Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९

औरंगाबादेत महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा
औरंगाबाद, १ मे/खास प्रतिनिधी

महाराष्ट्रदिनानिमित्त आज सकाळी जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर हा कार्यक्रम झाला. राज्य निर्मितीसाठी आपल्या सर्वस्वाचे बलिदान दिलेल्यांना अभिवादन करून श्री. विखे यांनी महाराष्ट्रदिनाच्या औरंगाबाद जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख, किशनचंद तनवाणी व सतीश चव्हाण, महापौर विजया रहाटकर, विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, जिल्हाधिकारी संजीव जैस्वाल, पोलीस आयुक्त के. एल. बिष्णोई, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात रंजन आदी उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर श्री. विखे यांनी पोलीस दल, गृहरक्षक दल, पोलीस बॉम्बशोध व नाशक पथक, महिला गृहरक्षक दल, कारागृह विभाग, अग्निशमन दल आणि पोलीस बँड पथक यांनी दिलेली मानवंदना स्वीकारली. शहरातील विविध संस्थांमध्येही महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा झाला.

दुधाकडून पाण्याकडे!
’‘महानंद’चा बाटलीबंद पाण्याचा प्रकल्प पैठणला उभा राहणार’

दत्ता सांगळे, औरंगाबाद, १ मे

दूध संकलन आणि पुरवठा तसेच तूप, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंडांची निर्मिती करणाऱ्या औरंगाबाद जिल्हा दूध सहकारी संस्थेने (महानंद) आता बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात उतरण्याचे ठरविले आहे. शुद्ध पाणीपुरवठय़ाच्या क्षेत्रात पाऊल टाकणारी ही मराठवाडय़ातील पहिलीच सहकारी संस्था ठरणार आहे.

‘कही और मिला कर मुझसे!’
‘बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल, यमुनाकाठी ताजमहाल’ हे मराठी गीत घ्या किंवा शायर शकीलची ही नज्म्म पाहा, ‘एक शहेनशाहने बनवा के हंसी ताजमहल, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है’द्वारे ताजमहाल हे शहाजहानच्या मुमताज महलवरील निस्सीम व अजोड प्रेमाचं प्रतीक म्हणून जगभर मान्यता आहे, तिचंच हे काव्यमय वर्णन आहे. माधव आचवलांनी ‘जास्वंद’ या पुस्तकात ताजमहालच्या सौंदर्याचं जे रसिलं वर्णन केलं आहे, ते अप्रतिम आहे. ताजमहाल व आपल्या औरंगाबादचा त्याची प्रतिकृती असणारा बीबी का मकबरा प्रवाशांच्या आकर्षणाचं केंद्र आहे!

..अन्यथा कडक कारवाई!
नांदेड, १ मे/वार्ताहर

वारंवार सूचना करूनही ज्या महाविद्यालयांनी कायमस्वरूपी प्राचार्य नेमण्यास टाळाटाळ चालविली आहे, अशा महाविद्यालयातील प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया बंद करण्याची कारवाई स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने सुरू केली आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अध्र्याहून अधिक महाविद्यालयात अद्यापि कायमस्वरूपी प्राचार्य नसल्याची धक्कादायक माहिती यानिमित्ताने समोर आली आहे.

सोयाबीनचे अनुदान लाभार्थी याद्यांच्या घोळात!
हिंगोली, १ मे/वार्ताहर

सोयाबीनच्या नुकसानीची जिल्ह्य़ात पाहणी होऊन प्रशासनाने अहवाल पाठविला. त्यानुसार राज्य सरकारने भरपाईपोटी आवश्यक ६५ कोटींपैकी ४३ कोटी रुपये दिले. पण लाभार्थी याद्यांच्या घोळात नुकसानभरपाई देण्याचे काम अडकल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.

पाणी, आरोग्य व शैक्षणिक प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न - राजेश टोपे
जालना, १ मे/ वार्ताहर

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा येथील मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर पार पडला. संपर्कमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी बोलताना टोपे यांनी जालना जिल्ह्य़ातील पाणीप्रश्न, सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि शालेय विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून यासाठी सर्वाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

खून की आत्महत्या?
हिंगोली, १ मे/वार्ताहर
बसस्थानकातील उपाहारगृहातील कामगार अनिल शिंदे याचा मृतदेह पिंपरी शिवारात कोंडबा पुरी यांच्या शेतात आढळला. अनिल चार दिवसांपासून कामावर नव्हता. काल त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. हा खून की आत्महत्या यावर उलटसुलट चर्चा चालू आहे. अनिल शिंदे हा सावळी बैनाराव येथील रहिवासी होता.

