Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

शिक्षणाच्या क्षेत्रातून शिक्षा हद्दपार केली तर शिक्षणच होणार नाही, असे काही जणांना वाटते असे दिसते. दिल्ली महापालिकेच्या शाळेतल्या शिक्षेमुळे एका विद्यार्थिनीच्या झालेल्या मृत्यूच्या क्रूर घटनेचा प्रश्न हा केवळ त्या शिक्षिकेला जन्मठेप करून सुटणारा नाही. तर त्यावरून धडा घेऊन देशभरातील सर्व शिक्षक आणि पालकांचे मानस शिक्षाविरहित शिक्षणासाठी तयार होऊन शाळा आणि घरे शिक्षामुक्त झाली पाहिजेत..
शाळा आणि तुरुंग या जगातील दोनच जागा अशा आहेत की जिथे कुणीच स्वत: होऊन जात नाही, तिथं दाखल करावं लागतं..
- जे. कृष्णमूर्ती
शाळा आणि तुरुंगातील हे साम्य दाखवताना जे. कृष्णमर्ती यांसारख्या द्रष्टय़ा महात्म्यालाही कल्पना नसेल की शाळा आणि तुरुंगातील साम्य हे छळ आणि कोठडीत होणाऱ्या मारहाणीच्या मृत्यूशीही जोडले जाणार आहे..
दिल्ली महापालिकेच्या शाळेतल्या शिक्षेमुळे विद्यार्थिनीचा झालेला मृत्यू हेच क्रौर्य अधोरेखित करते. आचार्य रजनीशांनी एके काळी शिक्षण क्षेत्रात मुलांमध्ये प्रेम संक्रमित करण्यासाठी पुरुष शिक्षकांऐवजी सर्वत्र शिक्षिकाच नेमण्याची सूचना केली होती. या शिक्षिकेने तो आशावाद भाबडा ठरवून क्रौर्य हे लिंगनिरपेक्ष असल्याचे स्पष्ट केले.
इलेक्ट्रॉनिक माध्यमे वाढल्यापासून शारीरिक शिक्षांच्या अशा घटना सातत्याने पुढे येत आहेत. माध्यमे त्यांची सविस्तर दखल घेतात आणि पुढील घटनेपर्यंत शांतता. शाळा आणि शिक्षक त्याचा फक्त इतकाच अर्थ घेतात की, मारहाण इतकीच करायची

 

की ज्याची ‘बातमी’ होणार नाही! छडय़ा, अंगावर फटके, उठाबशा, अंगठे धरणे, शाब्दिक अवमान, शिवीगाळ असे सर्वच प्रकार अनेक ठिकाणी सुरू राहतात. पालकांचीही त्याबाबत फारशी तक्रार नसते. फक्त रक्तस्राव होणे, अंगावर शिक्षेच्या खुणा उमटणे यावरच पालक व माध्यमे तुटून पडतात, अशी एक विसंगती आढळते.
‘किमान पातळीवर शिक्षा व्हावी’, ‘चांगल्या सवयींसाठी शिक्षा करावीच लागते’ हा पालकांचा शाळांबाबत सूर असतो. शिक्षकही तेच बोलत राहतात, पण एकूण शिक्षाच शाळांतून हद्दपार व्हावी अशी भूमिका शाळा घेत नाहीत. शिक्षक, पालक, शाळा या घटकांनाही शिक्षा काढून टाकली तर शिक्षणच होणार नाही असेच वाटते की काय? ते चाकोरीच्या पलीकडे जाऊन विचार करत नाहीत. त्यामुळे दिल्लीतील घटनेचा प्रश्न केवळ त्या शिक्षिकेला जन्मठेप होण्यापुरता मर्यादित नाही तर देशभरातील सर्व शिक्षक आणि पालकांचे ‘शिक्षाविरहित शिक्षण’ मानस तयार होऊन शाळा आणि घरे शिक्षामुक्त होणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे.
