Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेसचे नुकसान अटळ, पण आघाडी कायम राहणार
सुनील चावके

पाच वर्षांपूर्वी भाजप आणि ओमप्रकाश चौटालांचे इंडियन नॅशनल लोकदल (इनॅलो) यांच्यात आलेल्या वितुष्टाचा फायदा घेत हरयाणात लोकसभेच्या १० पैकी ९

 

जागाजिंकणाऱ्या काँग्रेसची यंदा खरी कसोटी लागणार आहे. पुन्हा एकत्र आलेले भाजप-इनॅलो तसेच हरयाणा जनहित काँग्रेस आणि बसप यांच्यामुळे ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या सर्व दहाही जागांसाठीच्या मतदानात काँग्रेसला किमान तीन ते चार जागा गमवाव्या लागतील, असा रागरंग आहे. राज्यातील जाट आणि गैरजाट अशा सुप्त संघर्षांत काँग्रेसला मुसंडी मारण्याची कितपत संधी मिळते हाच खरा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
आर्थिकदृष्टय़ा संपन्न हरयाणात प्रचाराचे मुद्दे प्रामुख्याने वीज, रस्ते, पाणी आणि अन्य नागरी समस्या हेच आहेत. पण लोकसभेची ही निवडणूक मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांच्यासाठी रंगीत तालीम ठरणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा कितपत निभाव लागणार हे या निवडणुकीत दिसून येणार आहे. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने ४२.१३ टक्के मते संपादन केली होती, तर इनॅलोला २२.४३ आणि भाजपला १७.२१ टक्के मते मिळाली होती. गेल्या चार वर्षांंतील विकास कामाच्या जोरावर यंदाही काँग्रेसची कामगिरी सरस ठरेल, असे मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांना वाटते.
हुड्डा यांना सर्व दहाही जागाजिंकण्याचा विश्वास वाटत असला तरी यंदा केंद्रीय मंत्री कुमारी सेलजा (अंबाला, राखीव) आणि राव इंद्रजीत सिंह (गुरगाव) यांच्या विकेटस् पडण्याची दाट शक्यता असून फरीदाबादमध्ये अवतारसिंह भडाना यांचेही देऊळ पाण्यात आहे. अंबालामध्ये भाजपचे रतनलाल कटारिया सेलजा यांना जोरदार टक्कर देत आहेत, तर गुरगावमध्ये इंद्रजीत सिंह भाजपच्या डॉ. सुधा यादव आणि बसपचे चौधरी झाकिर हुसैन अशा तिरंगी लढतीत अडकले आहेत. फरीदाबादमध्ये भाजपच्या रामचंद्र बैंदा यांना काँग्रेसचे अवतारसिंह भडाना यांना पराभूत करण्याची नामी संधी आहे.
काँग्रेसच्या दृष्टीने आजच्या घडीला रोहटक, कुरुक्षेत्र आणि सोनीपत या मतदारसंघातील विजय निश्चित वाटतात. हुड्डा यांचे पुत्र दीपेंद्रसिंह हुड्डा यांना रोहटक मतदारसंघातून पुन्हा निवडून येणे फारसे जड जाणार नाही. हा मतदारसंघ हुड्डा यांचा गड मानला जातो. कुरुक्षेत्रचे काँग्रेसचे विद्यमान खासदार व अब्जाधीश उद्योगपती नवीनजिंदल यांच्यावर एका इसमाने सभेत भिरकविलेल्या पादत्राणाचा मतदारांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही.जिंदल यांनी गेल्यावेळी चौटालापुत्र अभयसिंह चौटालांचा पराभव केला होता. यंदा इनॅलोने त्यांच्याविरुद्ध अशोककुमार अरोरा यांना उमेदवारी दिली आहे. अरोरा यांची उमेदवारी कमकुवत मानली जात आहे.
सोनीपतमध्ये भाजपचे विद्यमान खासदार किशनसिंह संगवान यांचा काँग्रेसचे जितेंद्र मलिक यांच्यापुढे निभाव लागण्याची शक्यता नाही. गेल्यावेळी संगवान येथून निसटत्या फरकानेजिंकले होते. हिसारमध्ये हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ७८ वर्षीय भजनलाल काँग्रेसचे विद्यमान खासदार जयप्रकाश यांच्याविरुद्ध उतरले आहेत. इनॅलोने येथे माजी अर्थमंत्री संपत सिंह यांना उतरविले असले तरी या मतदारसंघात गैरजाट मतदारांचे वर्चस्व असल्यामुळे भजनलाल यांचा विजय निश्चित मानला जात आहे. गेल्यावेळी भिवानी मतदारसंघातूनजिंकलेले त्यांचे पुत्र कुलदीप बिष्णोई यांनी मात्र यंदा पराभूत होण्याच्या शक्यतेमुळे माघार घेतली. नव्याने पुनर्रचना झालेल्या भिवानी-महेंद्रगढ मतदारसंघात ओमप्रकाश चौटाला यांचे चिरंजीव अजय चौटाला यांचा सामना बन्सीलाल यांची नात आणि राज्याच्या पर्यटन मंत्री किरण चौधरी यांची कन्या श्रुती चौधरी यांच्याशी होत आहे. या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत कुलदीप बिष्णोई विजयी होत असताना अजय चौटाला तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते, तर श्रुती चौधरी यांचे पिता सुरेंद्र सिंह दुसऱ्या क्रमांकावर आले होते. यंदाही अजय चौटाला यांच्यावर नवख्या श्रुती चौधरींकडून पराभवाचा जबर धक्का सहन करण्याची सहन करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.
सिरसा राखीव मतदारसंघात विद्यमान खासदार आत्मासिंह गिल यांची उमेदवारी कापून राहुल गांधी यांच्या आग्रहावरून काँग्रेसने अ. भा. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक तंवर यांना उतरविले आहे. पण सिरसा हा चौटालांचे वर्चस्व असलेला मतदारसंघ असून तिथे इनॅलोने डॉ. सीता राम यांना उमेदवारी दिली आहे. ही इनॅलोला ही एकमेव जागाजिंकण्याची संधी असेल. चौधरी देवीलाल यांचा वारसा चालविणाऱ्या चौटाला कुटुंबियांच्या उद्दामपणाला हरयाणातील जनता किती कंटाळली आहे, याची यंदाच्या निवडणुकीत नव्याने प्रचिती येऊ शकते. त्यामुळेच काँग्रेस सरकारविरुद्ध राज्यात फारशी अँटी इन्कम्बन्सी दिसत नाही. ही एवढीच गोष्ट काँग्रेसच्या दृष्टीने जमेची ठरणार आहे.
एकूण काय? पाच वर्षांंपूर्वी मिळविलेल्या यशाची पुनरावृत्ती करणे काँग्रेससाठी अवघड. अस्सल जाट म्हणून राज्यात वर्चस्व राखण्यासाठी चौटाला कुटुंबियांची धडपड.