अपघातात २ ठार, एक जखमी
लोहा, १ मे/वार्ताहर
रामतीर्थ-लव्हराळ रस्त्यावर आज ट्रॅक्टरची मोटर-सायकलाल धडक बसून दोन जण ठार व एक जण जखमी झाला. तिघेही मोटरसायकलवर होते. मृतां-मधील एका तरुणाचे महिन्याभरापूर्वीच लग्न झाले होते. बनवस येथे रामराव चांगोजी निटुरे यांच्या सासुरवाडीकडे मोटारसायकलवरून निघालेल्या तिघांना ट्रॅक्टरची धडक हसली. त्यातच रामराव निटुरे (वय ५५) जागीच ठार झाले. लक्ष्मण भीमराव घोडके (२१, रामतीर्थ) यास नांदेड येथे उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच त्याचे निधन झाले.अमूल सूर्यकांत लांडगे जखमी झाला आहे. आष्टूरचे सरपंच मधुकर बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक प्रल्हाद धुळगंडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

दोन खंडणीबहाद्दरांविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली, १ मे/वार्ताहर

वसमत येथील दयाराम जोशी यांच्या बसस्थानका-समोर असलेल्या हॉटेलमध्ये प्रवेश करून पाच हजार रुपयांची मागणी करणाऱ्या आरोपी रमेश कदम व अबिया या दोन खंडणीबहाद्दरांविरुद्ध वसमत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी दयाराम जोशीसह अन्य एकास मारहाण केली व हॉटेल जाळून टाक-ण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

विधी सेवा प्राधिकरणामार्फत कामगारांना तक्रार निवारणाची संधी
औरंगाबाद, १ मे/खास प्रतिनिधी
कामगारांच्या तक्रारीचे निवारण संबंधित यंत्रणेमार्फत होऊ न शकल्यास कामगारांना विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्फतही आपल्या तक्रारींचे निवारण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश शरदकुमार पाटील यांनी केले आहे. विधी सेवा प्राधिकरणामार्फत औरंगाबाद तालुक्यातील माळीवाडा येथे १ मेच्या कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार कायद्याबाबत विधी साक्षरता शिबिर व लोकन्यायालयाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन न्यायाधीश शरदकुमार पाटील यांच्या हस्ते झाले.

दोन किलो गांजा जप्त
औरंगाबाद, १ मे/प्रतिनिधी
सिटी चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुंदर भांडवले यांनी काझीवाडा भागात छापा घालून साडेचार हजार रुपये किमतीचा दोन किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला. शेख समीर उर्फ शेख सुज्जा शेख सलमी (२१) याला गांजासह अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.

वकिलाच्या घरात चोरी
औरंगाबाद, १ मे/प्रतिनिधी

गारखेडा परिसरात राहणारे वकील दिगंबर मोहनराव वायाळ यांच्या घरातून चोरटय़ांनी २२ हजार रुपयांचा ऐवज पळवूननेला. पहाटे अडीच ते पाच वाजण्यादरम्यान ही घटना घडली. वायाळ कुटुंबीयांसह झोपलेले होते. चोरटय़ाने कडी उघडून आत प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केली. वायाळ यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

विजेच्या धक्क्य़ाने शेतकऱ्याचा मृत्यू
गेवराई, १ मे/वार्ताहर

किनगाव येथील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर अंबादास चालक (२५) याचा विजेच्या धक्क्य़ाने मृत्यू झाला. विजेचा पंप दुरुस्त करीत असताना काल हा अपघात झाला. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

बाभूळगावच्या नऊ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
हिंगोली, १ मे/ वार्ताहर
वसमत तालुक्यातील बाभूळगाव येथे १६ एप्रिलला निवडणुकीवरून दोन गटांत हाणामारी झाली. मतदान केंद्रप्रमुखांसह नऊ लोकांविरु द्ध दाखल झालेल्या गुन्ह्य़ातील आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. याप्रकरणी प्रल्हाद ढोरे यांच्या तक्रारीवरून वसमत पोलिसांनी राजू नवघरेसह एकूण तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यात मतदान केंद्रप्रमुख मनीष पिंगळकर याचाही समावेश होता. चौघांना याप्रकरणी सुरुवातीला अटकही करण्यात आली. वसमत येथील अप्पर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी गजानन नवघरे, शंकर नवघरे, राजू नवघरे, पंजाब नवघरे, प्रताप नवघरे, उमाकांत नवघरे, बंडू नवघरे, बालाजी ढोरे, मनीष पिंगळकर यांनी अर्ज केला होता. अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. घोडखांदे यांनी नऊ आरोपींचा अटक पूर्व जामीन मंजूर केला.

लामजना बसस्थानक सुशोभीकरणासाठी २५ वर्षांनंतर दोन लाख रुपये मंजूर
औसा, १ मे/ वार्ताहर
तालुक्यातील लामजना येथील बसस्थानकाची डागडुजी व सुशोभीकरण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने २५ वर्षांनंतर दोन लाख रुपये मंजूर केले. आमदार दिनकर माने, माजी आमदार किसन जाधव, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शेषेराव पाटील, रमेश हेळंबे यांच्या उपस्थितीत या डागडुजीच्या कामास सुरुवात झाली. बससेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक अशी तीन राज्ये जोडणारे हे बसस्थानक आहे. सोयी नसल्याने येथे प्रवाशांची गैरसोय होत होती. बसस्थानकप्रमुख एस. के. रासुके यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा केला. जिल्हा वाहतूक अधिकारी व्ही. एन. भानप, यंत्र अभियंता आर. एन. गायकवाड, विभाग नियंत्रक आर. के. जाधव यांनी पुढाकार घेतल्यामुळे बसस्थानकाच्या दुरुस्तीच्या व सुशोभीकरणासाठी दोन लाख रुपयांची मंजुरी मिळाली.

