Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९

युवराजची हॅट्ट्रिक; तरीही पंजाबने हात टेकले
बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा विजय

दरबान, १ मे / वृत्तसंस्था
युवराजसिंगने घेतलेली हॅट्ट्रिक आणि त्यानंतर चार षटकार व तीन चौकारांसह केलेल्या ३४ चेंडूतील ५० धावा यानंतरही पंजाब किंग्ज इलेव्हनच्या नशिबी आज विजय नव्हता. बंगलोर रॉयल चॅलेंजर्सला १४५ धावांवर रोखल्यानंतर युवराज व करण गोयल यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या ७० धावांमुळे पंजाब संघ विजयाची स्वप्ने पाहू लागला होता. पण प्रवीण कुमारच्या अखेरच्या षटकात १३ धावा हव्या असताना पंजाबचा संघ केवळ चार धावा करू शकला आणि त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले.

गोध्रा दंगलीची सुनावणी गुजरातमध्येच
जलद निकालासाठी सहा ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालये स्थापण्याचा आदेश

नवी दिल्ली, १ मे/पीटीआय

गुजरातमध्ये गोध्रा जळित प्रकरणानंतर घडलेल्या भीषण जातीय दंगलीसंदर्भातील १० प्रकरणांच्या सुनावणीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने आज उठविली. गुजरात दंगल प्रकरणांची सुनावणी बाहेरच्या राज्यात होणार नाही. गुजरातमध्ये सहा फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून तिथे हे खटले दैनंदिन तत्वावर चालवावेत व लवकर निकाल देण्यात यावा असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला. गुजरातमधील अहमदाबाद, आणंद, साबरकांठा, मेहसाणा, गुलबर्गा या ठिकाणी जातीय दंगलीदरम्यान घडलेल्या हिंसाचाराचे खटले चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

शिवसेनाप्रमुखांच्या अष्टप्रधानांपैकी दोघांवर
कारवाईचे उद्धव यांच्यापुढे आव्हान!

मुंबई, १ मे/प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अष्टप्रधान मंडळातील दोन सदस्य मधुकर सरपोतदार व मनोहर जोशी यांनी अनुक्रमे उत्तर-मध्य व दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांचा प्रचार केला नाही, अशी तक्रार स्थानिक शिवसैनिकांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे समजते. अष्टप्रधान मंडळातील या सदस्यांवर कारवाई करण्याचे धारिष्टय़ उद्धव ठाकरे दाखविणार का, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये खडे टाकणारा कर्मचारी ‘एअर वर्क्‍स’चाच!
मुंबई, १ मे / प्रतिनिधी

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीमध्ये चिखल व खडे टाकणाऱ्या ‘एअर वर्क्‍स इंडिया इंजिनिअरींग प्रा. लि.’ मधील एका कर्मचाऱ्याचे नाव गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात उघड झाले असून या कर्मचाऱ्याच्या अटकेनंतरच या घातपातामागील हेतू स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कर्मचाऱ्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र त्याची चौकशी करण्यात आली आहे.
हा प्रकार उघडकीस आणणारे ‘एअर वर्क्‍स’ कंपनीचे तंत्रज्ञ भरत बोरगे यांनी आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. वास्तविक आत्महत्येच्या आदल्या दिवशीच बोरगे यांनी तपासात चांगलेच सहकार्य केले होते. अगदी तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही त्याने नीट माहिती दिली होती. त्याच दिवशी अनिल धीरूभाई अंबानी समुहाचे (एडीएजी) तीन अधिकारी घटनास्थळी आले होते. त्यांनीही बोरगे यांच्याशी चर्चा केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी या प्रकरणात प्रमुख साक्षीदार असलेल्या बोरगे यांचा मृतदेह विलेपार्ले रेल्वे रुळाजवळ आढळल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी लागणार असे दिसत होते. मात्र बोरगे यांच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या रेल्वे पोलिसांनी एडीएजीच्या तीन अधिकाऱ्यांना आज ‘क्लिनचीट’ दिली.

काँग्रेसला १२ ते १५ जागांची अपेक्षा !
मुंबई, १ मे / खास प्रतिनिधी

शरद पवार यांच्या पंतप्रधानपदासाठी राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यावर राष्ट्रवादीचा भर असला तरी राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसचे जास्त खासदार निवडून येतील, असा काँग्रेस नेत्यांना विश्वास आहे. राज्यातून १२ ते १५ जागा निवडून येण्याची काँग्रेस नेत्यांना अपेक्षा आहे. गेल्या वेळी काँग्रेसचे राज्यातून १३ खासदार निवडून आले होते. तेवढे किंवा त्यापेक्षा जास्त खासदार यंदा निवडून येतील, असा राज्यातील नेत्यांना विश्वास आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी काही पदाधिकाऱ्यांबरोबर निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राष्ट्रवादीबरोबरील आघाडीत काँग्रेसच्या वाटय़ाला २५ जागा आल्या होत्या. एक जागा पक्षाने रामदास आठवले यांच्यासाठी सोडली होती. गत वेळच्या तुलनेत काँग्रेसला यंदा चांगले यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.

गुजरातमध्ये सात शिक्षिका व दोन मुलींचा समुद्रात बुडून मृत्यू
अहमदाबाद, १ मे/पीटीआय

गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड नजिक सहलीसाठी आलेल्यांपैकी सात महिला शिक्षक व दोन मुली समुद्रात बुडाल्याची घटना आज घडली. खवळलेल्या समुद्रामध्ये हे सारे जण उतरले होते व ते समुद्रात खूप आतपर्यंत गेले होते. त्यातूनच ही दूर्दैवी घटना घडली. समुद्रात बुडून मरण पावलेल्यांचे वयोमान १८ ते २५ वर्षांदरम्यान आहे. राजकोट येथील जिनिअस इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका व त्यांच्या मुली असे सारेजण चोरवाडनजिक समुद्रकिनारी सहलीसाठी आले होते. यावेळी सात शिक्षिका व दोन मुली समुद्रामध्ये बुडून मरण पावल्या. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, समुद्रात बुडणाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार शिक्षकांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका आता टळला आहे. या घटनेतील नऊ जणांचे मृतदेह पोलिसांनी मच्छिमारांच्या मदतीने शोधून काढले. जिनिअस इंटरनॅशनल स्कूलचे विश्वस्त जितू कोठारी यांनी सांगितले की, आमच्या शाळेचे शिक्षक चोरवाड येथे सहलीसाठी गेले होते व तेथून सोमनाथ मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाणार होते.

‘ जेट ’ मध्ये कामगार कपात ११० कर्मचाऱ्यांना घरी बसविले!
मुंबई , १ मे / प्रतिनिधी
मंदी आणि वाढता खर्च याचा सामना करण्यासाठी ‘ जेट एअरवेज ’ ने उपाय योजना सुरू केली असून किमान ११० कर्मचाऱ्यांना घरी बसविण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. विशेष म्हणजे आज साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनीच कंपनीने कामगार कपातीचा निर्णय घेतला. मंदीचा फटका , वाढता खर्च यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती बिघडत असल्याचे कंपनीचे म्हणणे असून या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणजे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. आज एकूण ११० कर्मचाऱ्यांना कंपनीने नोटीस बजावली असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने जाहीर केले. ५० कर्मचाऱ्यांच्या कराराचे नुतनीकरण करण्यात आले नाही. यात मॅनेजर आणि वरिष्ठ मॅनेजर या पदावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तर ‘ प्रोबेशन ’ वरील ६० कर्मचाऱ्यांनाही नोटीस देण्यात आली आहे. हे सर्व ‘ कॅबिन क्रू ’ कर्मचारी आहेत. या वर्षी कर्मचाऱ्यांना वार्षिक पगार वाढ देण्यात येणार नाही. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याला ७५ हजार रुपये आहे त्यांच्या पगारात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे , असेही सांगण्यात आले.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
प्रत्येक शुक्रवारी