पुन्हा शिक्षा ही फक्त शाळेपुरतीच नाही तर तिचा वापर कुटुंबात जास्त आहे. भारतात दरवर्षी ४००० विद्यार्थी परीक्षेत नापास झाल्याने आत्महत्या करतात. यात कुटुंबातील शिक्षेची व आपल्याला अपयशासह समजूून घेतले न जाण्याची खात्री असणे हे प्रमाण मोठे आहे. आत्महत्या केलेल्या एका मुलीने चिट्ठीत लिहिले होते- ‘मी जर जगले असते तर नापास झाल्यामुळे पप्पांनी टॉमी कुत्र्याच्या साखळीने मला मारले असते म्हणून मी घाबरले.’ तेव्हा कुटुंबातील मुलांची होणारी तुलना, लादली जाणारी अपेक्षांची ओझी मारहाणीपेक्षाही जास्त हिंसक आहे. पालकांकडून टोचून बोलणे हे शाळांमधील रक्तस्रावापेक्षाही जास्त दाहक असते. अबोला हा प्रत्यक्ष शिक्षा देण्यापेक्षाही जरुरी असतो. त्यामुळे शिक्षा हा विषय एकूणच समाजव्यवस्थेच्या मूल्यांमधूनच बाद करता येईल का, यावर चर्चा व्हावी.
युरोपात मध्ययुगीन काळात शिक्षेला प्रतिष्ठा मिळाली. चर्चच्या मूल्यांच्या विशिष्ट आग्रहाचे रूपांतर चर्चमधील शाळांमधील शिक्षेत सुरू झाले. १६ व्या शतकात गुन्हेगारांना जाहीर शिक्षेच्या अंमलबजावणीमुळे शिक्षेला प्रतिष्ठा मिळत गेली. भारतातील आपल्या सर्व पुराणकथा या शाप आणि वरदानाशी जोडल्या आहेत. एका चुकीमुळे संपूर्ण जन्म किंवा पुढचा जन्मच वाया घालविणारे शाप या अमानुष शिक्षाच आहेत. संतकोटीला पोहोचलेले हे ऋषी- मुनी इतके कठोर कसे? आम्ही या शापांचे दैवतीकरण केले. आज्ञाधारक असणे, शिक्षकाला प्रमाण मानणे याला सद्गुण समजले जाते, याचे मूळसुद्धा आमच्या गुरू-शिष्यांच्या कथांमध्ये आहे. आमच्या शालेय शिस्तीची व्याख्या ही उद्धट(! ) प्रश्न न विचारणारा, चाकोरीत विचार करणारा, आज्ञाधारक, व्यवस्थेला आव्हान न देणारा अशी झाली. शिक्षक मुलांना शिस्त मोडल्याबद्दल शिक्षा करतात, पण बऱ्याचदा खोलात तपासले तर शिस्त मोडण्याची व्याख्या ही या प्रकारची असते. याचे कारण शिक्षकसुद्धा शेवटी याच व्यवस्थेचे ‘प्रॉडक्ट’ असतात. तेसुद्धा याच सामाजिक मूल्यव्यवस्थेला मानणारे असतात.
कोणतीही शिक्षण व्यवस्था ही शेवटी त्या काळातील राजकीय, सांस्कृतिक व्यवस्थेचे अपत्य असते. त्या व्यवस्थेला पाहिजे असलेली माणसे बनवून देण्याचा शाळा हा कारखाना असतो. एका विशिष्ट साच्यातून माणसे घडवून त्या व्यवस्थेला पुरविणे हे शिक्षण व्यवस्थेचे उपयोजन असते. तेव्हा सामाजिक व्यवस्थेत जोपर्यंत शिक्षेला प्रतिष्ठा आहे, तोपर्यंत शाळांमध्ये शिक्षा राहणारच, हे कटू वास्तव आहे.तेव्हा शिक्षकांची मनोभूमिका कशी बदलायची, हा खरा प्रश्न आहे.
