Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

एक आंबा ४० रुपयांना हापूस आंब्याचे दर चढेच
जयेश सामंत

आपल्या अवीट गोडीमुळे लहानग्यांपासून मोठय़ांपर्यंत सर्वानाच भुरळ पाडणारा

 

कोकणातील हापूस आंबा यावेळी आपल्या चढय़ा दरांमुळे सर्वसामान्यांना वाकुल्या दाखविण्याच्या बेतात असून गेल्या आठवडय़ाभरापासून मुंबईतील बाजारांमध्ये दमदार पुनरागमन करुनही या फळांच्या राजाचे दर खाली उतरण्यास तयार नसल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एप्रिलच्या १५ तारखेपासून साधारपणे हापूस आंब्याची मुंबईतील आवक जोर धरु लागते. यावर्षी मात्र यासाठी मे महिना उजाडल्याने आजही चांगल्या दर्जाच्या हापूस आंब्याची एक पेटी एक हजार ते १२०० रुपयांच्या घरात विकली जात आहे. उत्तम प्रतीचा हापूस खाण्यासाठी आजही डझनामागे तब्बल ३०० रुपये मोजावे लागत असल्याने एक आंबा ३५ ते ४० रुपये या भावाने विकला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील बाजारांमध्ये हापूस आंब्याची आवक कमालीची रोडावू लागली आहे. हवामानात होणारे बदल हे यामागचे प्रमुख कारण दिले जाते. असे असले तरी साधारपणे एप्रिलच्या मध्यावर मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाशीतील फळ बाजारात हापूस आंब्याची आवक वाढू लागते. यावर्षी मात्र अक्षय तृतीयेच्या मुहूर्तानंतर गेल्या आठवडाभरापासून या आवकेने जोर धरला आहे, असे चित्र वाशीतील फळ बाजारात दिसू लागले आहे. सध्याच्या घडीस देवगडहून येणाऱ्या हापूस आंब्याचा बाजारात जोर असून दिवसाकाठी सुमारे एक लाख पेटय़ांची आवक वाशी बाजारात होत आहे, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजारा समितीचे संचालक संजय पानसरे यांनी वृत्तान्तला दिली. आवक वाढली असली तरी आंब्याचे दर मात्र चढेच असून चांगल्या दर्जाची हापूस आंब्याची एक पेटी आजही या बाजारात १२०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. असे असले तरी ४०० ते ८०० रुपयांपर्यंत विकला जाणारा आंबाही बाजारात उपलब्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या पाच मेपर्यंत देवगडच्या हापूस आंब्याची आवक या बाजारात सुरू राहणार आहे. यानंतर देवगडच्या आंब्याचा मोसम ओसरेल आणि रत्नागिरी हापूसचा जोर वाढेल. साधारण २५ मेपर्यंत हा जोर सुरु असेल, असे पानसरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हापूस आंब्याची आवक वाढली असली, तरी येत्या आठवडाभरात आंब्याचे दर कमी होण्याची शक्यता मात्र कमीच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आंब्याच्या लागवडीचा तसेच जोपासणीचा खर्च गेल्या काही वर्षांत वाढला आहे. त्यामुळे सध्या चांगल्या प्रतीचा हापूस आंबा चढय़ाच दराने बाजारात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यात आवक पुर्वीप्रमाणे राहिली नसल्याने आंबा चैनीचे फळ बनून राहिल्याचे ते म्हणाले. दरम्यान, साधारण १० मेपर्यंत आंब्याच्या दरात काही प्रमाणात का होईना उतरण अपेक्षीत आहे, अशी माहिती बाजारातील व्यापारी भालचंद्र नलावडे यांनी दिली.