चढणारे- उतरणारे प्रवासी, खाद्यपदार्थ विकायला येणारे यांची मुलांना गंमत वाटते. स्वत:च्या वाहनाने प्रवास केला तर कुठची गाणी ऐकायची, कुठे थांबायचं, याचं स्वातंत्र्य राहतं. लहान मुलं किंवा वयस्क माणसं असतील, तर थोडय़ा प्रवासात पोचता येईल, असं ठिकाण निवडलं पाहिजे. मुंबईच्या कर्जत- बदलापूर- विरार- वसई या उपनगरांच्या परिसरात अनेक फार्म हाऊसेस आहेत. यातली काही अगदी घरगुती स्वरूपाची आहेत. सुट्टीत निव्वळ आराम करण्यासाठी किंवा एकमेकांबरोबर Quality Time घालवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
सहल म्हटली की शहराबाहेरच जायला पाहिजे, असं थोडंच आहे? अनेक वेळा आपण राहत असलेल्या शहराचेही अनेक पैलू आपल्याला माहीतच नसतात. अगदी मुंबईसारख्या शहरातही राणीबागेचा वृक्षांचा खजिना आहे. शिवडीसारखा पडझड झालेला का होईना पण किल्ला आहे. हँगिंग गार्डनसारखी प्रशस्त सुंदर गार्डन्स आहेत. वांद्रे येथे जुन्या काळातले सुंदर बंगले आहेत. एखाद् दोन दिवस आपल्याच शहराचं वेगळं रूप पाहण्यासाठी देता येतील की!
सहल- पर्यटन म्हणजे निव्वळ प्रेक्षणीय स्थळांना भेट असं नाही. प्रेक्षणीय स्थळापर्यंतचा प्रवासही छान एन्जॉय करता येतो. किंबहुना कधी तरी केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी म्हणून प्रवास करता येईल. प्रवासात निसर्गसौंदर्य अनुभवता येतं. पावसाळ्यातला मुंबई-पुणे किंवा कोकण रेल्वेने केलेला प्रवास म्हणजे निसर्गसौंदर्याची लयलूट असते. प्रवासात अनेक प्रकारची माणसं भेटतात. त्यातून नवे बंध जोडता येतात आणि फक्त परिचित अशा प्रवाससाधनांनी प्रवास करायचं बंधनही नको. बैलगाडीसारखा एरवी सहजसाध्य नसणारा प्रवासही सहलीच्या निमित्ताने अनुभवता येईल. घोडय़ावर स्वार होणं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पण म्हशीवर आरूढ होऊन पाण्यात डुंबायची कल्पना कशी वाटते?
माझ्या माहितीतल्या एका लहान मुलीने सहलीच्या निमित्ताने आपल्या आई-वडिलांना छान कामाला लावलं. तिची मागणी अशी होती की, मासे कसे पकडले जातात, त्यासाठी काय काय आणि कशी मेहनत घेतात, हे पाहायचंय. महाराष्ट्राला मोठी किनारपट्टी आहे आणि या किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणावर मासेमारीही चालते. काही कोळी बांधवांशी मैत्री करून दोन-चार दिवस सागरकिनारी राहून त्या सर्वानी मासेमारी शब्दश: अनुभवली.
थोडी ‘हटके’ सहल करायची म्हणजे बरीच पूर्वतयारी करावी लागते. सहलीसाठी थोडेच दिवस असतील तर प्रवासात १०-१२ तास घालवण्यात अर्थ नाही. प्रवासाच्या साधनावरही प्रवासाचा वेळ आणि आराम अवलंबून असतो. निव्वळ प्रवासाची मजा अनुभवायची असेल व १०-१२ दिवसांची मोठी ट्रिप असेल तर मात्र दूरचं ठिकाणही निवडता येईल. सहलीचा कार्यक्रम ठरवताना थोडी Flexibility ठेवली पाहिजे. एकदम भरगच्च कार्यक्रम ठेवला तर आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. नुसती धावपळ होईल. प्रवासात होणारा उशीरही थोडा फार गृहीत धरला पाहिजे. सहलीच्या ठिकाणी पोहोचल्यावर जवळपासचा प्रवास करण्याची व्यवस्था आधी ठरवली असेल तर आयत्या वेळी शोधाशोध करावी लागत नाही. अलीकडे महत्त्वाची रेल्वे स्टेशन्स, एअरपोर्ट इथे प्री-पेड टॅक्सीची सुविधा असते. ही सोयीस्कर आणि बऱ्याच अंशी सुरक्षित असते. जंगल सफारीसारखा कार्यक्रम असेल तर हत्तीवरून सैर करायची की वाहनातून सैर करायची, हे ठरवलं पाहिजे. जंगलातल्या सफारी ठराविक वेळेत होतात. ही वेळ माहीत करून घेऊन त्यानुसार बाकीचे कार्यक्रम आखले तर आयत्या वेळी गोंधळ होत नाहीत.
सहलीमध्ये प्रवासाइतकंच महत्त्व राहण्याच्या, खाण्या-पिण्याच्या व्यवस्थेला आहे. अलीकडे डायबेटीस, ब्लडप्रेशर अशा तब्येतीच्या त्रासामुळे, आरोग्याच्या जागरूकतेमुळे खाण्या-पिण्याची बंधनं असतात. लहान मुलांचेही खाण्या-पिण्याचे चॉईस असतात. या दृष्टीने प्रवासाला निघताना तयारी केली पाहिजे. पर्यटकप्रिय ठिकाणी आपण जात असू तर खाण्या-पिण्याचे फार प्रॉब्लेम्स येत नाहीत, पण जंगल सफारी किंवा ग्रामीण भागात जायचं झालं तर आपल्याला पाहिजे तसं जेवण मिळेलच असं नाही. त्यामुळे कोरडा खाऊ बरोबर ठेवणं केव्हाही फायद्याचं ठरतं.
पर्यटनाची क्षितिजं विस्तारत असल्यामुळे एकटय़ा स्त्रीने किंवा फक्त आई आणि मूल यांनी प्रवास करण्याचंही प्रमाण वाढतं आहे. ग्रुपबरोबर फिरायला जाण्यात सुरक्षितता असते, पण स्वतंत्रपणे जायचं असेल तर व्यवस्थित प्लॅनिंग करून जाता येईल. एकटीने जाताना रात्री-अपरात्रीचे प्रवास टाळले, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास केला, तर सुरक्षितपणे ट्रिपचा आनंद घेता येईल.
सहल किंवा पर्यटन म्हणजे नेहमीच्या धकाधकीच्या धावपळीच्या रुटीनपासून दूर जाऊन मिळवलेला निवांतपणा! कधी तो एकटय़ाने मिळवायचा असेल कधी कुटुंबाबरोबर! पण तो मिळवण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन विचार केला तर सहल अधिक आनंददायी ठरू शकते!
सुप्रिया देवस्थळी