Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेसला १२ ते १५ जागांची अपेक्षा !
मुंबई, १ मे / खास प्रतिनिधी

शरद पवार यांच्या पंतप्रधानपदासाठी राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यावर राष्ट्रवादीचा भर असला तरी राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसचे जास्त खासदार

 

निवडून येतील, असा काँग्रेस नेत्यांना विश्वास आहे. राज्यातून १२ ते १५ जागा निवडून येण्याची काँग्रेस नेत्यांना अपेक्षा आहे. गेल्या वेळी काँग्रेसचे राज्यातून १३ खासदार निवडून आले होते. तेवढे किंवा त्यापेक्षा जास्त खासदार यंदा निवडून येतील, असा राज्यातील नेत्यांना विश्वास आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी काही पदाधिकाऱ्यांबरोबर निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राष्ट्रवादीबरोबरील आघाडीत काँग्रेसच्या वाटय़ाला २५ जागा आल्या होत्या. एक जागा पक्षाने रामदास आठवले यांच्यासाठी सोडली होती. गत वेळच्या तुलनेत काँग्रेसला यंदा चांगले यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.
गेल्या वेळी विदर्भात पक्षाला फक्त नागपूरची जागा मिळाली होती. या वेळी तीन जागा मिळतील, असा काँग्रेस नेत्यांना विश्वास आहे. मराठवाडय़ात गेल्या वेळी पाटी कोरी होती. यंदा तीन जागांची पक्षाला अपेक्षा आहे. त्यात नांदेड व लातूरसह जालन्याच्या जागेबाबत काँग्रेसचे नेते आशावादी आहेत. औरंगाबादमध्ये विजयाची संधी आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली व सोलापूरबाबत पक्ष १०० टक्के आशावादी असून, पुण्यात राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी मदत केली नसली तरी सुरेश कलमाडी यांच्या विजयाची पक्षाला आशा आहे. कोकणात रायगडची जागा कठीण असली तरी रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये विजय निश्चित मानला जात आहे. पालघर व भिवंडीपैकी एक जागा मिळेल, असाही काँग्रेसचा अंदाज आहे. राष्ट्रवादीने विरोधात काम केले असले तरी नंदूरबारमध्ये माणिकराव गावीत यांच्या विजयात काही अडचण येणार नाही, अशी माहिती देण्यात आली. धुळ्याबाबत ५० टक्के यशाची अपेक्षा बाळगण्यात आली आहे.
सहापैकी पाच जागाजिंकून काँग्रेसने गेल्या वेळी मुंबईत आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. यंदा तीन जागांबाबत पक्ष आशावादी आहे. मनसेने शिवसेनेच्या मतांवर डल्ला मारला असल्यास चार जागांची लॉटरी लागू शकते, असे काँग्रेसच्या नेत्यांना विश्वास वाटत आहे. परिस्थिती चांगली राहिली असल्यास १५ पेक्षा एक-दोन जागा जास्त मिळू शकतात, असाही काँग्रेसला विश्वास वाटत आहे. काँग्रेसला किमान १२ ते १५ जागांची अपेक्षा बाळगणारे काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीला १० पेक्षा जास्त जागा मिळण्याबाबत साशंक आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला २६ ते २८ जागा मिळू शकतात, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.