Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

आधीच प्रायोजकांचा अभाव, त्यात मंदी!
स्नूकर आणि बिलियर्डपटू महिलांच्या पदरी निराशा
प्रसाद रावकर

प्रख्यात बिलियर्डपटू अनुजा ठाकूरने स्नूकर आणि बिलियर्डच्या जगज्जेतेपदावर आपले नाव कोरल्यानंतर भारतातील अनेक मुली या क्रीडाप्रकाराकडे आकर्षित झाल्या. अनेकींनी

 

जगज्जेतेपदाचे स्वप्न उरी बाळगून स्नूकरची स्टीक हाती घेतली. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून स्थानिक पातळीवर महिलांसाठी स्नूकर्स आणि बिलियर्डच्या स्पर्धाच आयोजित करण्यात येत नसल्यामुळे या मुलींच्या पदरी निराशा आली आहे. गेली काही वर्षे महिलांसाठी स्नूकर व बिलियर्डचे सामने भरविण्यासाठी प्रायोजक मिळाले नाहीत. त्यात सध्या तर मंदीचीच लाट आहे. त्यामुळे महिलांचे सामने भरविणे शक्य नाही, असे कारण स्थानिक क्लबकडून पुढे करण्यात येत आहे. परिणामी सुरूवातीला मोठय़ा उत्साहाने या खेळांकडे वळलेल्या मुली आता मात्र अन्य पर्याय शोधू लागल्या आहेत.
बॉम्बे जिमख्यान्यातर्फे ऑल इंडिया लेडीज ओपन स्नूकर टुर्नामेन्ट, तर सीसीआयतर्फे ऑल इंडिया लेडीज इन्व्हिटेशन स्नूकर टुर्नामेन्ट या राज्यपातळीवरील स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असे. खास महिलांसाठीच्या या स्पर्धा गेली अनेक वर्षे होत होत्या, पण २००५ मध्ये ऑल इंडिया लेडीज ओपन स्नूकर टुर्नामेन्ट आणि २००६ मध्ये ऑल इंडिया लेडिज इन्व्हिटेशन स्नूकरच्या शेवटच्या टुर्नामेन्टस् खेळविण्यात आल्या. त्यानंतर या स्पर्धा झालेल्या नाहीत. बंगळुरू येथील सेंच्युरी क्लबमध्ये महिलांसाठी ऑल इंडिया ओपन स्नूकर स्पर्धा होत असे. मात्र तीही आता बंद पडली आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईतील निरनिराळ्या क्लबतर्फे महिलांसाठी स्नूकर आणि बिलियर्डचे सामने भरविण्यात येत पण स्थानिक क्लबनाही केवळ महिलांसाठीचे हे सामने भरविणे परवडेनासे झाले आणि त्यांनीही हात आखडता घेतला.
तथापि, बिलियर्ड अ‍ॅण्ड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडियातर्फे राष्ट्रीय स्तरावर महिलांसाठी स्नूकर आणि बिलियर्डची स्पर्धा घेतली जाते. राज्य मानांकन स्पर्धा दरवर्षी नियमितपणे होतेच असे नाही. तसेच १९ आणि २१ वर्षांखालील मुलींसाठी वर्षांतून एकदा राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा भरविली जाते. त्यामुळे केवळ या एका स्पर्धेत खेळण्यासाठी मुलींना वर्षभर सराव करावा लागतो. या सार्वत्रिक अनास्थेमुळे महिला स्नूकर- बिलियर्डपटू हिरमुसल्या असून, हळूहळू त्या या खेळांपासून दूर जाऊ लागल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रीय जेतेपद पटकावणाऱ्या आणि शिवछत्रपती पुरस्कारावर आपले नाव कोरणाऱ्या मीनल ठाकूर हिने दिली.
आता तर आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी पूलच्या स्पर्धा मोठय़ा प्रमाणावर होऊ लागल्या आहेत. जागतिक पातळीवर स्नूकर, बिलियर्ड आणि पूल या क्रीडाप्रकारांना चांगले दिवस आले आहेत. असे असताना भारतात मात्र या खेळांबद्दल अनास्थेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांसाठी स्थानिक पातळीवर स्पर्धाच आयोजित करण्यात आल्या नाहीत तर त्यांची कामगिरी सुधारणार कशी? वर्षभरात महिलांना केवळ एखादीच स्पर्धा खेळायला मिळत असेल तर त्या मुली या खेळाकडे वळणार तरी कशा? सध्या महिलांना पुरुषांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या खुल्या स्पर्धेत उतरावे लागते पण तिथे त्यांचा निभाव लागत नाही. त्या पराभूत होतात आणि त्यांच्या पदरी नैराश्य येते. हे असेच सुरू राहिले तर भविष्यात भारतातून आंतरराष्ट्रीय पातळीवर स्नूकर आणि बिलियर्ड खेळण्यासाठी जाणाऱ्या महिलांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांनी महिलांसाठी या खेळांच्या स्पर्धा भरवून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत मीनल ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.