Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९

निवडणूक संपताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू!
अनेक मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने विरोधात काम केल्याचा आरोप
संतोष प्रधान, मुंबई, १ मे
राज्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडताच सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत धुसफुसीस प्रारंभ झाला आहे. काँग्रेसच्या आठ ते नऊ उमेदवारांना राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील नेतेमंडळींकडून अपशकून करण्याचा प्रयत्न झाल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसने मदत केली, पण तशी मदत राष्ट्रवादीकडून झाली नाही, असाच काँग्रेसचा सूर आहे. निवडणुकीनंतर राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांची आज बैठक झाली.

काँग्रेसचे नुकसान अटळ, पण आघाडी कायम राहणार
सुनील चावके
पाच वर्षांपूर्वी भाजप आणि ओमप्रकाश चौटालांचे इंडियन नॅशनल लोकदल (इनॅलो) यांच्यात आलेल्या वितुष्टाचा फायदा घेत हरयाणात लोकसभेच्या १० पैकी ९ जागाजिंकणाऱ्या काँग्रेसची यंदा खरी कसोटी लागणार आहे. पुन्हा एकत्र आलेले भाजप-इनॅलो तसेच हरयाणा जनहित काँग्रेस आणि बसप यांच्यामुळे ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या सर्व दहाही जागांसाठीच्या मतदानात काँग्रेसला किमान तीन ते चार जागा गमवाव्या लागतील, असा रागरंग आहे. राज्यातील जाट आणि गैरजाट अशा सुप्त संघर्षांत काँग्रेसला मुसंडी मारण्याची कितपत संधी मिळते हाच खरा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

वरूण गांधी १४ मेपर्यंत पॅरोलवर
नवी दिल्ली, १ मे/खास प्रतिनिधी

प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आलेले भाजपचे युवा नेते वरुण गांधी यांचा पॅरोल आज सर्वोच्च न्यायालयाने १४ मेपर्यंत आणखी दोन आठवडय़ांसाठी वाढविला. शेवटच्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होत असलेल्या पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असलेले वरुण गांधी यांना निवडणूक संपेपर्यंत प्रचाराची तसेच मतदान करण्याची संधी मिळाली आहे.

राज्यात एकूण मतदान ५०.७६%
मुंबईत मात्र अवघे ४१ टक्केच मतदान

मुंबई, १ मे / खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जीवाची बाजी लावून प्रचार करूनही मतदारांमध्ये मात्र निरुत्साहच आढळून आला. विशेषत: मुंबईत तर मतदारांनी मतदानाकडे जवळपास पाठच फिरवली आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघांमध्ये सरासरी ४१.४१ एवढेच कमी मतदान झाले आहे. राज्यात एकूण ५०.७६ टक्के मतदान झाले आहे.

डिजीटल प्रचार कितपत प्रभावी
नवी दिल्ली १ मे/पीटीआय
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यांकडे झुकत असताना राजकीय पक्षांनी एसएमएस, इंटरनेट यासारख्या माध्यमातून डिजीटल प्रचार करण्यावर जास्त भर दिला आहे. या प्रकारचा प्रचार इतक्या मोठय़ा प्रमाणावर होणारी ही पहिलीच निवडणूक असून या डिजिटल प्रचाराचा प्रभाव मतदारांवर कितपत पडला आहे हे समजायला काही कालावधी जावा लागेल असे तज्ज्ञांचे मत आहे.

लालूंचा मोदींवर हल्ला
पाटणा, १ मे / पी.टी.आय.
मतदानाचा तिसऱ्या टप्पा पार पडल्यानंतरही लालूंनी सध्या मोदींवर थेट हल्ला चढविला आहे. त्याला कारणही तसेच आहे वषोनुवर्षे भरभरुन मते देणाऱ्या मुस्लिम समाजाने यावेळी पाठ फिरविल्याने सध्या लालू प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. मुस्लिम मते फोडण्याचे उद्योग मोदींनी केल्याचा जावयीशोध लावत लालूंनी आपला राग व्यक्त केला. गुजरात दंगलीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोदींच्या भूमिकेबाबत तीन महिन्यात अहवाल देण्याचे आदेश जारी केले असूनही येथे मुस्लिम मते फोडण्याचे उद्योग त्यांनी केल्याचा आरोप लालूंनी केला आहे.

