Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये खडे टाकणारा कर्मचारी ‘एअर वर्क्‍स’चाच!
मुंबई, १ मे / प्रतिनिधी

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीमध्ये चिखल व खडे

 

टाकणाऱ्या ‘एअर वर्क्‍स इंडिया इंजिनिअरींग प्रा. लि.’ मधील एका कर्मचाऱ्याचे नाव गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात उघड झाले असून या कर्मचाऱ्याच्या अटकेनंतरच या घातपातामागील हेतू स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कर्मचाऱ्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र त्याची चौकशी करण्यात आली आहे.
हा प्रकार उघडकीस आणणारे ‘एअर वर्क्‍स’ कंपनीचे तंत्रज्ञ भरत बोरगे यांनी आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. वास्तविक आत्महत्येच्या आदल्या दिवशीच बोरगे यांनी तपासात चांगलेच सहकार्य केले होते. अगदी तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही त्याने नीट माहिती दिली होती. त्याच दिवशी अनिल धीरूभाई अंबानी समुहाचे (एडीएजी) तीन अधिकारी घटनास्थळी आले होते. त्यांनीही बोरगे यांच्याशी चर्चा केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी या प्रकरणात प्रमुख साक्षीदार असलेल्या बोरगे यांचा मृतदेह विलेपार्ले रेल्वे रुळाजवळ आढळल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी लागणार असे दिसत होते. मात्र बोरगे यांच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या रेल्वे पोलिसांनी एडीएजीच्या तीन अधिकाऱ्यांना आज ‘क्लिनचीट’ दिली. या अधिकाऱ्यांनी प्रशंसेसाठी बोरगेची भेट घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचा दावा रेल्वे पोलीस आयुक्त ए. के. शर्मा यांनी केला आहे. बोरगेकडे सापडलेल्या चिठ्ठीत तीन रिलायन्स अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतल्याचे तसेच अंबानी हेलिकॉप्टर कट आपल्यावरच उलटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यावर रिलायन्सच्या तीन अधिकाऱ्यांभोवती संशयाचे जाळे निर्माण झाले होते. माजी पोलीस महासंचालक के. के. कश्यप, निवृत्त सहाय्यक आयुक्त शैलेश काळे आणि एडीएजी कंपनीचा हवाई सुरक्षा अधिकारी व निवृत्त विंग कमांडर सावला या तीन अधिकाऱ्यांनी बोरगेची त्याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी भेट घेतल्याचे उघड झाल्यावर रेल्वे पोलिसांनी गुरूवारी त्यांना चौकशीसाठी बोलावून त्यांचे जबाब नोंदविले होते. तिन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबात कलिना येथील ‘एअर वर्क्‍स’कंपनीच्या कार्यालयात जाऊन बोरगेची भेट घेतल्याचे कबूल केले आहे. पण ही भेट त्यांनी बोरगेने बजावलेल्या कामगिरीची स्तुती करण्यासाठी घेतल्याचे याविषयी माहिती देताना शर्मा यांनी सांगितले. तसेच बोरगेने चिठ्ठीत म्हटल्याप्रमाणे या तिघांनी त्याचा मोबाईल नंबर मागितला नव्हता, तर बोरगेने स्वत:च त्यांना आपला मोबाईल नंबर दिल्याचे आणि बोरगेच्या मृत्यूपूर्वी या तिघांपैकी कोणीही त्याला फोन केला नसल्याचे चौकशीत पुढे आले आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. त्यामुळे आतापर्यंतच्या चौकशीत रिलायन्सच्या तिन्ही अधिकाऱ्यांनी बोरगेवर दबाव आणून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबतचा कोणताही ठोस पुरावा पुढे आलेला नसल्याचे त्यांना प्रकरणातून ‘क्लिनचीट’ दिल्याचे शर्मा यांनी सांगितले.
याप्रकरणी रिलायन्सच्या तीन अधिकाऱ्यांसह तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, ज्या लोकलने बोरगेला धडक दिली त्या लोकलचा मोटरमन आणि स्टेशनमास्तर, बोरगेचा भाऊ आनंद आणि एअर वर्क्‍सच्या काही कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला असला तरी गरज पडल्यास त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले जाईल, असेही शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.