Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

शिवसेनाप्रमुखांच्या अष्टप्रधानांपैकी दोघांवर
कारवाईचे उद्धव यांच्यापुढे आव्हान!
मुंबई, १ मे/प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अष्टप्रधान मंडळातील दोन सदस्य मधुकर

 

सरपोतदार व मनोहर जोशी यांनी अनुक्रमे उत्तर-मध्य व दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांचा प्रचार केला नाही, अशी तक्रार स्थानिक शिवसैनिकांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे समजते. अष्टप्रधान मंडळातील या सदस्यांवर कारवाई करण्याचे धारिष्टय़ उद्धव ठाकरे दाखविणार का, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
जनता पार्टीच्या काळात दुहेरी सदस्यत्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने तो पक्ष फुटला होता. शिवसेनेतही सध्या काहीशी तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेशी जोडलेल्या अनेक घरांत वडील शिवसेनेत तर मुले-मुली-सुना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अशी ‘दुहेरी निष्ठे’ची भानगड झाली आहे. यातूनच उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पेच उभा राहिला आहे. शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांच्या स्नुषा शिल्पा सरपोतदार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेची उमेदवारी दिली. या मतदारसंघातून अगदी अखेरच्या क्षणी भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांना उमेदवारी दिली. जेठमलानी यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्याकरिता आवर्जून मधुकर सरपोतदार यांना निमंत्रित करण्यात आले. मात्र त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन सरपोतदार प्रचारात सहभागी झाले नाहीत, अशी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची तक्रार आहे. सरपोतदार यांच्या कुटुंबियांनी या निवडणुकीत जेठमलानी यांच्या विरोधात शिल्पा सरपोतदार यांना मत टाकण्याचे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व शिवसेनाप्रेमी मतदारांना केल्याचे भाजपच्या मंडळींनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे याच लोकसभा मतदारसंघातील मतदार असून प्रकृतीच्या कारणास्तव ते मतदान करू शकले नाहीत तर याच मतदारसंघातून एकेकाळी लोकसभेत गेलेल्या मधुकर सरपोतदार यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली याचा अत्यंत चुकीचा संदेश शिवसैनिकांत गेल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुरेश गंभीर यांच्या निवडणूक प्रचारात शिवसेना नेते मनोहर जोशी हे झपाटून सहभागी झाले नाहीत, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. सरांनी कोकणातील रायगड जिल्हा तसेच मराठवाडा व विदर्भात शिवसेनेकरिता निश्चितच झटून प्रचार केला. मात्र तशी तळमळ त्यांनी दक्षिण-मध्य या एकेकाळच्या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात दाखविली नाही, असे काहींचे म्हणणे आहे. गंभीर यांच्याऐवजी शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, मिलींद वैद्य अथवा एकनाथ ठाकूर यांना उमेदवारी द्यावी, असा जोशी यांचा आग्रह होता.