Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

राज्यात एकूण मतदान ५०.७६%
मुंबईत मात्र अवघे ४१ टक्केच मतदान
मुंबई, १ मे / खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जीवाची बाजी लावून प्रचार करूनही

 

मतदारांमध्ये मात्र निरुत्साहच आढळून आला. विशेषत: मुंबईत तर मतदारांनी मतदानाकडे जवळपास पाठच फिरवली आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघांमध्ये सरासरी ४१.४१ एवढेच कमी मतदान झाले आहे. राज्यात एकूण ५०.७६ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील शहरी भागातील मतदारांमध्ये मतदान कमी झाले आहे. मुंबईतील मतदानाची आकडेवारी थक्क करणारी आहे. उत्तर मुंबई (४२.६३ टक्के), वायव्य मुंबई (४३.९३ टक्के), ईशान्य मुंबई (४२.३८ टक्के), उत्तर-मध्य मुंबई (३९.६३ टक्के), दक्षिण-मध्य मुंबई (३९.५६ टक्के) तर दक्षिण मुंबईत ४०.३३ टक्के मतदान झाले आहे. ठाणे मतदारसंघात ४१.४६ टक्के मतदान झाले. राज्यात सर्वाधिक ७१.०९ टक्के मतदान भंडारा-गोंदिया मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान ३४.३२ टक्के मतदान कल्याण मतदारसंघात झाले आहे. पालघरमध्ये (४८.७९ टक्के) तर भिवंडीत (३९.३८ टक्के) मतदान झाले.
राज्यातील सर्व शहरी मतदारसंघांचा वेध घेतला असता सर्वत्र मतदारांमध्ये निरुत्साह आढळून आला. मुंबई (४१.४१ टक्के), पुणे (४०.६७ टक्के), नागपूर (४३.६० टक्के), ठाणे (४१.४६ टक्के), नाशिक (४५.६३ टक्के), सोलापूरमध्ये ४६ टक्के मतदान झाले आहे. यावरून शहरी भागातील मतदारांमध्ये मतदानाबद्दल फारसा उत्साह नसल्याचे स्पष्ट होते. सलग चार दिवस सुट्टी आल्याने मुंबईकरांनी बाहेरगावी जाणेच पसंत केले. महाबळेश्वर, लोणावणा-खंडाळा, अलिबाग अथवा डहाणू-बोर्डी येथील बहुतेक हॉटेल्स हाऊसफूल आहेत. याउलट ग्रामीण भागात मतदानाचे प्रमाण चांगले आहे.
राज्यात यंदा ५० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले असले तरी गेल्या चार ते पाच निवडणुकांची तुलना करता मतदानाचे प्रमाण कमी असल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वेळी सरासरी ५३ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते.