Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणूक संपताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू!
अनेक मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने विरोधात काम केल्याचा आरोप
संतोष प्रधान, मुंबई, १ मे

राज्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडताच सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत धुसफुसीस प्रारंभ झाला आहे. काँग्रेसच्या आठ ते नऊ उमेदवारांना राष्ट्रवादीच्या स्थानिक

 

पातळीवरील नेतेमंडळींकडून अपशकून करण्याचा प्रयत्न झाल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसने मदत केली, पण तशी मदत राष्ट्रवादीकडून झाली नाही, असाच काँग्रेसचा सूर आहे.
निवडणुकीनंतर राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांची आज बैठक झाली. त्यात जिल्हा पातळीवरून आलेल्या अहवालांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी उघडपणे काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात काम केले वा ताकद दिली. याबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे लक्ष वेधूनही काही उपयोग झाला नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. उत्तर-मध्य मुंबईत बसपाच्या वतीने राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाईजान यांनी निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी बसपाच्या उमेदवाराला मदत केली. राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याचे पाठिराखे बसपाच्या उमेदवाराचे समर्थन करीत होते. पुण्यात शरद पवारांनी आदेश देऊनही राष्ट्रवादीचे नगरसेवक शेवटपर्यंत काँग्रेसच्या प्रचारात सहभागी झाले नाहीत. अजित पवारांना मानणाऱ्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या विरोधात काम केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. सांगलीत अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीच्या एका बडय़ा मंत्र्याने रसद पुरविल्याचे बोलले जात आहे. नंदूरबारमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांचे बंधू समाजवादी पक्षाच्या वतीने रिंगणात होते. तेथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सपाचे काम केले. भिवंडीत आर. आर.(रघुनाथ) पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी म्हणून राष्ट्रवादीच्या एका नेत्याने बरेच प्रयत्न केले. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर या आर. आर. पाटील यांनी समाजवादी पक्षाच्या वतीने निवडणूक लढविली. गडचिरोली, धुळ्यात राष्ट्रवादीच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद होती, असेही सांगण्यात आले.
जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांचे कोल्हापूर मतदारसंघात वर्चस्व आहे. या जिल्ह्य़ात त्यांचे तीन आमदार आहेत. मात्र जनसुराज्यने या जिल्ह्य़ातील दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले नाहीत. याउलट या पक्षाने लातूर व नांदेड या आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. यावरून कोरे यांना बोलवता धनी कोण हे स्पष्ट होते, असे काँग्रेसमध्ये बोलले जात आहे. राज्यात समाजवादी पार्टीने फक्त काँग्रेस उमेदवारांच्या विरोधातच कसे उमेदवार उभे केले, असा सवालही काँग्रेसच्या वर्तुळात केला जात आहे. राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांच्या प्रचार फलकांवर मुलायमसिंग यांची छायाचित्रे होती.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबद्दल तक्रारी केल्यानंतर लगेचच प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना राष्ट्रवादीला मदत करण्याचा आदेश दिला होता व त्यानुसार काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र पद्धतशीरणे डोळेझाक केल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरच राष्ट्रवादीबरोबरील आघाडीचे भवितव्य अवलंबून असल्याचे मत काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याच्या संदर्भात नवी दिल्लीत दोन मतप्रवाह होते. नेमके त्याच वेळी बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि तामिळनाडूनमध्ये पीएमकेने काँग्रेसची साथ सोडल्याने काँग्रेसच्या नेतृत्वाने महाराष्ट्राबाबत वेगळा विचार सोडून दिल्याची माहिती पक्षाच्या एका नेत्याने दिली.