कर्करोगाविषयी आज चर्चासत्र
लातूर, १ मे/वार्ताहर
लातूर कॅन्सर व लॅप्रॉस्कोपी सेंटर व पुनपाळे डेंटल क्लिनिकच्या उद्घाटनानिमित्त दयानंद शिक्षणसंस्थेच्या सौजन्याने उद्या (शनिवारी) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महिला कर्करोगाविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. अजय पुनपाळे यांनी दिली. या चर्चासत्रात मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजन बडवे, डॉ. राजेश मिस्त्री, डॉ. कैलास शर्मा, डॉ. अशोक कुकडे व डॉ. अजय पुनपाळे सहभागी होणार आहेत. सर्व महिलांसाठी हे चर्चासत्र खुले आहे. लातूर कॅन्सर व लॅप्रोस्कोपी सेंटर नंदी स्टॉप येथे उद्या सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत मोफत कॅन्सर व दंतरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (३ मे) सकाळी १० ते १२ या वेळेत डॉक्टरांसाठी हॉटेल विश्वमित्र औसा रोड येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यात डॉ. राजन बडवे व डॉ. राजेश मिस्त्री मार्गदर्शन करणार आहेत. लातूर कॅन्सर व लॅप्रॉस्कोपी सेंटर आणि पुनपाळे डेंटल क्लिनिकचे उद्घाटन दुपारी १ वाजता डॉ. राजन बडवे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीकिशन पुनपाळे यांनी केले आहे.

बीड क्रीडा संकुल सोमवारपासून खुले
बीड, १ मे/वार्ताहर

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या पुढाकारानंतर अखेर तब्बल दोन महिन्याने जिल्हा क्रीडा संकुल सकाळी चार व सायंकाळी तीन तास क्रीडाप्रेमींसाठी खुले करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पंकजकुमार यांनी घेतला. क्रीडा संकुलाच्या मैदानावर शहरातील खेळाडू नियमित सराव करीत; काही नागरिक व्यायाम करीत. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी मार्चपासून अचानक क्रीडा संकुल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शहरात मोकळा श्वास घेण्यासाठी एकमेव मध्यवर्ती ठिकाण असलेले संकुल बंद झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह क्रीडाप्रेमींमध्येही संतप्त भावना उमटल्या. श्री. जगताप यांनी या प्रकरणी पुढाकार घेऊन काल सकाळी संकुलाच्या परिसरात क्रीडाप्रेमींची बैठक बोलाविली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी पंकजकुमार यांना भेटून संकुल बंद ठेवण्याचा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली व सकाळ-संध्याकाळ संकुल खुले ठेवावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. क्रीडाप्रेमी व जगताप यांचे म्हणणे ऐकून घेऊन जिल्हाधिकारी यांनी सोमवारपासून सकाळी पाच ते नऊ व सायंकाळी पाच ते आठ या वेळेत संकुल खुले ठेवण्याचे आदेश क्रीडा कार्यालयाला दिला.

कुंडलवाडीत महावितरणची ८३ लाखांची वसुली
बिलोली, १ मे/ वार्ताहर
वीज वितरण कंपनीने कुंडलवाडी व परिसरातील थकबाकीदारांकडून ८३ लाख रुपयांची वसुली केल्याचे कनिष्ठ अभियंता हुसेन खान हमीद खान यांनी ‘लोकसत्ता’स सांगितले.
कुंडलवाडी व परिसरात कृषिपंपांचे एकूण ७५० ग्राहक असून त्यांच्याकडून आठ लाख रुपये, ३१ उद्योजकांकडून १५ लाख रुपये वसूल करण्यात आले. घरगुती २८०० वीजग्राहक असून त्यापैकी २५७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला तर उर्वरित ग्राहकांकडून आठ लाख रुपये वसूल केले. पालिकेकडे २५ लाख रुपये थकबाकी असून ती भरणा करण्याची नोटीस बजावल्यानंतर पालिकेने ६८ हजार रुपयांचा भरणा केला. वीज वितरण कंपनीने ग्राहकांकडून ८३ लाख रुपये वसूल करून वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले. थकबाकी वसुलीच्या या धडक मोहिमेत धर्माबाद येथील सहायक अभियंता एम. एच. केंद्रे, कनिष्ठ अभियंता सोनवणे, हुसेन खान हमीद खान, लेखाधिकारी रंजळकर व लायखअली सहभागी झाले होते.

कोंडाबाई दाढेल यांचे निधन
लोहा, १ मे/ वार्ताहर

साठेनगरमधील रहिवासी कोंडाबाई विठ्ठलराव दाढेल यांचे आज सकाळी अल्प आजाराने निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे सात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मातंग संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग दाढेल व भारत दाढेल त्यांचे चिरंजीव होत.