Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

डिजीटल प्रचार कितपत प्रभावी
नवी दिल्ली १ मे/पीटीआय

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यांकडे झुकत असताना राजकीय

 

पक्षांनी एसएमएस, इंटरनेट यासारख्या माध्यमातून डिजीटल प्रचार करण्यावर जास्त भर दिला आहे. या प्रकारचा प्रचार इतक्या मोठय़ा प्रमाणावर होणारी ही पहिलीच निवडणूक असून या डिजिटल प्रचाराचा प्रभाव मतदारांवर कितपत पडला आहे हे समजायला काही कालावधी जावा लागेल असे तज्ज्ञांचे मत आहे.
निवडणूक तज्ज्ञ असलेले राजीव करंदीकर यांनी सांगितले की, या माध्यमातून केलेला प्रचार कितपत प्रभावी आहे हे अजून तरी समजलेले नाही कारण राजकीय पक्ष केवळ डिजिटल माध्यमातूनच प्रचार करीत आहेत अशातला भाग नाही तर प्रचार सभा घरोघरी भेटीगाठी हे पारंपरिक प्रकारही वापरले जात आहेत.
मॅक्स हेल्थ केअरचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अजय पाल सिंग यांनी सांगितले की, कुठल्याही मानवी प्रक्रियेत देहबोली, डोळ्यांच्या हालचाली यासारखे अनेक घटक हे ऐकणाऱ्याच्या मनावर परिणाम करीत असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष भेटीगाठी घेता तेव्हा त्याचा परिणाम जास्त होतो. डिजिटल माध्यमात प्रत्यक्ष ती व्यक्ती तुमच्या समोर नसते, त्यामुळे केवळ एसएमएस पाठवून मतदारांवर प्रभाव पडत असेल असे वाटत नाही. मोबाईल फोनवरच्या इनबॉक्समध्ये अनेक राजकीय पक्षांचे संदेश येत असले तरी त्यातून मतदार कितपत प्रेरित होणार याला मर्यादा आहेत. टीव्हीवरच्या जाहिरातींना पर्याय नसतो त्यामुळे त्या पाहिल्या जातातच पण एसएमएस आपण नाही बघितले तरी चालतात त्यामुळे मतदार ते बघत असतीलच अशातला भाग नाही. हे एसएमएस सतत येत राहिले तर मतदार राजा रागावूही शकतो व त्याची संबंधित पक्षावर किंवा उमेदवारावर खप्पामर्जी होण्याचा धोकाही नाकारता येत नाही.
विमहन्सचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ.रोहित जुनेजा यांच्या मते एसएमएसवर भर देऊन राजकीय प्रक्रियेत संबंधित उमेदवाराला त्याच्या समर्थकांशी संपर्क चांगल्या प्रकारे प्रस्थापित करता येतो. शहरी भागातील लोक एसएमएस उघडून पाहण्याची तसदी घेतीलच असे नाही पण ग्रामीण भागात प्रसारमाध्यमे कमी असल्याने तेथील लोक मात्र असे एसएमएस उघडून पाहण्याची शक्यता तुलनेने अधिक आहे.
करंदीकर यांच्या मते आपल्या देशात अजूनही जास्त लोक खेडय़ात वास्तव्य करतात, तेथे अजून मोबाईल हवा तेवढा पोहोचला असेल असे नाही, संगणकाच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे डिजिटल प्रचाराला मर्यादा आहेत. पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत एसएमएस व इंटरनेट यांचा प्रसार वाढला आहे पण तरीही घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा प्रभाव त्यापेक्षा निश्चितच जास्त असणार हे उघड आहे कारण तेथे थेट संपर्क असतो.