विद्यार्थी मरेपर्यंत, जखमी होईपर्यंत शिक्षक, पालक पिसाट का होतात? याचेही विश्लेषण होणे गरजेचे आहे. जे. कृष्णमूर्तींनी अचूक मांडणी केली आहे. व्यक्ती आपला अहंकार सुखावण्यासाठी, स्वामित्वाची भावना फुलवण्यासाठी इतरांचा वापर करते. ‘समरहिल’मधील शिक्षकाने म्हटले आहे की, शारीरिक शिक्षा करणे ही सुप्त लैंगिक विकृती आहे. कृष्णकुमार यांनी वेगळाच मुद्दा मांडला आहे. ते म्हणतात की, शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेच्या तळाशी आहे. त्याचे सर्व प्रकारे शोषण होते. त्या शोषणातून विविध स्वभावदोष त्याच्यात निर्माण होतात. या पातळीवरही संशोधन गरजेचे आहे.
शिक्षेने जर अपेक्षित परिणाम साधला गेला असता तर ती क्षम्यही मानली गेली असती, पण वास्तव तसे नाही. महाराष्ट्राचे माजी शिक्षण सहसंचालक भाऊ गावंडे यांनी लहानपणी बेदम मारणाऱ्या व धान्य मागणाऱ्या शिक्षकाला दगड फेकून जखमी केले आणि शाळा सोडून दिली होती. विद्यार्थ्यांतील अपमानाची प्रतिक्रिया इतकी तीव्र असते. पुढे त्याच गावात आलेला एक प्रेमळ शिक्षक भाऊंना युक्तीने, प्रेमाने शाळेत आणतो व तोच उनाड विद्यार्थी अधिकारी होतो. ‘प्रकाशाच्या उंबरठय़ावर’ पुस्तकातील ही सत्यकथा विद्यार्थ्यांची शिक्षेसंदर्भातील मानसिकता स्पष्टपणे सांगते.
मला स्वत:ला हे लिहिताना शरम वाटते, पण इंग्रजीचा शिक्षक असताना मोठय़ा वर्गातले विद्यार्थी इंग्रजी लिहू शकत नसत तेव्हा मी त्यांना खूप वाईट प्रकारे मारत असे. तरीही अपेक्षित परिणाम दिसेना. त्याच काळात मी ‘तोत्तोचान’ पुस्तक वाचलं. मग स्वत:चीच लाज वाटली. प्रयोगशील शिक्षणाचा शोध घेत नव्या पद्धती शोधल्या. यातला मुद्दा हा आहे की, मुलांना अभ्यास येत नाही यात विद्यार्थ्यांना दोषी मानण्यापेक्षा शिक्षकाने स्वत:ला दोषी मानायला हवे. सातत्याने अध्यापनाच्या नव्या नव्या पद्धती शोधत राहिल्या तर शिक्षांची गरजच उरणार नाही. कारण आज शिक्षकांचीही एक अपरिहार्यता आहे, अगतिकता आहे. शाळांमधील स्पर्धा वाढली आहे. पालकांच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट निकाल आणि शिस्त असलेली शाळा चांगली. त्यामुळे संस्था आणि पालकांचे शिक्षकांवर निकालाचे दडपण वाढत चालले आहे. वर्गातील विद्यार्थिसंख्याही शहरात प्रचंड आहे. त्यामुळे अपेक्षित बदल वेगाने घडविण्यासाठी शिक्षक शिक्षेचा आधार घेऊन झटपट परिणाम करण्याचा प्रयत्न करतात. यावर उपाय म्हणजे प्रयोगशील शाळांनी जी अध्यापनाची तंत्रे विकसित केली आहेत, ती सर्व शाळांमधील शिक्षकांपर्यंत पोहोचवायला हवी. गडचिरोली जिल्ह्य़ातील शाळेत मी इ. चौथीचा प्रत्येक माडिया आदिवासी मुलगा इंग्रजी पुस्तक छान वाचतो हे बघितले, तर ‘ग्राममंगल’च्या ऐनाच्या शाळेत एका वारली मुलीपुढे लाकडी ठोकळे टाकल्यावर तिने केवळ नजरेने त्याचे पूर्णाकयुक्त अपूर्णाक करून सांगितले. या माडिया, वारली विद्यार्थ्यांचे निरक्षर पालक, दारिद्रय़ असूनही विद्यार्थ्यांची इतकी संपादणूक आहे, याचे कारण प्रयोगशील शिक्षणात आहे व ते सिद्धही झाले आहे. याचा अर्थ इतकाच, जितकी वर्गातील आंतरक्रिया ही आनंददायी व विद्यार्थिकेंद्री होईल, त्या प्रमाणात शिक्षा ही हद्दपार होईल.
