Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

वरूण गांधी १४ मेपर्यंत पॅरोलवर
नवी दिल्ली, १ मे/खास प्रतिनिधी

प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आलेले

 

भाजपचे युवा नेते वरुण गांधी यांचा पॅरोल आज सर्वोच्च न्यायालयाने १४ मेपर्यंत आणखी दोन आठवडय़ांसाठी वाढविला.
शेवटच्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होत असलेल्या पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असलेले वरुण गांधी यांना निवडणूक संपेपर्यंत प्रचाराची तसेच मतदान करण्याची संधी मिळाली आहे.
आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील न्या. पी. सदाशिवन आणि न्या. जे. एम. पांचाल यांच्या पीठाने उत्तर प्रदेश सरकारने नोंदविलेला आक्षेप खारीज करून वरुण गांधी यांचा जामीन वाढविला. २८ मार्च रोजी पिलीभीत येथील न्यायालयापुढे आत्मसमर्पण केल्यानंतर वरुण गांधी यांना १६ एप्रिलपर्यंत एटा तुरुंगात रासुकाखाली डांबून ठेवण्यात आले होते.
आज वरुण गांधी यांच्या जामीनात वाढ करण्याच्या प्रस्तावाचा उत्तर प्रदेश सरकारकडून अ‍ॅड्. हरीश साळवे यांनी जोरदार विरोध केला. पिलीभीतमध्ये दाखल झाल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांपुढे हजेरी लावण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही वरुण गांधी यांनी पालन केले नसल्याचा आरोप उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने लावण्यात आला. मात्र, वरुण गांधी पिलीभीतमध्ये गेलेच नाही, असा युक्तिवाद त्यांचे वकील मुकूल रोहतगी यांनी केला. केंद्र सरकारनेही वरुण गांधींवर लावलेला रासुका रद्द करण्यास नकार दिल्यामुळे त्यांचा पॅरोल रद्द करण्यात यावा, अशी मागणी साळवे यांनी केली. पण न्यायालयाने गांधींच्या पॅरोलमध्ये वाढ करताना उत्तर प्रदेश सरकारने त्यावर असलेले आक्षेप एका प्रतिज्ञापत्राद्वारे विस्तृतपणे दाखल करावे, असे निर्देश दिले.