Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

युवराजची हॅट्ट्रिक; तरीही पंजाबने हात टेकले
बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा विजय
दरबान, १ मे / वृत्तसंस्था

युवराजसिंगने घेतलेली हॅट्ट्रिक आणि त्यानंतर चार षटकार व तीन चौकारांसह केलेल्या ३४ चेंडूतील ५० धावा यानंतरही पंजाब किंग्ज इलेव्हनच्या नशिबी आज विजय नव्हता. बंगलोर रॉयल चॅलेंजर्सला १४५ धावांवर रोखल्यानंतर युवराज व करण गोयल यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या ७० धावांमुळे पंजाब संघ विजयाची स्वप्ने पाहू लागला होता. पण प्रवीण कुमारच्या अखेरच्या षटकात १३ धावा हव्या असताना पंजाबचा संघ केवळ चार धावा करू शकला आणि त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले.
सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या बंगलोरच्या संघाला या विजयामुळे नवसंजिवनी

 

लाभली. त्यांनी गुणतक्त्यात सातवरून पाचवे स्थान मिळविले आहे. युवराजने फलंदाजी व गोलंदाजीद्वारे केलेली मेहनत अखेर फळाला आली नाही. युवराजने फटकाविलेल्या सर्वाधिक चार षटकारांबद्दल त्याला विशेष पारितोषिक तर सामन्यातील सर्वोत्तम किताबही मिळाला.
अनिल कुंबळेने बंगलोर संघाचे प्रथमच कर्णधारपद स्वीकारून आपल्या संघाला विजयाची भेट दिली. त्याने २५ धावांत २ बळी घेतले. मव्‍‌र्हने अष्टपैलू कामगिरी करताना ३५ धावा व २२ धावांत २ बळीही मिळविले. त्याच्या आणि प्रवीण कुमारच्या गोलंदाजीवर धावांची बरसात करीत पंजाबने विजयाकडे कूच केली होती, पण अखेरच्या सहा चेंडूतील १३ धावांचे लक्ष्य त्यांना झेपले नाही.
जयवर्धने (१९), संगकारा (१७) यांनीही पंजाबला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना खेळपट्टीवर फार काळ टिकाव धरता आला नाही. पंजाबचा संघ आता चौथ्या स्थानावर आहे.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज युसूफ अब्दुल्लाच्या ३६ धावांतील ४ विकेट्स व युवराजसिंगने घेतलेली यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमधील पहिल्यावहिली हॅट्ट्रिक पंजाब किंग्ज इलेव्हनने बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाला २० षटकांत १४५ धावांवर रोखण्यात यश मिळविले.
बंगलोरच्या वॉन डर मव्‍‌र्हने १९ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह केलेल्या ३५ धावांमुळे त्यांच्या संघाला १४५ धावांपर्यंत पोहोचता आले. इतर फलंदाजांकडून मात्र हवी तशी साथ मिळू शकली नाही. जॅक कॅलिसने चार चौकारांसह २७ धावा करीत उपयुक्त साथ दिली.
युवराजसिंगची हॅट्ट्रिक मात्र या सामन्याचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. त्या डावातील १२ व्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर युवराजने अनुक्रमे उथप्पा (१९) व कॅलिस यांना टिपले आणि १४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाऊचरला बाद करीत हॅट्ट्रिकची नोंद केली.
इरफान पठाणने नेहमीप्रमाणे पंजाबला जेसी रायडरच्या रूपात झटपट विकेट मिळवून दिली. त्यानंतर उथप्पा व कॅलिस यांची ४२ धावांची भागीदारी व मव्‍‌र्हची जिगरबाज खेळी वगळता बंगलोरच्या फलंदाजांनी निराशा केली.