शिक्षा करण्याचा सर्वात वाईट परिणाम हा वंचित समूहातील विद्यार्थ्यांवर होतो. त्यांचे प्रत्यक्ष जगणे आणि शाळा यांच्यातील फरक तीव्र असल्याने शाळेत ही मुले रुळायला खूप वेळ लागतो. पण बऱ्याचदा शिक्षक रूढ चौकटीत त्यांचे वर्तन तपासून गैरहजेरी, पळून जाणे, वर्गातील भांडणे, अभ्यास न करणे या गोष्टीत या मुलांना समजावून घेत नाहीत. या विद्यार्थ्यांना जे ज्ञान असते, त्याला शाळेत प्रतिष्ठा नसते. जंगलात फिरणाऱ्या आदिवासी मुलांना एका जागेवर वर्गात बसणे ही शिक्षा वाटते. लक्ष्मण मानेंच्या बोर्डिगमधून एक भटक्या जमातीचा मुलगा खोलीत झोपायला लावले म्हणून पळाला. उघडय़ावर पालं टाकणारा तो पोरगा रात्रभर छत अंगावर पडेल म्हणून जागा राहिला व पहाटे पळाला. या मुलांना समजूून घ्यायला एक संवेदनशील मन व त्या मुलांविषयी प्रेम गरजेचे आहे. त्या मुलांना पारंपरिक शिस्तीच्या चौकटीत बसवले की ते पळूनच जातात. शिक्षणातील गळतीचे सर्वात मोठे हे कारण आहे. गळतीसाठी गरिबी, मजुरी ही कारणे दुय्यम आहेत. युनेस्कोने भारतात इयत्ता पहिलीच्या गळतीचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. आदिवासी, दलित, गरीब वस्तीतील मुले पहिलीत शाळेत येतात आणि तिथे त्यांना शिक्षा झाली, कोणी कठोर वागले, प्रेमाने समजून घेतले नाही तर ही मुले शाळा सोडून देतात आणि आम्ही त्यांच्या गरिबीची चर्चा करीत आत्मवंचना करून घेतो. शालाबाह्य़ विद्यार्थ्यांपैकी मी १६५० विद्यार्थ्यांचा अभ्यास केला त्यात ५५ विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षकांनी मारले म्हणून शाळा सोडल्या होत्या. शिक्षेच्या प्रश्नाची ही सर्वात गंभीर बाजू आहे.
सध्या जगभर अपंगांच्या शाळांमध्ये ‘जेन्टल टीचिंग’ ही पद्धती वापरली जाते. मतिमंद, विशेष गरजांची मुले कितीही हिंसक झाली तरी आपण संयम न गमावता त्याला प्रेमाने स्पर्शच करत राहायचे; व त्याला आधार देत, सांत्वन करत, प्रेमाने त्याचा मानसिक एकटेपणा घालवायचा- अशी ही पद्धती रिमांड होमसह प्राथमिक शिक्षणातही नव्हे, सर्वच शिक्षकांना परिचित करून द्यायला हवी (इंटरनेटवर ही सर्व पद्धती आहे). त्याचबरोबर ‘पॉझिटिव्ह डिसिप्लिन’ची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. शिक्षेला पर्याय म्हणून मुलांशी सातत्याने संवाद करणे, संयम न गमावता चर्चेतून त्याला पटवून देणे- यावर भर आहे. २००५ साली नेपाळमध्ये या विषयावर जागतिक परिषद झाली. महाराष्ट्रातून ‘मीडिया मॅटर्स’ संस्थेच्या अंजू उप्पल व भाऊ गावंडे सहभागी झाले होते. त्या परिषदेत विविध परिस्थितीत शिक्षेला पर्याय कसे शोधता येईल, यावर चर्चा व सादरीकरण झाले. शिक्षेला पर्याय संवाद आहे, हेच अधोरेखित झाले.
