Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

मुंबईतील विद्यार्थिनींचा ‘कॉक्रोच कीलर’ अमेरिकेत
नीरज पंडित

मुंबईतील मॉडेल इंग्लिश स्कूलच्या रितिका संगमेश्वरन आणि दिव्या कोठारी या दोन

 

विद्यार्थिनींनी तयार केलेले ‘कॉक्रोच कीलर’ अमेरिकेत १० ते १५ मे दरम्यान पार पडणाऱ्या ‘इंटेल आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. झुरळ मारण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे माणसाला हानिकारक असतात. यासाठी या दोघींनी नैसर्गिक स्रोतांच्या आधारे एक ‘कॉक्रोच कीलर’ तयार केले आहे.
भारतात पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘इनिशिएटीव्ह फॉर रिसर्च अ‍ॅण्ड इन्होवेशन इन सायन्सेस’, ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी’ आणि ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्पध्रेत देशातील सहा जणांनी यश मिळविले आहे. त्यात मुंबईतील या दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. हे सर्वजण अमेरिकेत पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेत हे सर्व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवर ही स्पर्धा पार पडते. विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान-तंत्रज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी आणि त्यातून विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात नवे प्रयोग व्हावेत यासाठी या स्पध्रेचे आयोजन करण्यात येते. विज्ञानाच्या विविध १० विषयांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येते. यातील जीवशास्त्र विषयात या दोघींनी यश संपादन केले आहे.
‘झुरळ’ प्रत्येक घरा-घरामधील मोठी समस्या आहे. त्यांना मरण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे माणसाला हानीकारक असल्याने आम्ही नैसर्गिक स्रोतांचा वापर करून एक ‘कॉक्रोच कीलर’ बनविले असल्याचे रितिका आणि दिव्या यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. हे औषध पूर्णत: इकोफ्रेंडली असून हे आले, पेरू आणि मिरी या तीन झाडांच्या पानांपासून तयार केले आहे. या तिघांचा अर्क समप्रमाणात मिसळल्यानंतर या औषधाची विविध स्तरावर चाचणी करण्यात आल्याची माहिती दोघींनी दिली. हे औषध प्रभावी आहे.
सध्या वापरण्यात येणाऱ्या रासायनिक औषधांना ते चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याने आंनद झाला असून या स्पध्रेसाठी आम्हाला आमचे शिक्षक, मित्र-मैत्रिणी यांनी प्रोत्साहन दिल्याचेही त्यांनी सांगितले. आता देशाला अधिकाधिक पारितोषिके मिळवून देण्याचे एकमेव ध्येय आमच्यासमोर असल्याचेही त्यांनी सांगितले.