सलमानची प्रचारात आघाडी पण मतदानासाठी दडी
मुंबई, १ मे / प्रतिनिधी

पैसे मिळाले की तो विवाह समारंभ अथवा मोठय़ा पाटर्य़ामध्ये हजेरी लावतो. आता तर त्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली होती. त्याचे वलय आणि व्यक्तिमत्वही तेवढेच प्रभावी. निवडणुकीच्या प्रचारात सध्या ज्याने आघाडी घेतली होती त्या सलमान खान याने मतदानाकडे मात्र चक्क पाठ फिरविली. प्रचाराच्या रणधुमाळीत सलमानने मुंबईमध्ये कॉँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा, कल्याणमधील राष्ट्रवादीचे वसंत डावखरे, भंडाऱ्यात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तसेच पंजाबमधील गुरूदासपूर मतदारसंघातून भाजपतर्फे रिंगणात असलेले विनोद खन्ना आणि उत्तर प्रदेशातील कॉँग्रेसचे अन्नू टंडन यांच्यासाठी ‘रोड शो’ केले. सलमान हा कोणत्याही पक्षाशी बांधील नसल्याने पैसे देणाऱ्या उमेदवारांसाठी त्याने प्रचार केला. पण ऐन मतदानादिवशी मात्र त्याने लंडनला जाणे पसंत केले. एकिकडे मतदान करा हा घोषा लावत अनेक सेलिब्रेटिजनी यावेळी मोहीम उघडली असताना सलमानने त्याकडे पाठ फिरविली. बहुधा मतदान करण्यासाठीही त्याला कोणी पैसे दिले नसतील अशी चर्चा यानिमित्ताने होत आहे.

शिल्पाला महत्व ‘आयपीएल’ चे
मुंबई, १ मे / प्रतिनिधी

इंडियन प्रिमिअम लिगचे सामने दक्षिण अफ्रिकेत रंगात येत असतानाही मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी शाहरुख खान याने गुरूवारी मुंबई गाठून मतदान केले असले तरी त्याला शिल्पा शेट्टी अपवाद आहे. सध्या संघाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असल्याने मला अफ्रिका सोडता आली नाही असे या बयेने सांगून देशापेक्षा क्रिकेट किती महत्वाचे आहे असे अप्रत्यक्षरीत्या सुचविले. कोणत्याही जबाबदार नागरिकाने निवडणूका गांभीर्याने घतल्या पाहिजेत असे सांगून शिल्पा म्हणते की, ‘आयपीएल’ चे सामने दक्षिण अफ्रिकेत ठेवल्याने मला मतदानासाठी मुंबईला जाता आले नाही. संघासोबत राहणे सध्या गरजेचे असल्याने हा निर्णय घेतल्याचे ती म्हणाली. प्रत्येक भारतीय नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. लोकशाहीने दिलेला हा सर्वात मोठा हक्क कोणीही वाया घालवू नये, असा फुकटचा सल्ला देण्यासही शिल्पा विसरत नाही.

तिसरी आणि चौथी आघाडी सत्तेचे भुकेलेले-सोनिया
श्रीगंगानगर, १ मे / पी.टी.आय.

निवडणुका आल्या की अस्तित्वात येणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या अशा तत्सम आघाडय़ा या केवळ सत्ताप्राप्तिसाठी स्थापन झालेल्या असतात आणि त्यामधील नेते हे सत्तेचे प्रचंड भुकेलेले असतात, अशा तिखट शब्दात कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी टीकास्त्र सोडले. येथील कॉँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना सोनिया गांधी यांनी निवडणुकांमध्ये अस्तित्वात येणाऱ्या विविध आघाडय़ांबाबत मतप्रदर्शन केले. या आघाडीला कोणतेही ध्येयधोरण नसते केवळ सत्ता मिळविणे हाच त्यांचा उद्देश असतो आणि त्यासाठी एकत्र आलेले नेते हे सत्तेचे प्रचंड भुकेलेले असतात त्यापुढे देशातील गरीब भुकलेल्या जनतेचे त्यांना काहीही देणेघेणे नसते, अशी टीकाही सोनियांनी केली. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भवितव्य अंधकारमय असल्याचे मत व्यक्त करुन त्या पुढे म्हणाल्या की, जात आणि धर्माच्या नावाखाली समाजात विषवल्ली पसरविण्याचे काम त्यांनी केले आहे. एकात्मतेला तडे देण्याचा त्यांचा हा प्रयत्न जनता निश्चितपणे हाणून पाडेल, असा विश्वासही सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.