अखेरचा मुद्दा शिक्षकांना बदलण्याचा आहे. विलक्षण संयमाने विद्यार्थ्यांतील विवेक जागा करणे, चुकांबाबत क्षमाशील होणे आणि प्रेममय होऊन जिव्हाळा व विश्वास देत राहणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. शिक्षकाला स्वत:चेच भावनिक समायोजन शिकवावे लागेल. त्याचा EQ उंचवावा लागेल. शिक्षक-प्रशिक्षणात हा घटक समाविष्ट करावा लागेल.
पालक व्हायला काहीच पात्रता आपण समाज म्हणून मागत नाही. पालकांचे अनौपचारिक प्रबोधनासाठी, भावनांक व शिक्षणविषयक जाणिवा उंचावण्यासाठी नवे माध्यम निर्माण करावे लागेल.
जॉन होल्ट यांना एक न्यूनगंड निर्माण झालेला विद्यार्थी म्हणाला होता- ‘मी कोण? मी असलोच तर अगदी कुणीच नाही.’ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची इतकी हानी शिक्षेने होऊ शकते-
If a child lives with criticism
he learns to condemn
If he lives with friendliness
he learns that the
world is a good place to live...

शारीरिक शिक्षा या शिक्षणात पूरक नसून रोधक आहेत, हेच मेंदूविषयीचे नवे संशोधन सांगते. शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी याबाबत सविस्तर विवेचन केले आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांत असणारा हेप्टॅटिपन ब्रेन हा माणसात आहे. तो केवळ शारीरिक गरजा, भूक, प्रतिकार, बचाव करण्याची प्रेरणा जागी ठेवतो. ‘मॅमेनियन ब्रेन’ हा भावनिकतेशी निगडित आहे. तिसरा विकसित झालेला ‘निओकॉर्टेक्स ब्रेन’ हा शिक्षणासाठीच आहे. याच मेंदूत निर्मितीक्षमता, स्मृती जतन करणे, विचार करणे, भाषाशिक्षण, जाणिवेच्या पातळीवरील विविध केंद्रे आहेत. विद्यार्थी शिकताना रक्तप्रवाह हा निओकॉर्टेक्सकडे वाढतो, पण ज्याक्षणी शिक्षक विद्यार्थ्यांला अपमानास्पद बोलतील तेव्हा रक्तप्रवाह मॅमेलिस (भावनिक) ब्रेनकडे वाहील व जेव्हा शारीरिक शिक्षा होईल, तेव्हा मुलाचे मन भीतीने भरून जाईल. स्वत:ची बचाव करणारी प्राणिप्रेरणा जागृत होऊन रक्तप्रवाह रॅप्टेलीयन ब्रेनकडे वाहू लागेल. निओकॉर्टेक्सचे कार्य होणार नाही. तेव्हा शिक्षा न करता शालेय वातावरण निकोप ठेवणे, ही शिक्षणाची पूर्वअट आहे हे लक्षात घ्यावे.

जगात शारीरिक शिक्षेवर पोलंडने १७८३ सालीच बंदी घातली. १९७९ साली स्वीडनने व नंतर नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा, न्यूझीलंड, जपान या देशांनी शारीरिक शिक्षांवर शाळांमध्ये कायद्याने बंदी घातली. भारतात आंध्र प्रदेश, गोवा, तामिळनाडू या राज्यांत शारीरिक शिक्षांवर बंदी घालणारे कायदे आहेत.
हेरंब कुलकर्णी
herambrk@rediffmail.com

शिक्षा न केल्याचे सकारात्मक परिणाम..

‘‘आम्ही रेडलाईट एरियात काम करतो. त्या भागातील लहान मुले व्यसनी असतात. वाईट सवयी लागतात. पण त्यांना आम्ही मारत नाही. मारले की ते वसतिगृहातून पळून जातात व अधिक वाईट होतात. आम्ही त्यांच्याशी फक्त प्रेमाने वागत राहतो. त्यांच्या व्यसन, सवयींची चर्चाच करत नाही. ते बदलतात, पण संयमानं २-३ वर्षे वाट बघावी लागते. आम्ही त्यांच्यावर इतके प्रेम करतो की प्रेम गमावण्याच्या भीतीने ते वाईट वागतच नाहीत. काहीजण पळून जातात व पुन्हा येतात पण आम्ही त्यांना त्याबद्दल कधीच विचारत नाही. एकदा पाहुण्यांचे पैसे चोरीला गेले. झडती घेणे शक्य होते पण आमचा शिक्षक स्वत:ला शिक्षा म्हणून जेवला नाही. काही वेळात पैसे टेबलावर आले.. प्रेम हेच माध्यम आहे..’’
- डॉ. गिरीश कुलकर्णी, स्नेहालय, अहमदनगर

रिमांड होममधील कर्मचाऱ्यांना मी शिक्षा करण्यापेक्षा मुलांना समजावून सांगण्याचा आग्रह धरला. त्यातून विनाकारण मारहाण कमी झाली. मुले हिंसात्मक व अश्लीलतेचे चित्रपट बघायला जात. तेव्हा चित्रपटावरून आल्यावर मी टीका करण्यापेक्षा त्या चित्रपटांवरच चर्चा करत असे. त्यांचे जगणे व चित्रपट किती वेगळे आहेत, यावर खूप बोलल्यावर असे चित्रपट बघणे थांबले. एका अल्पवयीन अनाथ मुलीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवल्यावर ती ढसढसा रडली. इतक्या प्रेमाने कुणीच स्पर्श केला नव्हता, असं म्हणाली.
- रेणू गावस्कर, सामाजिक कार्यकर्त्यां

‘सर, अगदी मनापासून सांगते, माझे विद्यार्थी माझे मित्र आहेत. मी जेव्हा सकाळी जाते तेव्हा त्यांचं वेड लावणारं स्वागत असतं आणि जेव्हा मी तिथून निघते तेव्हा ओढ लावणारा निरोप असतो.. सर, हे लिहिताना त्या लेकरांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर येताहेत..’
- सविता गायंगी, नांदेडच्या जि.प. शाळेतील शिक्षिकेचे पत्र

राजस्थानात सरदारशहर येथील व्रात्य व व्यसनी मुलांसाठी तेथील संस्थेने पाच दिवसांचा वर्ग ठेवला. सुरुवातीला मुलांनी आम्हाला कोंडून ठेवणे, आंघोळीचे कपडे पळवणे, चेष्टा करणे हे प्रकार केले. आम्ही संयम न सोडता प्रेमाने वागत राहिलो. शेवटच्या दिवशी ती मुले रडली. रेल्वे स्टेशन पाच कि.मी. अंतरावर होते. तिथपर्यंत ती पळत निरोप द्यायला आली. त्यातील एक विद्यार्थी आमच्यासोबत महाराष्ट्रात शिक्षणासाठी आला. शाळेतील मारहाणीचा त्यांना इतका तिरस्कार वाटत होता की होळीला शाळेचा गणवेश जाळण्याचा त्यांचा निर्धार होता, पण प्रेम दिल्याने ती मुले बदलली..
- डॉ. संजय मालपाणी, गीता परिवार, संगमनेर